
MPSC : राज्य सेवेतील पारदर्शकता उत्साहवर्धक
एमपीएससीमधील (MPSC) सकारात्मक आणि पारदर्शी बदल राज्यातील युवा पिढीसाठी अत्यंत आशादायक ठरणारे आहेत. काही महिन्यांमध्ये राज्य सेवा परीक्षा हाताळणारी यंत्रणा सकारात्मक, ऊर्जावान अधिकाऱ्यांच्या हाती आली आहे. त्यामुळे एकूणच या सगळ्या यंत्रणेत चांगले बदल होत आहेत. दोन परीक्षांच्या मुलाखतींचे निकाल अत्यंत कमी वेळेत लावल्याचा विक्रम ‘एमपीएससी’ने केला आहे. याबद्दल किशोरराजे निंबाळकर, राजीव जाधव, दयानंद शिंदे आणि नाशिकचे भूमिपुत्र प्रताप दिघावकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करायला हवे. कुठलीही यंत्रणा असो मात्र जर अधिकारी, पदाधिकारी यांनी ठरवलं, मनावर घेतलं, तर काय होऊ शकतं, याचा वस्तुपाठ या अधिकाऱ्यांनी घालून दिला आहे.
‘एमपीएससी’च्या २०२१ मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेतून मुलाखतीला पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती ‘एमपीएससी’ने नुकत्याच पार पाडल्या. सायंकाळी पाचला मुलाखती पूर्ण झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत सातला अंतिम यादी जाहीर करण्यात आली. तर दुसरी घटना म्हणजे ७४ न्यायाधीशांच्या पदासाठीच्या मुलाखती ‘एमपीएससी’ने घेतल्या. सायंकाळी सातला मुलाखती संपल्यानंतर तासाभरात रात्री आठला निवड झालेल्या उमेदवारांना निवडीचे ई-मेल येऊन धडकले. मुलाखती आटोपून उमेदवार मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर पोहोचत नाही, तोपर्यंत निकाल लागलेला होता. एवढ्या जलदगतीने आणि पारदर्शी पद्धतीने प्रथमच अंतिम निकाल घोषित झाले आहेत. राज्यातच नव्हे, तर देशातील सरकारी सेवांसंदर्भातील हा विक्रम म्हणावा लागेल.
महाराष्ट्र आजवर देशाला दिशादर्शक ठरल्याचा इतिहास आहे. ‘एमपीएससी’मध्ये दोन अत्यंत महत्त्वाचे बदल होऊ घातले आहेत. पैकी एक अस्तित्वात आला आहे. दुसरा निर्णय लवकरच अपेक्षित आहे. परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात ‘ऑप्ट आउट’ पर्याय उमेदवारांना दिला गेला आहे. यानुसार एकावेळी दोन परीक्षांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना एक जागा सोडण्याचा हा पर्याय आहे. उमेदवारांनी एक जागा सोडल्यानंतर प्रतीक्षा यादीवरील उमेदवाराला तिथे संधी मिळेल. या पर्यायामुळे जागा रिक्त राहण्याचा विषय संपुष्टात आला आहे. आत्तापर्यंत ‘ऑप्ट आऊट’ पर्याय स्वीकारल्याने ३६ प्रतीक्षा यादीवर उमेदवारांना विविध विभागात अधिकारी पदावर नोकरी मिळाली आहे. प्रतीक्षा यादीवर एका वर्षासाठी दहा टक्के उमेदवारांची यादी ठेवण्याकडे ‘एमपीएससी’चा कल आहे, तर अभियांत्रिकी सेवेतील ३९ उमेदवारांनी ‘ऑप्ट आउट’चा पर्याय निवडल्याने या ३९ जागा प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना मिळाल्या आहेत.
आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे ‘वन स्टेट-वन एक्झाम’च्या दृष्टीने सध्या ‘एमपीएससी’चा प्रयत्न सुरू आहे. ‘वन स्टेट-वन एक्झाम’ अस्तित्वात आल्यास स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा प्रचंड फायदा होईल. ‘एमपीएससी’द्वारे विविध विभागांच्या परीक्षा देण्यासाठी उमेदवारांना सतत वेगवेगळा अभ्यास करावा लागतो. पण ‘वन स्टेट-वन एक्झाम’ अस्तित्वात आल्यास कोणत्याही एका परीक्षेसाठी अभ्यास केल्यानंतर सगळ्या परीक्षा देण्याची उमेदवारांची तयारी होणार आहे. त्यासाठी अभ्यासक्रमात एकजिन्नसीपणा आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जसे स्थापत्य अभियांत्रिकीची विविध पदे किमान २९ वेगवेगळ्या विभागांत असतात. स्थापत्य अभियंत्यांसाठी एमपीएससी एकच परीक्षा घेईल आणि ज्या खात्यांना अभियंत्यांची गरज आहे, त्यांना मेरिट आणि चॉईसनुसार ते उमेदवार देईल. या विषयाच्या अभ्यास आणि
अहवाल तयार करण्यासाठी चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. काही दिवसांत या संदर्भातील अहवाल आल्यानंतर त्यावर निर्णय अपेक्षित आहे. वरील दोन्ही विषय देशासाठी मार्गदर्शक ठरू शकतात, असे आहेत. राज्य सेवेतील उत्तर पत्रिकांच्या झेरॉक्स विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय असो वा विभागस्तरावर मुलाखती आयोजित करण्याची सुरवात हे विद्यार्थिकेंद्री, मानवतावादी दृष्टिकोनाचा पायंडा निर्माण करणारे आहेत.