मनातला कोरोना : प्रतिक्रिया नको प्रतिसाद हवाय

Public
Public

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी आपण सगळे लढतोय. घरातच थांबून स्वतःला शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या तंदुरूस्त ठेवायचं आहे. मनातल्या कोरोनावर मात कशी करायची, मनाच्या आरोग्याचं व्यवस्थापन कसं करायचं, हे सांगताहेत, प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ, लेखक, नाटककार आणि इन्स्टीट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थचे कार्यकारी विश्वस्त.

प्रतिक्रिया नको प्रतिसाद हवाय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता. 24) देशभरातील नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन केलंय. 21 दिवसांसाठी घराबाहेर न पडण्याची सीमारेषा आखून दिलीय. महाराष्ट्रातील आपत्कालीन परिस्थितीत फरक पडलेला नाही. आता हे नियमन देशाला लागू केलंय. आताचे 21 दिवस आपल्या सगळ्यांसाठी नियोजन करण्याचे आहेत.

प्रत्यक्षात काय घडतंय
पंतप्रधानांचं भाषण संपायच्या आधी काही लोक किराणा माल, भाजी, दूध खरेदीसाठी घराबाहेर पडले. मोठ्या शहरांमध्ये ट्रॅफिक जामही झाले. हे कशाचं लक्षण आहे? आपण प्रतिक्रिया देतोय. प्रतिसाद नाही. We are Reacting not Responding मनात प्रतिक्रिया लगेच येते. तुमच्या मनाला विचार करायला वेळ द्या. प्रतिसाद विचारपूर्वक येतो. आपण अकारण खरेदीसाठी बाहेर पडतो, हे आपल्या भावनिक अपरिपक्वतेचं लक्षण आहे. थोडा विचार करा, गेले आठ, दहा दिवस गरजेच्या वस्तू पुरेशा मिळाल्या आहेत. घराजवळचं किराणा मालाचं, दुधाचं दुकान सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान यांच्या निवेदनांवर विश्वास ठेवू या. व्यवस्था कोसळून पडलेली नाही. आपल्या वागण्याने ती कोसळली, तर सगळ्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल.

प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यातील फरक समजून घेऊ या. प्रतिक्रियेवर कृती करू नका. विचार करा, त्यावर प्रतिसाद अवलंबून आहे. आपण एखाद्या घटना, प्रसंग अनुभवाचं महाभयंकरीकरण (टेरिबलायजेशन) किंवा महाक्षुल्ल्कीकरण (ट्रीव्हिलायजेशन) करतो. मंगळवारी रात्री आठच्या पंतप्रधानांच्या निवेदनानंतर घराबाहेर पडणं म्हणजे महाभयंकरीकरण आणि रविवारी (22 मार्च) साथीच्या प्रादुर्भावाची कल्पना असूनही घराबाहेर पडून घंटानाद, थाळीनाद केला, ते महाक्षुल्लकीकरण आपल्याला या दोन प्रतिक्रियांच्या मधे राहायचंय. थोडी गैरसोय, असुविधा होणार आहे. पण मनातल्या मनात त्याचं आणीबाणीत रूपांतर करूया नको. आपण असुविधेचा स्वीकार करत नाही, तिला आणीबाणी मानतो. म्हणून अशी प्रतिक्रिया देतो. आत्ताची कोरोनाच्या प्रादुर्भावाची समस्या तर, वैश्विक आहे.

समजा दहा, बारा दिवस भाजीपाला मिळाला नाही, तर ठरवू या, घरात उसळी खाव्या लागतील. म्हणजेच आपल्या समस्यांचं सामान्यीकरण (नॉर्मलायजेशन) करूया. समोर आलेल्या परिस्थितीचं सामान्यीकरण करावं लागेल. सहजपणे ती स्वीकारावी लागेल. आपलं ध्येय पुढील तीन आठवड्यांचं आहे. त्याचं नियोजन, सामान्यीकरण करूया. त्यावरच आपला वर्तमान आणि वर्तन प्रतिसाद अवलंबून आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com