BLOG: पुण्यातल्या पाषाण तलावाजवळ जोडप्यांना बंदी ठरू शकते पृथ्वीच्या विनाशाचं कारण!

Pashan Lake
Pashan LakeSakal

निसर्गानं पृथ्वी तयार केली. दगड धोंडे, झाडं, पक्षी, पानं अगदी कीडे मकोडेसुद्धा तयार केले. आता राहता राहिले प्राणी. प्रचंड काथ्याकूट, आपसांत भांडणं, मतभेद, राज्यातल्या सध्याच्या राजकारणापेक्षाही नाट्यमय घडामोडी या सगळ्यानंतर अखेर निसर्गाने माणूस निर्माण करायचं ठरवलं. म्हणून त्यानं एक जीव बनवला आणि पृथ्वीवर सोडला.

आता या एकटा जीव सदाशिवाला त्याचं एकटेपण आवडू लागलं होतं. पण एखाद्याला सुख मिळतंय, आनंद मिळतोय हे कोणाला कसं आवडेल? आयुष्यात दुःख हवंच. मग त्यासाठी त्याने दुसरा एक माणूस पाठवला. आता या दोघांचं सुरुवातीला काही काळ बरं चाललं होतं. मग त्यांच्यात भांडणं होऊ लागली. रोज एकमेकांच्या अक्षरशः झिंज्या उपटू लागले. आता ह्यांची भांडणं सोडवायला कोणीतरी पाहिजेच ना. म्हणून निसर्गाने तिसरा माणूस सोडला. आता हा माणूस परका...तो आला म्हणून यांची युती झाली. आणि हे दोघे एकमेकांसोबतच राहू लागले. या दोघांनी एकमेकांना नावही दिलं. एडम आणि ईव्ह.

Pashan Lake
पाषाण तलाव परिसरात अविवाहित जोडप्यांना बंदी

तिसरा माणूस आल्याने एडम आणि ईव्हची भांडणं कमी झाली होती. ते दोघे एकमेकांशी जुळवून घ्यायला लागले होते. मात्र हे त्या तिसऱ्या माणसाला बघवलं नाही. या तिसऱ्या माणसाला आपण वेगळे पडतोय, याची जाणीव होऊ लागली. तिसऱ्या माणसाला आपण स्टीफन म्हणूयात. तर या स्टीफनला ते बघवलं नाही. एडम आणि ईव्ह सतत एकमेकांसोबत राहू लागले. एकदा ते दोघे एकत्र फिरत होते. स्टीफनने रागाच्या भरात ते जिथे रोज फिरायला जायचे तिथे एक पाटी लावली - 'प्रेमी युगुलांना प्रवेश बंद.'

झालं, आता जेव्हा जेव्हा एडम आणि ईव्ह एकत्र भेटायचे, फिरायचे, त्या त्या वेळी स्टीफन त्यांना ओरडायचा. त्यांना शेजारी शेजारी बसण्यापासूनही बंदी होती. दोघं नाराज राहू लागले, एकमेकांपासून लांब राहू लागले. एकमेकांशी बोलण्याचीही मनाई झाली. अनेक वर्षे अशीच गेली. एडम, ईव्ह आणि स्टीफन तिघंही वेगवेगळे राहू लागले.एकमेकांना भेटणंही बंद झालं. आता निसर्ग चिंतेत पडला. त्याला कळेना, आता नवीन माणसं बनवायची कशी? हे तिघे तर एकमेकांच्या समोरही येत नाहीत. निसर्गाने ती पाटी हटवायचे असंख्य प्रयत्न केले. पण स्टीफनच्या विरोधापुढे निसर्गाचंही काही चालेना.

सगळं ठप्प झालं. चौथ्या जीवाचं निर्माण थांबलं. निसर्ग काळजीत पडला. यांना एकत्र आणायचं कसं? अखेर निसर्गही कंटाळला. शेवटी एडम आणि ईव्ह चिडले. त्यांनी बंड केलं. त्यांनी आंदोलन केलं. स्टीफनविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पृथ्वीवरती रणकंदन माजलं. स्टीफनविरोधातल्या या बंडात झाडं, पानं पक्षीही सहभागी झाले. कोणी स्टीफनच्या बाजूला गेलं, कोणी एडम, ईव्हच्या बाजूला आलं. जोरात युद्ध झालं. दगडफेक, झाडं पडली, कीटक शहीद झाले. निसर्ग पुन्हा चिंतेत. सगळंच हळू हळू संपुष्टात आलं आणि अखेर एडम, ईव्ह आणि स्टीफनसह तयार झालेली सगळीच्या सगळी पृथ्वी नष्ट झाली आणि अवकाशात एक मोठाच्या मोठा स्फोट झाला. पृथ्वीच्या चिंध्या-चिंध्या झाल्या, त्या सगळ्या अवकाशात विखुरल्या. आजूबाजूच्या ग्रहांना धडका देऊ लागल्या.

आकाशगंगेतले सगळे ग्रह हलले, दिशा बदलल्या. शनिची कडी अक्षरशः निखळून पडली. विध्वंस, विनाश सुरू झाला. चुकून एक धक्का सूर्याला लागला. सूर्य प्रचंड पेटला. इतका पेटला, इतका पेटला, इतका पेटला की त्याचा भयंकर मोठा स्फोट झाला. फट्ट्ट्ट्ट्ट्.....

या स्फोटाच्या आवाजाने मला दचकून जाग आली. हे सगळं खरं तर नाही ना? या विचारातच मी अगदी घाबरत घाबरत टीव्ही सुरू केला, अन् माझ्या अंगातलं त्राणच गळालं, घशाला कोरड पडली, एसीमध्येच घाम फुटला. कारण टीव्हीला बातमी होती....

पुण्यातल्या पाषाण तलाव परिसरात जोडप्यांना बंदी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com