तो एक भला माणूस !

निष्णात डॉक्टर श्रीकांत पागे यांचा वाढदिवस
Dr. Shrikant Page
Dr. Shrikant PageSakal

सकाळची वेळ... पेपर वाचत असताना मोबाईलवर मेसेज आला... आज सोलापुरातील निष्णात डॉक्टर श्रीकांत पागे यांचा वाढदिवस... अगदीच जवळचा माणूस... आपला माणूस असल्यानं मोबाईलवर मेसेज देऊन वाढदिवसाच्या शुभेच्या देण्यापेक्षा आपण त्यांना पर्सनली भेटून शुभेच्या द्याव्यात, असं मनात आलं... त्याप्रमाणे दुपारी बाराच्या दरम्यान फोन केला... डॉक्टर तुम्ही आता सध्या कुठं आहात ? अपेक्षेप्रमाणं मार्कंडेय रुग्णालयामध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं... दोन मिनिटात आलोच असं म्हटल्यावर मला वाटलंच होतं, त्यांना काहीतरी संशय येईल. त्यांनी काय हो काही काळजीचं ? डॉक्टरच ते, त्यामुळं त्यांना हा प्रश्‍न पडणं साहजिकच होतं...

दररोजच कोणाच्या ना कोणाच्या वाढदिवसाचे मेसेज येतच असतात. परंतु आजचा दिवस तसा खासच होता.. डॉ. पागे म्हणजे एक वेगळेच रसायन... हरहुन्नरी व्यक्तिमत्व... सकाळी-सकाळी आपल्याकडील कॅमेऱ्यातून वेगवेगळ्या पक्ष्यांचे फोटो काढतील... स्वतःसाठी तासभर वेळ देऊन व्यायाम करतील... या कालावधीत मोबाईल मात्र सतत सुरु असतोच, हे विशेष ! त्यांना कधीही फोन करा प्रतिसाद मिळणारच ! पर्यटन हा त्यांच्या आवडीचा विषय... मधुमेही रुग्णांना तर प्रचंड दिलासा देणारे डॉक्टर... आई (कै.) सुमन यांच्या नावे असलेल्या सामाजिक संस्थेकडून मधुमेही रुग्णांचे उत्तम समुपदेशन करणार... मोटारसायकलवरून हजारो किमी फिरण्याची अजूनही तयारी... पन्नाशीच्या वयातही सोलापूर ते लेह-लडाख असा प्रवास मोटारसायकलवरुन करण्याचं स्वप्न... पर्यावरणप्रेमी, पक्षीप्रेमी, स्वच्छंदी फोटोग्राफर... प्रचंड बिझी असतानाही या सगळ्या छंदांसाठी वेळ काढणारे डॉक्टर कधीही चिडलेले, रागावलेले पाहिले नाहीत. रुग्णांना प्रेमाचा, मोलाचा सल्ला देताना आश्‍वासक शब्द हे डॉक्टरांचे वैशिष्ट्य ! नेहमीच वेगवेगळ्या ग्रुपवर ‘सकाळ'बाबत काही आक्षेपार्ह पोस्ट (वावड्या) आली की सडेतोड उत्तर देणारे हे आगळेवेगळे व समाजभान असलेले डॉक्टर.

डॉक्टरांना फोनवर काहीही विशेष नसल्याचं सांगत मार्कंडेयला आलोच म्हणत पत्नी विशालाला सोबत घेऊन हॉस्पिटल गाठलं... मी कोणाला बुके, हार, शाल, श्रीफळ असं काही देत नाही. माझ्या दृष्टीनं हा खर्च वाया घालवण्यासारखं आहे. त्याऐवजी या पैशातून कोणाला तरी गरजूला मदत करण्याकडे माझा कल असतो. मी स्वतःच या गोष्टींपासून कोसो दूर राहतो. हा पायंडा सर्वश्रृतच झाला आहे. परंतु यावेळी मात्र डॉक्टरांसाठी एक चांगला बुके घेतला होता...

मार्कंडेय रुग्णालयात डॉ. पागे सरांची भेट घेतली... त्यांना बुके दिला... त्यांना आश्‍चर्यच वाटले... आजारातून बरे झाल्यानंतर शक्यतो बरा झालो असं सांगण्यास कोणी येत नसतात, तसे प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा मोबाईल, फेसबुक अशा समाज माध्यमांतून शुभेच्छा संदेश देणाऱ्यांची संख्या अलिकडील काळात प्रचंड वाढल्याचे दिसते. त्यामुळे डॉक्टरांनी, ‘अरेच्चा शुभेच्छा देण्यासाठी यायचं होतं होय ?‘असा सवाल केला... त्यांना शुभेच्या देऊन परतत असताना डॉक्टरांच्या अनेक चांगुलपणाच्या गोष्टी मनात तरळून जात होत्या.

गेल्या काही वर्षांत ‘फॅमिली डॉक्टर' संकल्पना लोप पावत असताना डॉ. पागे यांच्या रुपाने ती अजूनही जीवंत असल्याचे सातत्याने जाणवले. पागे सर फिजीशियन असूनही औषधांची भली मोठी यादी, विविध प्रकारच्या तपासण्या, ॲडमीट असा प्रकार अगदी क्वचितच असल्याचा माझा अनुभव... खरं तर जितक्या तपासण्या जास्त, औषधे जास्त.. ॲडमिटचं प्रमाण जास्त तितका डॉक्टरांचा फायदाच. पण व्यायाम करा... ही गोळी बंद करण्याची माझी इच्छा आहे... मानसिकता बदलण्याची गरज आहे, असा सल्ला देऊन कमीत कमी खर्चात व औषध-गोळ्यात बरे करणारा हा भला माणूस की यांनी केलेल्या उपचारातून रुग्ण बरा होतो, त्यामुळे हा देवमाणूस असंच मला नेहमी वाटत आलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com