डॉ. बाबासाहेबांच्या लंडनमधील आठवणींना 'ऑनलाइन' उजाळा

dr babasaheb ambedkar
dr babasaheb ambedkar
Summary

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठाला 125 वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने 10 नामवंत माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आलाय. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही समावेश असून त्यांचा प्रवास सांगणारा महत्त्वाचा दस्तावेज ऑनलाईन पद्धतीने प्रदर्शित करण्यात आलाय. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकणारे ॲड. प्रविण निकम यांनी या प्रदर्शनात मांडलेल्या दस्ताएवजाची विस्तृत मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे.

विद्यार्थीदशेत भीमराव आंबेडकर हे अतिशय संघर्षातून तत्कालीन समाज व्यवस्थेला फाटा देत उच्च शिक्षणासाठी लंडनला पोहोचतात आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आंतराष्ट्रीय विद्यापीठात आपल्या अभ्यासातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतात. हा प्रवास जगातील प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देणारा आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स या विद्यापीठात रौप्य शतकी वर्षाचा उत्सव सुरु आहे. यात विद्यापीठात शिकलेल्या आणि पुढे चालून मोठं नाव कमावलेल्या विद्यार्थ्यांचा शिकत असतानाचा प्रवास मांडला आहे. याचा एक भाग म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवास सांगणारे एक ऑनलाइन प्रदर्शन लावण्यात आलंय. यात विद्यापीठाकडे उपलब्ध असलेला बराच महत्वपूर्ण दस्तावेज पाहण्यासाठी उपलब्ध आहे. हे ऑनलाइन प्रदर्शन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE)दक्षिण आशिया केंद्र, LSE ग्रंथालय आणि डेकोलोनिझिंग LSE यांच्या माध्यमातून भरविण्यात आलं आहे.

२०२० हे साल लंडंन स्कूल ऑफ़ इकॉनॉमिक्स विद्यापीठाचं १२५ वर्धापन साल होतं. याच औपचारिक साधून विद्यापीठात विविध कार्यक्रमांचं आयोजन चालू होत. त्यात त्यांनी गेल्या १२५ वर्षातील १० विद्यार्थी, ज्यांचं योगदान हे जगासाठी महत्वाचं ठरलं, अशा १० माजी विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली आणि त्यांच्या संघर्षमय प्रेरणादायी आयुष्याचा माहीतीपट संकलीत केलाय. या यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव प्रथम क़्रमांकावर आहे. डॉ.बाबासाहेब यांच्या परदेशी प्रवासा बद्दल घेतलेला छोटासा आढावा.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भातील जाहीर केलेले ऑनलाइन प्रदर्शन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबईतील एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर १९१२ या वर्षात त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठात अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयात बी.ए.ची पदवी घेतलेले ते पहिले बहुजन समाजातले व्यक्ती होते. त्याकाळी बहुजन लोकांना विविध हक्कांपासून वंचित ठेवल जातं होतं. बरोडा संस्थानचे महाराजा तिसरे सयाजीराव गायकवाड हे त्या काळचे पुरोगामी विचारसरणीचे राजा होते, ज्यांनी समाजातील अस्पृश्यता नष्ट व्हावी यासाठी खूप मोठं काम हाती घेतलं होतं. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिभा आणि शिकण्याची अतोनात ओढ पाहून त्यांना प्रथम न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठ आणि नंतर ब्रिटन येथील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देवू केली. त्यांनी १९१५ मध्ये पदविका मिळवली व "नॅशनल डिवीडेंट ऑफ इंडिया-ए हिस्टोरिक अँड ऍनालीटीकल स्टडी" हा शोधप्रबंध १९१६ साली पूर्ण केला. परंतु त्यांना लंडन शहरात जाण्याची ओढ होती, कारण त्यांना भारतीय वित्त आणि चलन विषयी संशोधन करण्याची इच्छा होती. आणि त्यासाठी लागणारं साहित्य व संशोधन साधन सामग्रीही तिथे सहज उपलब्ध होणार होती.

द हिंदू या वृत्तपत्रात ए.आर. वेंकटाचलपी लिखित “द एनिगमा ऑफ अरीवल” या लेखाच्या आधारे संदर्भ मिळतो की, आपल्या स्वप्नांना योग्य आकार देण्यासाठी १९१६ साली डॉ.आंबेडकर लंडन येथे दाखल झाले आणि त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (एल.एस.ई.) येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमातील पदवी घेतली. त्यावेळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (एल.एस.ई) केवळ 21 वर्षांचे होतं. परंतु खूप कमी कालावधीत सामाजिक-विज्ञान क्षेत्रात उच्च-गुणवत्तेचे शिक्षण देण्याची लंडन स्कूल ऑफ़ एकनॉमिक्स या विद्यापीठाची ख्याती ही जगभर पसरलेली होती. याच काळात जगावर पहिल्या महायुद्धाचं सावट घोंगावत होत. या अनुशंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बडोदा संस्थानमध्ये सैन्य सचिव म्हणून बोलावण्यात आलं. त्यांनी अभ्यास थांबवून जुलै १९१७ मध्ये लंडन विद्यापीठातून चार वर्षांपर्यंत अनुपस्थिती रजा मंजूर करवून घेतली आणि डॉ. आंबेडकर मायदेशी रवाना झाले.

dr babasaheb ambedkar
जगातील सर्वांत खोल स्विमिंग पूल; VIDEO पाहून म्हणाल 'अद्भूत'

या कालावधीत १९२० साली डॉ.आंबेडकरांनी मुंबईतील सिडनहॅम महाविद्यालयात राजकीय अर्थव्यवस्थेचे प्राध्यापक म्हणूनही काम पाहिले. कोल्हापूरचे महाराज राजर्षी शाहू महाराज व इतर काही लोकांच्या सहकार्यावर एल.एस.ई. मध्ये परत आल्यानंतर प्रारंभी त्यांना अर्धवट सोडाव्या लागलेले पदव्यूत्तर शिक्षण तसेच भारतातील प्रांतीय विकेंद्रीकरणाच्याअभ्यास यावर शोधप्रबंध पूर्ण करण्यासाठी अर्ज केला. 'द प्रॉब्लम ऑफ़ रूपी' हा डॉक्टरेट साठीचा शोधप्रबंध मार्च १९२३ मधे डॉ.आंबेडकरांनी पूर्ण केला, परंतु त्यावेळी तो मान्य नाही झाला. याबद्दल काही संग्रह (Archives) पाहता लक्षात येत की, हा फारच क्रांतिकारक प्रबंध होता. परिक्षकांना तो ब्रिटीशविरोधी वाटला. परंतु आंबेडकरांनी तो पुन्हा ऑगस्ट १९२३ मध्ये सादर केला, तेव्हा नोव्हेंबर १९२३ मध्ये तो स्वीकारण्यात आला. हा प्रबंध किती दूरदृष्टी होता, हे पुढे लक्षात येत. त्याकाळी ब्रिटिश सरकारने भारतीय चलन आणि वित्त सुधारणांसाठी, ‘हिल्टन यंग कमिशन’ नेमलं होतं. या कमिशनने ‘द प्रॉब्लम ऑफ़ रूपी’ या प्रबंधाचा आधार घेतला व त्यांच्या मार्गदर्शक सूचना आणि दृष्टीकोण विचारात घेता सन १९३५ साली "रिझर्व बँक ऑफ इंडिया" ची स्थापना झाली.

dr babasaheb ambedkar
समान नागरी कायद्याची देशाला गरज; हायकोर्टाने दिले केंद्राला निर्देश

विद्यार्थी दशेतील आंबेडकर यांचा कानोसा घेताना लेखक श्री धनंजय कीर लिखित ‘डॉक्टर आंबेडकर - हीज लाइफ अँड मिशन’ हे पुस्तक वाचल्यावर, एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते ती म्हणजे, ब्रिटिश संग्रहालयात, इंडिया ऑफिस लायब्ररी, लंडनच्या विद्यापीठाचं ग्रंथालय आणि लंडनमधील इतर ग्रंथालयांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर या धेय-वेड्या विद्यार्थ्याने तासंतास अभ्यासात घालवले होते. या काळात आंबेडकरांनी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवत विविध विषयात पदवी पूर्ण केली. इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी लंडनमधून एम एससी (MSc) आणि डी एससी (DSc) पदवी मिळविली आणि नाणे विषयक धोरण आणि वित्तीय धोरण अशी दोन प्रमुख पुस्तकेही प्रकाशित केली. सोबतच आणखीन एक पुस्तक प्रकाशित केलं ज्याच्या आधारावर त्यांना कोलंबिया विद्यापीठाने पी.एचडी. देवू केली. त्याच वेळी, त्यांनी वकील म्हणूनही आपली व्यवसायिक पात्रता संपादन केली होती. त्यांना ग्रेज इन या प्रसिद्ध व प्रतिष्ठीत बार कौन्सिलमध्ये सदस्यत्वताही मिळाली.

डॉ. बाबासाहेब यांनी मुंबई- कोलंबिया- लंडन या जगातील महत्वपूर्ण शहरांना आपल्या आफाट बुद्धिमत्त्तेच्या जोरावर वयाच्या तिशीतच गवसणी घातली होती. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथील ‘साउथ एशियन ब्लॉगच्या सहसंपादक महिमा जैन यांच्या काही लेखांच्या आधारावर समजत की, लंडन येथे डॉ. आंबेडकर किंग हेनरी रोड येथील प्राइमरोस हिल क्रमांक.१० येथे दोन वर्षे मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय कलाकार, विचारवंत आणि संगीतकारांच्या शेजारी वास्तव्य केलं होत. किंग हेनरी रोडवरील मुक्कामात ते लवकर उठून प्रीमरोस हिल पासून रीजंट्स पार्क मार्गे, ते हॉलॉर्नमधील ब्रिटीश संग्रहालयात किंवा एलएसईच्या कॅम्पसमध्ये जायचे. विशेष बाब म्हणजे एकेकाळी ब्रिटिश संग्रहालय वाचन कक्ष - हा कार्ल मार्क्स, गांधी आणि जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्याही अभ्यासाच्या जागेचा साक्षी पुरावा देतो.

dr babasaheb ambedkar
Privacy Policy बद्दल WhatsApp ची मोठी घोषणा; हायकोर्टात म्हणाले...

सन १९३०-३१ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत घडलेला एक महत्वपूर्ण किस्सा इथे सांगावासा वाटतो, ज्याचा संदर्भ जगप्रसिद्ध दैनिक ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ मध्ये प्रकाशित एका लेखातून मिळतो. १९३० मध्ये डॉ. आंबेडकर गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी लंडनला आले होते. अर्थातच डॉ. आंबेडकर यांनी आपल्या अफाट बौद्धिकतेचं दर्शन देत गोलमेज परिषदेत खुप प्रभावी भाषण केलं, ज्याचं खुप कौतुकही झालं. इंडियन डेली मेल या वृत्त संस्थेने त्यांच्या वक्तृत्वाचं सर्वात 'उत्कृष्ट वक्तृत्व' म्हणून वर्णन केलं. डॉ. आंबेडकरांच्या भाषणाने प्रभावित झालेल्यांपैकी या संमेलनातील एक व्यक्ती होती ती म्हणजे बडोदा संस्थानचे राजा तिसरे सयाजीराव गायकवाड, त्यांनी आपल्या पत्नीला डॉ. आंबेडकरांच्या महानतेबद्दल, त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेबद्दल प्रशंसा केली आणि समाधान व्यक्त केलं. कारण त्यांनी दिलेली शिष्यवृत्ती ही खुपच पात्र अशा व्यक्तीला दिली गेली होती. त्यांनी डॉ. आंबेडकर यांना लंडनमध्ये एका खास रात्र भोजनासाठी लंडन येथील पंचतारांकित हायड पार्क हॉटेलमध्ये आमंत्रित केले. या रात्रीच्या भोजनाबद्दल “द न्यू यॉर्क टाइम्स” या प्रसिद्ध दैनिकात एक लेख छापला गेला ज्याचं शीर्षक होतं, “Prince and outcast at dinner in London end age-old barrier” म्हणजेच “सर्व जुन्या चालीरितींना मुठमाती देत एक राजकुमार आणि दलित मेजवानीसाठी सोबत”.

पुढे जावून 1973 मध्ये ग्रेट ब्रिटनच्या डॉ. आंबेडकर मेमोरियल कमिटीने डॉ.आंबेडकर यांचं एक पोर्ट्रेट भेट म्हणून दिलं जे “लंडन स्कूल ऑफ़ इकॉनॉमिक्स” चे संचालक सर वॉल्टर अॅडम्स यांनी स्वीकारलं आणि त्याचं अनावरण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या क्लेमेंट हाऊसच्या लॉबीमध्ये करण्यात आलं. त्यावेळी सर वॉल्टर अॅडम्स म्हणाले होते की "या शतकातील भारताच्या विकासाला आकार देण्यासाठी विद्वान आणि कृतीशील व्यक्ती म्हणून डॉ. आंबेडकर यांनी निर्णायक भूमिका बजावली."

फेडरेशन ऑफ आंबेडकर आणि यूकेच्या बौद्ध संघटनांकडून भारतीय शिल्पकार ब्रह्मेश व्ही वाघ यांनी तयार केलेला डॉ.आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला भेट देण्यात आला होता, त्याचं अनावरण 14 एप्रिल 1994 रोजी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (एल.एस.ई) संचालक, जॉन अश्वर्थ यांनी केलं होतं. तो पुतळा आजही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील ओल्ड बिल्डिंगच्या अट्रियम गॅलरीमध्ये कित्येकांना प्रेरणा देत आहे.

निर्वासहतीकरण्याच्या दृष्टिकोणातून या ठिकाणी अजून एका प्रसंगाची नोंद करण्यासारखी आहे. तो प्रसंग म्हणजे प्रतिष्ठित "ग्रे इन" या कोर्टामध्ये बाबासाहेबांच्या प्रति आदर व्यक्त करताना बाबासाहेबांच्या ६० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती निमित्त पोट्रेट्सचे अनावरण करण्यात आले होते. बाबासाहेब हे पहिले भारतीय आहेत ज्यांचे या कोर्टामध्ये एक नाही तर दोन पोट्रेट आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव गैर ब्रिटिश व्यक्ती, वकील आहेत ज्यांच्या पोर्टेटला "ग्रे इन" या प्रतिष्ठित कोर्टामध्ये स्थान दिले गेले. अजून एक मानाची बाब म्हणजे दिनांक ३० जून २०२१ रोजी ग्रेज इन कोर्टात डॉ. आंबेडकर यांचा तिसरे पोर्ट्रेट व त्यांच्या स्मरणार्थ एक रूमला आंबेडकर रूम म्हणून नाव दिल गेल आहे. जिथून त्यांनी बॅरिस्टर पदवी मिळवली तिथेच त्यांचं तैलचित्र लावणं व एका रूमला त्यांच नाव दिल जाणं हे म्हणजे एक प्रकारे अवघ्या भारताचा बहुमान केला अस आहे.

येथे विशेष बाब अधोरेखित करण्यासारखी आहे, ती म्हणजे डॉ. बाबासाहेब हे भारतासारख्या ठिकाणातून येतात जिथं इंग्रजांनी बराच काळ राज्य केलं होतं.

- ॲड. प्रविण निकम

(लेखक हे वकील असून सध्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या आंतरराष्ट्रीय विद्यापीठात मानवीहक्क व राजकारण या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत)

+91 9665277064

pravinnikamindia@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com