esakal | संत वाङ्‌मयातील विरहभक्ती आणि पंढरीची वारी !
sakal

बोलून बातमी शोधा

संत वाङ्‌मयातील विरहभक्ती आणि पंढरीची वारी !

संत वाङ्‌मयातील विरहभक्ती आणि पंढरीची वारी !

sakal_logo
By
अभय जोशी

जगद्‌गुरू आद्य शंकराचार्यांनी या श्‍लोकातून पंढरीनिवासी भगवान श्री पांडुरंगाचे वर्णन केले आहे. यामध्ये पंढरी क्षेत्राला महायोग पीठ असे म्हटले आहे.

महायोगपीठे तटे भीमरथ्या । वरं पुण्डरिकाय दातुं मुनीन्दैः ।।

समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं । परब्रम्हलिंगम भजे पांण्डुरंगम ।।

जगद्‌गुरू आद्य शंकराचार्यांनी या श्‍लोकातून पंढरीनिवासी भगवान श्री पांडुरंगाचे वर्णन केले आहे. यामध्ये पंढरी क्षेत्राला महायोग पीठ असे म्हटले आहे. पीठ या शब्दाचा अर्थ आहे स्थान. यावरुन महायोगाचे स्थान म्हणजे पंढरपूर असा अर्थ होतो. तसेच महायोग म्हणजे काय याची जिज्ञासाही आपल्याला निर्माण होते. यामध्ये योग हा शब्द भगवान पातंजल मुनींनी त्यांच्या योगसुत्रात विस्ताराने वर्णन केलेला दिसून येतो. या अनुषंगाने महायोग या शब्दाचा अर्थ समाधीचे स्थान म्हणजे पंढरपूर क्षेत्र होय. याविषयी जगद्‌गुरु संत तुकाराम महाराजांचे वचन प्रसिद्ध आहे. "लुब्धली नादी लागली समाधी । मूढ जन नर नारी लोकां रे।। पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सिद्ध साधिकां रे ।।' पंढरपूरच्या वाळवंटातील भाविकांची अवस्था समाधीयुक्त अशी झाली आहे असे वर्णन वरील विवेचनावरुन दिसून येते. याचा अर्थ पंढरपूर हे असे महायोग आहे. यावरुन जीवब्रम्ह ऐक्‍य ही अवस्था या क्षेत्रामध्ये प्राप्त होते. असा महिमा या क्षेत्राचा हे लक्षात येते. (Adya Shankaracharya called the Pandhari region Mahayoga Peeth-ssd73)

हेही वाचा: होय, भाजप-मनसे युती शक्य आहे…

पंढरपूरची वारी ही एक अंत:करणातील अत्यंत प्रेमाचा विषय आहे. भगवंतावर असलेल्या परमप्रेमालाच भक्ती म्हणतात. असे देवर्षि नारदमुनींनी त्यांच्या भक्ती सूत्रामध्ये स्पष्ट सांगितलेले आहे. ते सूत्र असे, "सा त्वस्मिन परमप्रेमरुपा' अंतकरणातील प्रेमाची उच्चतम अवस्था यालाच भाव असे म्हणतात. या प्रेमभावाचे तीन प्रकार भक्ती शास्त्रांनी सांगितले आहेत. 1) पूर्वराग 2) मिलन 3) विरह असे तीन प्रकार आहेत. यामध्ये भगवंतभेटी पूर्वीची जी अवस्था ती पूर्वराग होय. फक्त एक परमात्मा हाच विषय संपूर्ण जीवनाचा झालेला असतो. या विरहाचे पुन्हा तीन प्रकार भक्ती शास्त्रांनी सांगितलेले आहेत. भावी विरह, वर्तमान विरह आणि भूत विरह. असे विरहाचे प्रकार आहेत. यामध्येही भावी विरहापेक्षा वर्तमान विरह श्रेष्ठ व वर्तमान विरहापेक्षा भूतिवरह अधिक श्रेष्ठ होय. या भूतविरहाविषयी भक्ती शास्त्रातील उज्ज्वलनिलमणि नामक ग्रंथामध्ये दहा अवस्था सांगितल्या आहेत.

चिंताडत्र जागरोव्देगौ तानवं मलिनांगता,

प्रलापो व्याधीरुन्मादः माहो मृत्युर्दशा दश,

वरील श्‍लोकातून चिंता, जागर, उद्वेग, कृशता, मलिनांगता, प्रलाप, व्याधी, उन्माद, मोह, मृत्यू या दहा अवस्था भूतविरहाच्या सांगितल्या आहेत. विरहामध्ये भक्त हा भगवंताच्या चिंतनामध्ये नामस्मरणामध्ये असा तल्लीन झालेला असतो की तो शरीराने भगवंताजवळ नसला तरी त्याचे मन हे भगवंत स्वरुप झालेले असते. कायिक, वाचिक व मानसिक या तीन सेवेमध्ये, विरहावस्थेत कायिक सेवा घडत नसली तरी वाचिक व मानसिक सेवा ही घडत असते.

हेही वाचा: BLOG : जगण्यात नवलाई आहे!

भक्तिशास्त्रामध्ये विरहासक्तीही श्रेष्ठ सांगितली आहे. विरह अवस्थेतून बाहेर पडलेले शब्द ही भगवंत प्रेमाची साक्ष देणारे असतात. भगवान श्री विठ्ठलाच्या भेटीविषयी संत नामदेव महाराजांची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. तो प्रसिद्ध अभंग असा आहे.

"भेटीलागी जीवा लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस वाट तुझी ।। पौर्णिमेचा चंद्रमा चकोर जीवन । तैसे माझे मन वाट पाहे ।। दीवाळीच्या मुळा लेकी आसावली । पाहता वाटुली मायबापा ।। नामा म्हणे आम्ही लेकराची जाती । भेटावया खंती वाटतसे ।।'

वरील अभंगातून संत नामदेव महाराजही पांडुरंगाच्या भेटीविषयीची तळमळ व्यक्त करतात. चकोर पक्षी हा पौर्णिमेच्या चंद्राची वाट पहातो. दिवाळीच्या सणाला मुलगी जशी माहेराकडून येणाऱ्या मुराळ्याची वाट पाहते तसे आम्ही पांडुरंगाच्या भेटीकरिता आसुसलेले आहोत. हा भाव इथे प्रगट होतो आहे. संत नामदेव महाराजांच्या सेवक असणाऱ्या व पांडुरंगाच्या निस्सीम भक्त संत जनाबाई या ही पांडुरंगाला हाका मारतात.

हेही वाचा: मनात होतेय वेदनांची गर्दी..!

"आता वाट पाहू किती, देवा रखुमाईच्या पती

येई येई पांडुरंगे, भेट देई मज संगे

राग न धरावा मनी, म्हणे नामयाची जनी'

जनाबाईंच्या या अभंगातून रुक्‍मिणीचा पती अशा पांडुरंगाविषयी तळमळ व प्रेम व्यक्त होत आहे. त्याबरोबरच आमचे काही चुकले असेल तर त्याचा राग मनात धरु नको व मला लवकर भेट दे ही आर्तता ही दिसून येते.

जगद्‌गुरु संत तुकाराम महाराजांनी पंढरीच्या वारीबद्दल व पांडुरंग भेटीबद्दल आपल्या मनातील भाव ज्या वारकऱ्यांकडे व्यक्त केले त्या अभंगांना पत्रिकेचे अभंग असे सांप्रदायामध्ये म्हटले जाते.

"देई डोळे भेटी न धरी संकोच । न घाली कांही वेच तुजवरी ।।

तुका म्हणे आम्हा लेकरांची जाती । भेटावया खंती वाटतसे ।।'

वरील अभंगातून संत तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला पत्र पाठवून भेटीची तळमळ व्यक्त केलेली दिसून येते आहे. संत तुकाराम महाराजांचा आणखी एक अभंग खूप चिंतनीय आहे. पंढरीची वाट पाहे निरंतर । निढळावरी कर ठेवूनिया ।। जातिया निरोप पाठवी माहेरा ।

का मज सासुरा सांडीयले ।। वरील अभंगातून पांडुरंगाविषयीचा अत्यंत विरह दिसून येतो आहे. ती अत्यंत श्रेष्ठ भक्ती आहे. संत तुकाराम महाराजांच्या समकालीन असणारे श्री संत माणकोजी महाराज बोधले श्रीक्षेत्र धामणगाव यांनी ही एका अभंगातून पांडुरंगाविषयीचा विरह व्यक्त केला आहे.

अगा पंढरीनाथा तु आमुचे माहेर । पाहे निरंतर वाट तुझी ।।

तुझीये भेटीचे आर्त माझ्या चित्ती । रखुमाईचा पती पांडुरंगा ।।

तुच आमचे वित्त तुच आमचे गोत । तु सर्वसंपत जोडी माझी ।।

बोधला म्हणे तुजवीण आण नेणे काही । प्रिती तुझे पायी बैसो माझी ।।

या अभंगातून माणकोजी महाराज बोधले यांनी व्यक्त केलेली विरह भक्ती ही आजही सर्व वारकरी समाज अनुभवितो आहे. कोरोना या विषाणूच्या संकटामुळे यावर्षीची ही आषाढी वारी सोहळा रुपाने जरी रद्द झालेली असली तरी आपण सर्वजण मानसिकरुपाने ही वारी आपल्या घरी बसूनच करीत आहोत. पांडुरंगाने हे संकट लवकर दूर करावे व आम्हाला दर्शन द्यावे हीच प्रार्थना.

लेखक : ऍड. डॉ. जयवंत महाराज बोधले, पंढरपूर

loading image