esakal | आपल्याला नागरी हक्क माहिती आहेत? जाणून घ्या महत्वपूर्ण माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

International Democracy Day

15 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून संयुक्त राष्ट्रांनी सन २००७ साली घोषित केला.

आपल्याला नागरी हक्क माहिती आहेत? जाणून घ्या महत्वपूर्ण माहिती

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

-दत्तात्रय मांजरे, सहाय्यक प्राध्यापक, दहिवडी

15 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून संयुक्त राष्ट्रांनी सन २००७ साली घोषित केला. लोकशाही ही एक जीवन प्रणाली म्हणून प्रत्येकानं स्वीकारणं हे समस्त विश्वाच्या दृष्टीनं हितकारक आहे. लोकशाही शासन व समाजव्यवस्थेसाठी लोकशाहीपूरक मूल्य समाजात रुजविणे, व्यक्तीगत व सार्वजनिक मानवी कृत्ये लोकशाही मूल्यांना प्राध्यान्य देणारी घडवीत, यासाठी लोकशाही मूल्यांचा परिचय व महत्व याबाबत जनजागृती करणे, जनमत तयार करणे ही समस्त जाणकारांची जबाबदारी व कर्तव्य आहे. याचाच एक भाग म्हणून नागरी हक्कांविषयी थोडेसे…

"हक्क हे जन्मतःच मिळत असतात. त्याचा उपभोग घेऊन स्वतःचा व समुदायाचा विकास करणे प्रत्येकाचा अधिकार आहे. हक्कांचा उपभोग घेत असताना प्रत्येकाने याचीही काळजी घेणे गरजेचे आहे, की आपले हक्क उपभोगताना इतरांच्या हक्कांची पायमल्ली होणार नाही अथवा ते हिरावले जाणार नाहीत. यासाठी विवेकाचा आवाज प्रत्येकामध्ये निर्माण झाला पाहिजे व तो जागा राहिला पाहिजे."

हेही वाचा: सहकारातील 1317 संस्थांच्या निवडणुकांचा वाजला बिगुल

आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन : आपल्या 13 नागरी हक्कांची ओळख

 1. जीवन जगण्याचा हक्क : राज्याने शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवून प्रत्येक नागरिकांची सुरक्षा केलीच पाहिजे.

 2. कौटुंबिक जीवनाचा हक्क : स्वइच्छेने विवाह करण्याचा व अपत्य जन्माला घालण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे.

 3. शिक्षणाचा हक्क : राज्याने शिक्षण घेण्याची सर्वांना संधी उपलब्ध करुन दिली पाहिजे. तसेच, नागरिकांना शासकीय व सामाजिक कार्यात सहभागी होण्याचा अधिकार आहे.

 4. व्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क : प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. व्यक्तिस्वातंत्र्यामुळेच प्रत्येकाचा मानसिक, बौध्दिक व शारीरिक विकास होतो. व्यक्तीस्वातंत्र्यचा उपभोग राज्याच्या कायद्यांचे पालन व सामाजिक हिताचे भान ठेवूनच केला पाहिजे.

 5. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क : राज्य व्यक्तीवर धर्माची सक्ती करु शकत नाही. तसेच धर्म स्वीकारणे व धार्मिक संस्था स्थापन करण्याचा प्रत्येक नागरिकांचा हक्क अबाधित आहे.

 6. विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क : विचार, दृष्टीकोन व कल्पनांची अभिव्यक्ती करण्याचे स्वातंत्र्य तसेच, त्यांची देवाण-घेवाण करण्याचे स्वातंत्र्य या हक्कात अभिप्रेत आहे.

 7. संचार स्वातंत्र्याचा हक्क: प्रत्येक नागरिकाला देशात व देशाबाहेर मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य आहे.

 8. मुद्रण स्वातंत्र्याचा हक्क : व्यक्तीचे विचार व दृष्टीकोन यांचे मुद्रण करुन वर्तमानपत्रे व नियतकालिकांमध्ये प्रकाशित करण्याचा प्रत्येक नागरिकाला हक्क आहे. ज्ञान, शिक्षण व माहितीच्या प्रसारासाठी या हक्काची आवश्यकता आहे.

 9. समानतेचा हक्क : प्रत्येकाला समान संधी व समान वागणूक मिळवण्याचा हक्क आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी लिंग, धर्म, भाषा, वर्ण व जात यांच्या आधारे भेदभाव करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

 10. न्यायाचा हक्क : प्रत्येकाला योग्य त्या न्यायालयात न्याय मागण्याचा हक्क आहे. जर न्याय मागण्याचा हक्क अबाधित राहिला नाही, तर इतर सर्व हक्क अर्थहीन आहेत.

 11. संघटना स्वातंत्र्य : सामाजिक, आर्थिक, राजकीय व विविध आवश्यकतेसाठी संघटना स्थापन करण्याचे व त्यांचे संचालन करण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. सामाजिक हिताच्या दृष्टीने अडसर ठरणाऱ्या संघटनांचा राज्य प्रतिबंध करु शकते.

 12. सांस्कृतिक स्वातंत्र्याचा हक्क : नागरिकांना भाषा, रुढी, प्रथा, परंपरा व लोकसाहित्य विकसित करण्याचा अधिकार आहे.

 13. करार करण्याचा हक्क : प्रत्येकाला आपल्या गरजेनुसार व्यक्ती, संस्था व शासन यांच्याशी करार करण्याचा व करारानुसार कृती करण्याचा हक्क आहे. करार करण्याचा हक्क अबाधित राहिला नाही तर व्यक्ती- व्यक्ती, व्यक्ती- संस्था, संस्था-संस्था यांच्यातील उभय व्यवहारांचे समाज व शासन मान्य मार्गाने व्यवस्थापन व संचालन होण्यास अडसर निर्माण होतो.

हेही वाचा: उदयनराजेंच्या विरोधात उमेदवार कोण? राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष

मित्र हो, ज्या-ज्या वेळी नागरी हक्कांवर अतिक्रमणे झाली, त्या-त्या वेळी धीरोदत्तपणे प्रदीर्घ व विचारपूर्वक अनेक समाजधुरीण व महामानवांनी त्या आक्रमणांचा प्रतिकार करून मानवी मूल्यांची जपवणूक व संवर्धन केले आहे. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाच्या निमित्ताने एवढेच आवाहन करितो की, "आपल्या हक्कांचा समाजभान ठेवून उपभोग घ्या. हक्क उपभोगण्यासाठी क्षमता वृध्दींगत करा. क्षमता वृध्दींगत झाल्यावर हक्कांचा जरूर उपभोग घ्या, कारण त्याच तुमचे, माझे, येणाऱ्या पिढीचे, समाजाचे पर्यायाने विश्वाचे कल्याण सामावले आहे.

loading image
go to top