कॅप्टन राम लाड यांचा अल्पपरिचय

Captain Ram Lad brief introduction
Captain Ram Lad brief introduction sakal

प्रतिसरकारचे पोलादी मनगट, कै. कॅप्टन राम लाड यांचे काल ६ फेब्रूवारी रोजी वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले. त्याच्या कार्याचा हा अल्पपरिचय

कॅप्टन राम लाड हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे शरीर संरक्षक होते. त्याचा जन्म १९२२ रोजी खानदानी घराण्यात झाला. बालपणापासून ते लाडात वाढले. शिक्षण फक्त मराठी दुसरी पास. व्यवसाय शेतीचा. भरपूर शेती. राम लाड किर्लोस्करवाडीत नोकरी करायचे पण शिक्षण तर नव्हतेच. पण थोरामोठ्यांच्या बैठकीत बसण्याची हौस भारी. यामुळेच ते देशभक्त आप्पासाहेब लाड गुरुजींच्या सहवासात आले आणि रात्रीच्या प्रौढशिक्षण शाळेत जाऊ लागले. साधारण १९३९ पासून त्यांनी राष्ट्रीय कार्यक्रमात भाग घ्यायला सुरुवात केली. प्रभात फेरीत त्यांना आवडीच्या गोष्टी कळू लागल्या. सार्वजनिक सभांमध्ये राम लाड सहभागी होऊन आपले विचार मांडू लागले. १९४१ साली वाडीला मोठा संप झाला. यामध्ये कॅप्टन राम लाड यांना नोकरीतून कमी करण्यात आले, पण शेवटी कामगारांचा विजय झाला आणि राम लाड यांच्या कामगिरीचे नाव सगळीकडे झाले. एक लढवय्या कामगार म्हणून त्यांची प्रतिमा उजळून निघाली. १९४२ ऑगस्टपासून क्रांतीचे वारे सुरू झाले आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुंडल गावी मोठा मोर्चा तासगावला नेण्याचे ठरले. या मोर्चाचे नेतृत्व कृष्णराव कुराडे काका यांच्याकडे होते. मोर्च्यात कॅप्टन लाड आघाडीवर होते. त्यांनी मामलेदार आणि न्यायाधीश यांना स्वतःच्या हाताने गांधी टोप्या घातल्या. जनतेच्या साक्षीने मामलेदार कचेरीवर तिरंगा झेंडा फडकवला. लगेचच क्रांतिसिंह नाना पाटील १०० निवडक स्वातंत्र्यसैनिकांच्या संरक्षणाखाली भूमिगत झाले . या सुरक्षायंत्रणेमध्ये कॅप्टन लाड सहभागी झाले ते पुन्हा किर्लोस्करवाडीला परत आले नाहीत आणि त्यांनी नोकरीचा राजीनामाही दिला नाही.

१९४२ च्या नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये एसएम जोशी यांच्या नेतृत्वाखाली औंध या संस्थांनी राजधानीच्या गावी राष्ट्रसेवा दलाचे शिबिर होते. या शिबिरात कुंडलच्या क्रांतिकारकांचे प्रतिनिधीत्व राम लाड यांनी केले. कुंडल हे क्रांतीचे तीर्थक्षेत्र होते. क्रांतिवीर देशभक्त आप्पासाहेब लाड, नाथाजी लाड, रामचंद्र पवार, धाडसी तरुण मंडळी कुंडलमध्ये काम करत होती. इंग्रजांनी या गावावर सशस्त्र सैनिकांचा पहारा बसवला होता. काँग्रेसवर तर बंदी होती पण राष्ट्र सेवा दल ही राजकारण विरहित तरुणांची संस्था होती. त्यावर काही बंदी नव्हती. या शिबिरात शेकडो तरुणांना स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली.

प्रतिसरकारची न्याय आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी तुफान सेनेची निर्मिती करण्याचा विचार झाला. कुंडल येथे कायमस्वरुपी प्रशिक्षण केंद्र उभारले. दर पंधरा दिवसाला एक हजार तरुणांचा सहभाग होत असे. या शिबिरातून निवडक तरुणांना घेऊन त्यांच्या कसोट्या घेऊन त्यांना तुफान सैनिकांचा दर्जा दिला जात असे. लाठी-काठी, खेळ, बंदुक चालवणे, गुंडांचा बंदोबस्त करणे, गनिमी कावा हे प्रशिक्षण दिले जात असे. यासाठी शिबीर प्रमुख म्हणून कॅप्टन राम लाड यांनी भूमिका बजावली. तुफानसैनिक सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पसरले. तुफान सेनेला राष्ट्रसेवा दल आणि व्यायाम शाळा असेही म्हणत असत.

या सर्व तुफान सेनेची माहिती ब्रिटिश राजसत्तेला मिळाली आणि कुंडलवर दोनशे सैनिकांचा पहारा बसला. सरसकट धरपकड सुरू झाली. यातून मार्ग काढण्यासाठी औंधच्या संस्थानिकांनी कॅप्टन लाड यांना अटक करून औंधच्या कारागृहामध्ये टाकले. यावेळी कॅप्टन आकाराम पवार यांनी केंद्राची जबाबदारी सांभाळली. चार महिन्याच्या दरबारी कारागृहातून नंतर कॅप्टन लाड यांची पॅरोलवर मुक्तता करण्यात आली व ते प्रतिसरकारच्या कामामध्ये सहभाग देण्यासाठी कुंडलला आले. हा पॅरोल दिवसेंदिवस वाढवला जायचा. अशाप्रकारे संस्थांनी प्रतिसरकारच्या कार्यात कॅप्टन लाड यांना सांभाळून घेतले होते.

सेवादलाची शिबिरे नेहमी चालू असायची आणि त्याच्या शाखा गावोगावी सुरू करण्यासाठी कॅप्टन लाड आणि आकाराम पवार हे सातत्याने विभागात फिरायचे. एकदा असाच प्रसंग झाला. साथीदारांसह कराड येथे कॅप्टन लाड यांना अटक झाली आणि साडेचार महिने शिक्षाही झाली. शिक्षा भोगून सुटून आल्यावर पुन्हा प्रतिसरकारच्या कार्यात राम लाड यांनी स्वतःला झोकून दिले. जवळजवळ पाचशे गावातील लोकांशी संपर्क होता.

एकदा कराड तालुक्यातील शेख काका यांच्या विनंतीवरून कुंडल क्रांती केंद्राचे शिबिर घेण्यात आले होते. याची खबर गिल्बर्ट नावाच्या डीएसपीला लागली आणि त्याने शिबीरावर छापा मारला. सहकारी, अनेक क्रांतिकारक पकडण्यात आले. त्यांना काठीने मिळेल तसे झोडण्यात आले. तेव्हा स्वर्गीय रामानंद महाराजांनी अत्यंत कडक शब्दात डीएसपीची हजेरी घेतली. मग क्रांतिकारकांची सुटका झाली. तरीपण हे क्रांतिकारक काही गप्प बसले नव्हते. तेथून सुटका होताच ते येळगाव येथे गेले.

प्रतिसरकारच्या यशामागे तुफान सेनेचे खंबीर पाठबळ उभे होते. गावगुंड, धनदांडगे यांच्याविरोधात गावाकडून क्रांतिवीरांनी उभारलेले लढे तुफान सेनेने यशस्वी केले.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर क्रांतिसिंह नाना पाटील यांचे अनेक ठिकाणी सत्कार झाले. यावेळी त्या भव्य सोहळ्यात ५०० निवडक तुफान सैनिक क्रांतिवीर नाना पाटलांच्या बरोबर असत. या सर्वांचे नेतृत्व कॅप्टन राम लाड यांच्याकडे होते.

स्वातंत्र्य मिळाले तरी कॅप्टन लाड यांचे कार्य संपले नव्हते. मराठवाड्यामध्ये हैदराबादच्या रझाकारी सेनेने अत्याचार मांडला होता. तेव्हा निजाम सरकारच्या विरोधात कॅप्टन लाड लढण्यासाठी मराठवाड्यात पोहोचले. बार्शीपासून बुलढाणा, यवतमाळच्या सीमेवर त्यांचे मित्र आकाराम पवार यांनी प्रशिक्षण केंद्रे उभारली. मराठवाड्यातील तरुणांना सशस्त्र लढाईचे शिक्षण, गनिमी कावा शिकवला. उस्मानाबाद जिल्ह्यात कैलासवासी भाई उद्धवराव पाटील यांचे या गावी स्वातंत्र्याचा पहिला झेंडा उभारण्यात आला. त्या दिवसापासून रजाकारी सत्ता उलथून टाकण्यासाठी रणधुमाळीत चालू झाली. या रणधुमाळीत कॅप्टन राम लाड, आकाराम पवार यांनी जीव ओतून काम केले. या लढ्यात तुफानसेनेचे खूप हाल झाले. अनेक जण जखमी झाले तरीही कुठेही माघार घेण्यात आली नाही.

एक दिवस वल्लभभाई पटेलांनी पोलीस कारवाई करून हैदराबाद संस्थान भारतात विलीन केले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नाशिक येथे कैलासवासी काकासाहेब वाघ यांच्या नेतृत्वाखाली मराठा बोर्डिंगमध्ये फार मोठे ५००० सैनिकांचे शिबिर तब्बल एक महिना चालू होते. या संपूर्ण शिबिरात नेतृत्व कॅप्टन लाड यांनी केले. राष्ट्रसंत गाडगेबाबांपासून डॉक्टर आंबेडकरांचे पर्यंत अनेक विचारवंत नेत्यांनी या शिबिरामध्ये हजेरी लावली होती. यानंतर पंजाबराव देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार विदर्भातील बुलढाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यातील राष्ट्रसेवा दल आणि शेतकरी संघटन करण्यासाठी कॅप्टन लाड यांनी काम केले. अमरावतीच्या कॉटन मार्केटमध्ये चार हजार सैनिकांचे एक महिना मुदतीचे शिबीर घेण्यात आले होते. या शिबिरात तयार झालेल्या सैनिकांनी विदर्भात सेवादलाच्या शाखा सुरू केल्या.

कॅप्टन लाड यांच्या कामाचा झंजावात अफाट होता. विदर्भात केलेल्या कामगिरीनंतर ते एक वर्षानंतर पुन्हा कुंडल येथे आले.

प्रतिसरकारचा क्रांतिकारी गट आणि सत्ताधारी काँग्रेस यामध्ये मतभेद झाले आणि यातून शेतकरी कामगार पक्षाचा उदय झाला. महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे अस्तित्व ठळकपणे दिसू लागले. तेव्हा राजसत्तेने सरकार पाडण्याच्या कटाच्या आरोपाखाली प्रतिसरकारमधील क्रांतिकारकांना अटक केली. यामध्ये कॅ.राम लाड यांना जवळजवळ पावणे दोन वर्षे कारागृहात ठेवण्यात आले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातदेखील त्यांनी लाख मोलाची कामगिरी बजावली. असे हे प्रतिसरकारची उभारणी करणारे राष्ट्रासाठी सर्व आयुष्य वेचणारे प्रतिसरकारचे एक पोलादी मनगट कॅप्टन राम लाड

भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या पद्धतीने आजाद हिंद सेना, नाविकांचा उठाव, असहकार आंदोलन यांचा आवर्जून उल्लेख करावा लागतो तसाच सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रतिसरकारचा करावा लागेल. राज्य सत्तेने १९४२चे आंदोलन पूर्णपणे चिरडले होते. या पार्श्वभूमीवर प्रतिसरकार १९४२ ते १९४६ या काळात ४४ महिने कोणत्याही प्रकारची माघार न घेता ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून काम करत होते.

हे कोणी केले त्या प्रतिसरकारमधील शिल्पकारास विनम्र श्रद्धांजली

लेखक : पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने (देशभक्तकोशकार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com