'अच्छी बहू' असणाऱ्या सुनांची गोष्ट

'अच्छी बहू' असणाऱ्या सुनांची गोष्ट
'अच्छी बहू' असणाऱ्या सुनांची गोष्ट

स्वतःची मर्जी, स्वतःच्या आरामाची पर्वा न करता जवाबदाऱ्या पार पाडणारी जुन्या संस्कारांची अपूर्वा असो नाही तर योग्य ती कर्तव्य पार पाडून कुणाला खूश करायला स्वतःच्या आरामाचा लौकिक अर्थाने विचार करणारी, स्वतःचे स्वातंत्र्य हिरावू न देणारी बंडखोर, आधुनिक विचारांची पूर्वा असो.. दोघीही आपल्या जागी परफेक्‍शनिस्ट आहेत. संस्कारांचे नाव न लावता स्त्रीचे माणूसपण स्वीकारणे ही गरज बरेचदा ओळखली जाते, परंतु "कळतं पण वळत नाही' म्हणतात ते हेच!... विविध रुपात देवाने निर्माण केलेली ही स्त्रीची दोन्ही रूपं आपापल्या जागी परिपूर्णच आहेत असं माझं मत आहे.

पद्मा आणि सुजयच्या संसाराच्या वेलीवर अजय नावाचं एक गोंडस फुल लवकरच उमललं. पहिलचं मूल आणि ते देखील मुलगा झाल्याने घरात त्याचं भारी स्वागत झालं! सुजयचं कुटुंब तसं भारीच होतं. वडिलांचा स्वतःचा घाऊक व्यापाराचा बिझनेस आणि आई सामाजिक कार्यात प्रतिष्ठित लोकांमध्ये नावलौकिक प्राप्त झालेली. असे हे गुजराती कुटुंब व्यवसाय, शिक्षण, पैसा, संस्कृती, शिष्ठाचार कशातही कमी नव्हतं!

अजय चार वर्षांचा झालेला असतानाच पद्मा आणि सुजयने योग्य अंतर राखून आपल्याला आणखीन एक मुल हवे असा निर्णय घेतला. पद्माला दिवस गेले आहेत ही बातमी गावभर पसरायला फार वेळ लागला नाही. तिचं घेरदार पोट त्याची प्रसिद्धी द्यायला पुरेसं होतं... अखेर शंका खरी ठरली....पद्माच्या पोटात दोन गर्भ वाढत होते. वेळेआधी आलेली सुटकेची वेळ सुखरूप यथासांग पार पडली. फिक्कट गुलाबी रंगाच्या दोन नाजूक बाहुल्यांना कापसात ठेवलेलं बघून घरच्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. सासरच्यांनी दोघा गोजिरवाण्या मुलींचे वाजतगाजत घरात स्वागत केले. पहिली जन्माला आलेली मुलगी अपूर्वा आणि तिच्यापाठोपाठ जन्माला आलेली पूर्वा अशी नावे ठेवण्यात आली.

जुळ्या मुलांच्या लहानपणाच्या गंमती काही वेगळ्याच असतात. जुळ्या असल्या तरीही दोघींचे स्वभाव, आवडीनिवडी एकमेकींच्या अगदी विरुद्ध होते. अपूर्वा आणि पूर्वा ह्यांचे गुण अगदी त्यांच्या नावाला साजेल असेच होते. दोघी सुंदर असल्या तरीही अपूर्वा लावण्यवती होती. शाळेत कायम पहिली यायची. घरातील सर्व कामात ती आईची मदत करायची. शाळेचा अभ्यास देखील तिचा पूर्ण असायचा. आपलं घर आणि अभ्यास सोडून तिने कश्‍याशीही मैत्री केली नाही. ती शरीराने पण कृश आणि काहीशी अशक्त वाटावी अशी तिची तब्बेत होती.

पूर्वा देखील तितकीच सुसंस्कारी होती. मोठ्यांचा आदर, दिलेली जबाबदारी पार पाडणे इत्यादी उत्तम गुण तिच्यात होते. अभ्यासात मात्र पूर्वा कधी अव्वल ठरू शकली नाही. पूर्वाकडे उत्तम नेतृत्व गुण होते. शाळेच्या फुटबॉल टीमची ती कॅप्टन होती. शाळेला तिने अनेक पदके आणि ट्रॉफी मिळवून दिलेल्या होत्या. स्वाभाविकपणे आलेल्या रांगड्या स्वभावामुळे तिला सर्वजण "भाई' म्हणायचे. आपल्या "टॉमबॉय' इमेजसाठी ती ओळखली जायची.

वयाच्या विसाव्या वर्षी दोघींची शिक्षणे पूर्ण होत आलेली असतानाच अपूर्वाला टीव्हीवर सीरीअलसाठी मुख्य अभिनेत्री म्हणून संधी चालून आली. शिक्षण पूर्ण झाल्यामुळे घरच्या कुणीच तिला थांबवलं नाही. परंतु तेव्हाच एक उत्तम स्थळ तिला चालून आलं आणि परीक्षेचा पेपर टाकल्यावर ताबडतोब मुलाकडच्या लोकांच्या आग्रहामुळे लगेचच डोक्‍यावर अक्षता पडल्या आणि प्रसिद्ध उद्योगपतींच्या घरची ती सून झाली. कमी वयात घरची सर्व जवाबदारी अपूर्वाने सहज उचलली. आपल्या संस्कारांनी आणि सेवेने तिने सासूचं मन जिंकलं. दोन भाऊ आणि सासू-सासरे असा छोटा परिवार असला तरी नातेवाईकांचा गोतावळा कायम घरी असायचा. नवीन सुनबाई बघायला तर लोक निमित्त काढून मुद्दाम येत असत. परंतु तरीही अपूर्वाने सगळ्यांचे हसतमुखाने स्वागत करत असत.

चार वर्षे सहज निघून गेली आणि अपूर्वाच्या छोट्या दिराच्या लग्नाचा सासू-सासरे विचार करू लागले. त्याच्यासाठी मुलगी देखील त्यांनी आधीच बघून ठेवलेली. ती मुलगी अर्थात पूर्वा होती. अपूर्वाचे संस्कार, सेवाभावी स्वभाव बघून पूर्वाला त्या घराने सहज सून म्हणून स्वीकारले. दोन सख्या भावांच्या घरात दोन सख्या (जुळ्या) बहिणी आल्या तर परिवार विभक्त होणार नाही अशी सगळ्यांना खात्री होती.

इथे लग्नानंतर अपूर्वाने कायद्याचं शिक्षण पूर्ण करत असल्याने मूल होऊ दिलं नव्हतं आणि पूर्वाने आपल्या स्पोर्टसमधील करिअरसाठी मधील काही वर्षं दिलेली. योग्य वेळी दोन्ही बहिणींनी एकाच वेळी घराला वारस आणून घर खऱ्या अर्थाने समृद्ध केलं. फरक एवढाच होता की अपूर्वाने एका मुलीला जन्म दिलेला आणि पूर्वाने मुलाला. सुरज बर्जात्याच्या एखाद्या कौटुंबिक चित्रपटालाही लाजवेल अश्‍या ह्या परिवारातील दोन बहिणी आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांनी दोन्ही मुलांना अंतर कधी द्यायचं नाही, असं ठरवलं आणि घोषणा केली की आजपासून घरचा एक मुलगा आणि एक मुलगी हे समान वारस असतील. एकमेकींच्या मुलांचा पोटच्या मुलासारखा स्वीकार करून त्यांना प्रत्यक्षात स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळ देखील केला. कालांतराने व्यवसायानिमित सासू-सासऱ्यांना गुजरातला ठेऊन दोन बहिणी कुटुंबासह मुंबईत वेगळं घर घेऊन राहू लागल्या. दोघींनी मुलांना एकाच शाळेत घातले. म्हणेल ते करायला तयार असलेल्या पूर्वा भाईचा मुलगा मात्र तिच्या ताब्यात राहायला तयार नव्हता, म्हणून अपूर्वाने दोन्ही मुलांना अभ्यासाची शिस्त लावायला आपल्याकडे ठेऊन घेतले आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी देखील उचलली.

वीस वर्षं लग्नाला झाली तरीही अपूर्वाने एक "अच्छी बहू'ची इमेज सासूच्या नजरेत कायम ठेवली. वर्षातले 4-5 महिने सासू तिच्याकडे राहायला येते. तेव्हा सासूसमोर दुपारी झोप काढायला देखील अपूर्वाचे संस्कार तिला थांबवतात. हाताने कपडे धुतले नाहीत तरीही प्रत्येक माणसाला वेगवेगळे वाशिंग मशीन लाऊन ती कपडे धुणार. जणू आपल्या कामात चूक काय हे तिला माहितच नाही. पूर्वा खूप प्रॅक्‍टिकल होती. घरची परिस्थिती चांगली असूनही कुठलेही मशीन किंवा नोकरचाकर न ठेवता ती घरची सर्व कामं स्वतः करणे पसंत करते. सासू आली तरी अंग मेहनतीच्या कामांनी दमलेली पूर्वा निश्‍चित दुपारी झोप काढते. विकेंडला दोन्ही मुलांची जवाबदारी स्वतः स्वीकारते, त्यांना आवडीचं करून घालते, आणि अपूर्वाला हक्काची सुट्टी देते. फुटबॉल टीमची आजही ती कॅप्टन आहे. आजही तिची भाईगिरी प्रसिध्द आहे. सामाजिक समस्या घेऊन येणाऱ्यांचा तिने केलेला न्यायनिवाडा लोकांना आजही मान्य असतो. अपुर्वासारखी ती बारीक, सडसडीत अजिबात नाही. परंतु प्रत्येक समारंभात ती सुंदर काठपदराची साडी नेसून डोक्‍यावर अगदी पदरही घेऊन उभी असते.

तरीही पूर्वाच्या मते अपूर्वाच सासूची "अच्छी बहू' आहे. सासूदेखील चार दिवस पूर्वाकडे राहून बाकी दिवस अपूर्वा कडे आणि आपल्या स्वतःच्या घरी राहणे पसंत करते. सासू-सासरे राहायला आले की भेटायला येणारी पाहुणे मंडळी आजही अपूर्वा कडून हक्काने पाहुणचार करून घ्यायला उत्सुक असतात.

स्वतःची मर्जी, स्वतःच्या आरामाची पर्वा न करता जवाबदाऱ्या पार पाडणारी जुन्या संस्कारांची अपूर्वा असो नाही तर योग्य ती कर्तव्य पार पाडून कुणाला खूश करायला स्वतःच्या आरामाचा लौकिक अर्थाने विचार करणारी, स्वतःचे स्वातंत्र्य हिरावू न देणारी बंडखोर, आधुनिक विचारांची पूर्वा असो.. दोघीही आपल्या जागी परफेक्‍शनिस्ट आहेत. संस्कारांचे नाव न लावता स्त्रीचे माणूसपण स्वीकारणे ही गरज बरेचदा ओळखली जाते, परंतु "कळतं पण वळत नाही' म्हणतात ते हेच!... विविध रुपात देवाने निर्माण केलेली ही स्त्रीची दोन्ही रूपं आपापल्या जागी परिपूर्णच आहेत असं माझं मत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com