शिवसागर....आनंदसागर!

शिवसागर....आनंदसागर!

सातारा सोडला अन्‌ पश्‍चिमेस तोंड केले, की अर्ध्या तासात कासचे पठार. कासचा समावेश जागतिक वारसास्थळात झाला आहे. त्यामुळे पाऊस उलटला, की इथले पठार गर्दीने ओथंबलेले असते. कासपासून पुन्हा डांबरी घाटवळणे ओलांडत खाली आले, की बामणोली हे गाव येते. हे शेवटचे गाव. समोर अथांग पसरलेला निळाशार शिवसागर, कोयना अभयारण्याचं हिरवेगर्द जंगल. मध्यभागी कोयना प्रकल्पाची निर्मिती झाली. त्यातून सुमारे शंभर टीएमसीचा पाणीसाठा निर्माण झाला. हे पाणी धरणाच्या भिंतीपासून थेट कोयनेच्या उगमापर्यंत साठत गेले. त्यालाच शिवसागर नावाने संबोधण्यात येते. धरण ते उगम हे साधारण ७० हून अधिक किलोमीटरचे अंतर. बामणोली हे जावळी तालुक्‍यात येते. अर्थात अलीकडेच याच परिसरातील गावे महाबळेश्वर तालुक्‍यात जोडण्यात आली आहेत. शिवसागराभोवती सुमारे १०० गावे वसलेली आहेत. देशातील सर्वांत कमी मतदार असलेले मतदान केंद्र म्हणून शिवसागर परिसरातील खिरखंडी गावाकडे पाहिले जाते. परिसरातील अनेक गावे मुऱ्यावर म्हणजेच डोंगर उंचावर आहेत. त्यांना मतदानासाठी खालच्या गावात यावे लागते. दोन-तीन तासांची पायपीट करावी लागते. बहुतेक गावांचे दळणवळण हे लाँचसेवेवर अवलंबून असते. त्यासाठी सरकारी लाँचसेवा आहे. बामणोलीत स्थानिकांनी एकत्र येत सहकारी तत्त्वावर व बोट क्‍लब स्थापन केला आहे.
 
बामणोलीतून सतत लाँचची, बोटींची ये-जा सुरू असते. तिथून समोर पाहिले, की दूरवर जंगलात वासोटा किल्ला दिसतो. बामणोलीतून शेवटचे टोक असलेल्या उचाट, वाघावळे वा सिंधी या गावात लाँचने जायचे तर किमान तीन तासांचा प्रवास. इथे कोयना, कांदाटी अन्‌ सोळशी या नद्या आहेत. बामणोलीसमोर कोयना अन्‌ कांदाटीचा संगम आहे. या खोऱ्यात दरे, पिंपरी, सालोशी, आडोशी, माडोशी, निवळी, मोरणी, लामज, वाघावळे, उचाट, कुसापूर आदी गावे आहेत. लाँचसेवा हा इथल्या सगळ्या लोकजीवनाचा आधार. बामणोलीपासून काही अंतरावरच तापोळा. इथल्या नयनरम्य निसर्गामुळे ‘मिनी काश्‍मीर’ म्हणूनही ते ओळखले जाते. तापोळ्यातील लाँचची संख्या चारशेच्या घरात आहे. दिवाळीनंतर तापोळा पर्यटकांनी फुललेले दिसते. अलीकडच्या काळात मोठमोठी हॉटेल्स इथे उभी राहिली आहेत.

तापोळ्यानजीक कोयना अन्‌ सोळशी नद्यांचा संगम आहे. इथे जलविहार ही पर्यटकांची पर्वणी ठरते. या खोऱ्यात गाढवली, आहिर, वानवली, वाळणे, वाकी, आवळण, वेळापूर, गावढोशी, हरचंदी, रुळे, आमशी, कोट्रोशी, रेणोशी, खरोशी, कळमगाव, शिरणार, देवळी, दाभे आदी गावे आहेत. तापोळ्यातून शेवटच्या दाभे या गावी लाँचने जायचे म्हटले तरी किमान दोन तास लागतात. अलीकडेच तापोळ्यानजीक जिल्हा परिषदेने तराफ्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अवजड वाहनेदेखील शिवसागरापलीकडे पोचू लागली आहे. रघुवीर घाटातून कोकणात उतरणारा मार्गही सुरू झाला आहे. पावसाळ्यात धो-धो कोसळणारा पाऊस, तर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य अशी विषम परिस्थिती इथे दिसते. भोवतालच्या निबीड जंगलामुळे हिंस्त्र श्वापदांचा वावर असतो. उपजीविकेचे परिसरात कोणतेही साधन नाही. त्यामुळे गावोगावचे लोक मुंबईची वाट धरतात. प्रत्येक गावात सरकारी शाळा आहेत. मात्र तापोळा, तळदेव, वाघावळे या गावांचा अपवाद वगळला तर विद्यालयीन शिक्षणाची सुविधा कोठेही नाही. महाविद्यालयीन शिक्षणासाठी चिपळूणची वाट धरावी लागते.
 
इथला बहुतेक वर्ग मुंबईत असल्यामुळे गावी महिला, मुले अन्‌ वृद्धांचीच संख्या अधिक. निसर्गाच्या प्रतिकूलतेमुळे समस्याही तितक्‍याच. अर्थात तरीही सगळ्यांचेच चेहरे जणू समाधानाने भरलेले दिसतात. प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्याची नैसर्गिक ऊर्जा त्यांच्यात ठासून भरलेली आहे. पावसाळ्यात तर घराबाहेर पडणेही मुश्‍किल. मात्र, जिद्द, इच्छाशक्ती तितकीच अफाट. त्यामुळे कोणतीही कुरकुर नाही, की नकारात्मकतेचे रडगाणे नाही. त्या उलट लवचिकता, समायोजन, तडजोडी यातून लोकांच्या जगण्याला आनंदाचे परिमाण लाभले आहे.

Edited By : Siddharth Latkar 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com