पुण्याच्या ट्रॅफिकची वाट लावली कोणी?

पुण्याच्या ट्रॅफिकची वाट लावली कोणी?

सतत धावण्याचा, पुढे जाण्याचा ध्यास हा माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे. प्रत्यक्ष आयुष्यातही दररोज पुढे जावे लागते. पुढे जाण्यासाठी अंतर कापावे लागते. त्यासाठी वाहन वापरण्याशिवाय पर्याय नाही. या साऱ्या धावपळीत माणसाला एक क्षणही थांबायला वेळ नाही. धावता धावता एक दिवस माणूसच कायमचा थांबतो. वारंवार अशा घटना समोर येत राहतात. सोमवारी पुण्यातील बाणेर रस्त्यावर असाच एक भीषण प्रसंग घडला.

रस्ता ओलांडताना दुभाजकावर थांबलेल्या नागरिकांना एका मोटारीने जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की संबंधित घटनेचा व्हिडिओ पाहतानाही मनाचा थरकाप उडतो. या घटनेत आतापर्यंत दोन जणांचा बळी गेलाय. त्यामध्ये एका तीनवर्षीय चिमुकलीचा समावेश आहे. या प्रसंगामुळे पुन्हा आपण शहरातल्या वाहतुकीविषयी चिंतन करण्याची गरज असल्याचे अधोरेखित झाले आहे. दुर्दैव हेच की अशा घटनांमुळेच आपण काही काळ, काही दिवस,.. फार फार तर काही आठवडे चिंताग्रस्त होतो. जमेल तेवढा शोक करतो. चर्चा करतो आणि परिस्थिती पुन्हा 'जैसे थे' राहते. या पार्श्‍वभूमीवर आपण वाहतुकीच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा शोधून, असे दुर्दैवी प्रसंग घडू नयेत याची अत्यंत दक्षपणे काळजी घेणे गरजेचे आहे. 

वाहतूक म्हटली की त्यामध्ये दुचाकी-चारचाकी वाहने, चौकातील गर्दी, सिग्नल, ट्रॅफिक पोलिस वगैरे चित्र समोर येते. दुर्दैव हेच आहे की पादचारी हाही वाहतूक व्यवस्थेतील एक घटक आहे हे आपण विसरूनच जातो. खरे तर पादचारी हाच वाहतुकीतील प्रमुख घटक आहे. तेच अधिक संयुक्तिक आहे. मात्र, दुर्दैवाने आपण त्यालाच या व्यवस्थेत फारसे विचारात घेत नाही. सोमवारच्या घटनेतून हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. चौकात 'मामा' नसल्याचे पाहून सिग्नल तोडणे, 'वन वे' असूनही उलट दिशेने जाणे, सिग्नल लागलेला असताना झेब्रा क्रॉसिंगच्याही पुढे वाहन उभे करणे या साऱ्या बाबी आपल्यासाठी जणू नित्याच्याच झाल्या आहेत. त्यासाठी वेळोवेळी जागृती मोहिमा, उपक्रम राबविले जातात. त्यातून तात्कालिक फरक पडतो. मात्र पुन्हा हे 'जैसे थे' सुरूच राहते. 

सोमवारच्या घटनेनंतर दुभाजकाची उंची वाढवावी, अशी चर्चा करण्यात येत आहे. वास्तविक पुण्यातील रस्त्यांची रचना पादचाऱ्यांचा शंभर टक्के विचार करून संपूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने बनविलेली नाही. पादचाऱ्यांना रस्ता प्रत्येक चौकात ओलांडण्यासाठी फारशी प्रभावी व्यवस्थाही नाही. विकसित देशांमध्ये पादचाऱ्यांना रस्त्यावर सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. मात्र भारतात एकदम उलट परिस्थिती आहे. भारतात वाहनचालक स्वत:ला श्रेष्ठ समजतात आणि पादचाऱ्यांना दुय्यम दर्जा देतात. पादचारी रस्ता क्रॉस करत असताना हॉर्न वाजवून त्यांना बिनधास्तपणे दूर हटवितात किंवा रोखून धरतात. वृद्ध व्यक्ती, लहान बालके बऱ्याचदा एकट्याने रस्ता ओलांडण्याची हिंमत करत नाहीत. बहुतेक घरातील वृद्ध व्यक्ती तर रस्ता क्रॉस करण्याच्या भीतीपायी रस्त्यावर किंवा घराबाहेर येणे टाळतात. 

रस्त्यावरचा राजा- पादचारी 
पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र पदपथाची व्यवस्था शहरांमध्ये अनेक ठिकाणी आहे. परंतु त्या पदपथांचा वापर कितीजण करतात? भुयारी मार्गांचा वापर आपण किती करतो? आणि पदपथ असले तरी रस्ता ओलांडताना पादचाऱ्याला मधूनच जावे लागणार हे साहजिक आहे. प्रथमतः आणि शेवटपर्यंत एक बाब आपण प्राध्यानाने लक्षात घेतली पाहिजे की, प्रत्येकजण पादचारीच असतो. तुमच्याकडे मोपेड, बाईक असो वा कोट्यवधी रुपयांची चारचाकी असो, वेळोवेळी रस्त्यावरून चालत जाणे क्रमप्राप्त असते. त्यामुळे आपण एसी गाडीत बसलो म्हणून समोरून हलक्या गाडीवरून, सायकलवरून किंवा चालत जाणाऱ्या वाटसरूला कमी लेखू नये.

खड्डेमय रस्ते
वाटच्या वाटसरा वाट बिकट मोठी, नशिबी दगड गोटे,
काट्याकुट्याचा धनी, पायाले लागे ठेचा,

या वर्णनाचा शब्दशः अनुभव घेण्यासाठी कुठे रानावनात, दऱ्या-खोऱ्यांत जाण्याची गरज नाही. पुण्या-मुंबईसारख्या शहरांमध्येही तुम्हाला पदोपदी याचा अनुभव येतो. त्यासाठी दोष कुणाला द्यायचा. सुधारणांसाठी उपाय काय करायचे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्या दृष्टीने संपूर्ण नागरी समुदायाने एकत्रितपणे विचारमंथन करून उपाय योजून, त्या दिशेने पाऊले उचलून निष्ठेने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. 

वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांचे आपण पुणेकर किंवा पुण्याबाहेरील असे वर्गीकरण करू शकत नाहीत. अगदी एखाद्या पुण्यातील किंवा पुण्याबाहेरील वाहनचालकाने सिग्नलवर 'मामा' नसताना प्रामाणिकपणे थांबण्याचा प्रयत्न केला तरीही मागील वाहने हॉर्न वाजवून भंडावून सोडत असल्याचे आपण नेहमीच पाहतो. वाहतुकीचे नियम न पाळणे हा 'शहाणपणा' मानणारी एक मानसिक विकृती आहे. पुढे जाण्याची घाई जगात प्रत्येकालाच आहे. पण सार्वजनिक व्यवस्थेचे नियम मोडून इतरांना चिरडून पुढे जाण्यात काही अर्थ आहे का? याचे चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. 

बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको 
संसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको

या पंक्तिंमध्ये अगदी साध्या शब्दांत जीवनाच्या वाटेवर कसे चालावे हे स्पष्ट सांगून ठेवलंय. मग ती 'वाटचाल' आयुष्याची असो अथवा घडीभरच्या प्रवासातील, 'धोपट मार्गा सोडू नको' हा मंत्र आपण कायम लक्षात ठेवून तो जपायला हवा ना?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com