नंदनवनातील ‘जी-२०’ची यशोगाथा

भारत सध्या जी-२० परिषदेचे अध्यक्षपद भूषवीत असून त्यानुसार या अंतर्गत काश्‍मीरमध्ये नुकतीच जी-२० गटाची एक बैठक पार पडली
g20 summit in kashmir india lead Tourism of Kashmir
g20 summit in kashmir india lead Tourism of Kashmirsakal
Summary

भारत सध्या जी-२० परिषदेचे अध्यक्षपद भूषवीत असून त्यानुसार या अंतर्गत काश्‍मीरमध्ये नुकतीच जी-२० गटाची एक बैठक पार पडली

भारत सध्या जी-२० परिषदेचे अध्यक्षपद भूषवीत असून त्यानुसार या अंतर्गत काश्‍मीरमध्ये नुकतीच जी-२० गटाची एक बैठक पार पडली. या संमेलनाच्या यशस्वी आयोजनात मला विशेष प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्याचे भाग्य लाभले.

यासाठी मला दोन दिवस अगोदर श्रीनगरला जावे लागले ( जी-२० बैठकीतील शिष्टमंडळासमोर काश्मीरच्या पर्यटनासंबंधीचे सादरीकरण करण्यासाठी राज्यपालांचे सचिव आणि पर्यटन सचिव यांना टिपण काढण्यासाठी सहकार्य). या निमित्ताने मला विविध ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. त्याचवेळी श्रीनगर शहरातील व्यावसायिक सहकारी आणि सर्वसामान्य काश्मिरी जनतेशीही संवाद साधता आला.

जी-२० परिषदेच्या निमित्ताने शहराला एकप्रकारे लकाकी मिळाली होती आणि प्रत्येक खात्याचा, विभागाचा चेहरामोहरा बदलला होता. जी-२० सदस्य देशांच्या प्रतिनिधींचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी आकर्षक पोस्टर्स लावण्यात आली होती. (उदाहरणार्थ, शिष्टमंडळाच्या स्वागतासाठी क्रीडा विभागाने ‘जम्मू जेट’ उमरान मलिकचे मोठे पोस्टर लावले होते).

g20 summit in kashmir india lead Tourism of Kashmir
G20 : ‘जी २०’ दुरुस्तीसाठी १३९ कोटींचा निधी; रस्ते चकाचक होणार का?

दरवर्षी नियमितपणे काश्‍मीरला जाणारा कदाचित मी एकमेव बिगर काश्‍मिरी ट्रॅव्हल एजंट असेल. या योगदानापोटी आमच्या राजा राणी ट्रॅव्हल्स कंपनीला ‘दोस्त ए काश्‍मीर’ म्हणून गौरविण्यात आले, हे विशेष. कलम ३७० हटविल्यानंतर आता येथे सर्वकाही पूर्वपदावर येत आहे. त्याचवेळी चित्रपट पर्यटनावरही भर दिला जात आहे.

याशिवाय वेलनेस आणि वेडिंग, पर्यटन आणि आदरातिथ्य व्यवसाय वाढीसाठी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक वाढत आहे. काश्‍मीरमध्ये जी-२०परिषदेचे आयोजन केल्याने बऱ्याच काळानंतर काश्मिरी नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसले आणि परिषदेबाबत कौतुकही. इन्शाल्ला या गोष्टी काश्‍मीरमधील स्थिती सुधारण्यासाठी फायद्याच्या ठरतील, अशी आशा आहे.

इतर भारतीयांप्रमाणेच अनेक काश्मिरी नागरिकांनाही जी-२० परिषदेचे महत्त्व समजेलच, असे नाही. परंतु या परिषदेच्या निमित्ताने उपस्थित राहिलेले प्रभावशाली देश पाहिले तरी, या बैठकीचे महत्त्व किती अधिक आहे, ते समजेल. जेव्हा एखादी गोष्ट चांगल्यासाठी घडत असते, तेव्हा इतर सर्व गोष्टी आपोआपच योग्यरितीने घडतात.

g20 summit in kashmir india lead Tourism of Kashmir
G20 Summit : 'जी२०'च्या प्रतिनिधींनी श्रीनगरमध्ये घेतला शिकारा सवारीचा आनंद

म्हणूनच मला वाटते की, काश्‍मीरमध्ये जी-२० परिषद यशस्वी होण्यासाठी चार घटकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. म्हणूनच काश्मिरी नागरिकांच्या मनावर या चार घटकांचा प्रभाव पडला त्यामुळेच हा भव्य कार्यक्रम इतक्या यशस्वीपणे पार पडला, , तोही कोणतीही अप्रिय घटना न घडता.

गेल्या सहा महिन्यांत सोशल मीडिया आणि अन्य माहितीच्या आधारे सर्वसामान्य नागरिकांनी पाकिस्तानची निराशाजनक स्थिती पाहिली आहे. चलनवाढीचे संकट, अन्नधान्याची टंचाई, अत्यावश्‍यक वस्तूंच्या पुरवठ्यातील विस्कळितपणा पाहिला. त्या देशाचे माजी पंतप्रधान आणि मंत्र्यांकडून होणारे कायद्याचे उल्लंघन, अन्याय आणि अत्याचार पाहिला. या परिस्थितीमुळे पाकिस्तानचा पर्याय म्हणून पाहणाऱ्या मंडळीच्या दृष्टिकोनात बदल झाला.

श्रीनगरमध्ये आता स्मार्ट सिटीचे परिणाम दिसत आहेत. पोलो व्यू शॉपिंग भागात युरोपीय शैलीने पादचारी मार्ग विकसित करण्यात आले आहेत. सर्व प्रमुख रस्त्याचे नूतनीकरण केले जात आहे आणि झेलम नदीच्या किनाऱ्यांना साबरमतीप्रमाणे सुशोभीकरण होत आहे. लाल चौक आणि शहरातील अन्य महत्त्वाच्या ठिकाणांना दिमाखदार स्वरूप दिले जात आहे. याप्रमाणे काश्मिरी नागरिक हे खऱ्या अर्थाने उच्च दर्जाचे राजधानीचे शहर म्हणून अनुभव घेऊ शकतात.

कोरोनाचे सुमारे दोन वर्ष संकट सहन केल्यानंतर काश्‍मीरमध्ये पर्यटनात अभूतपूर्व वाढ दिसून येत असताना उच्च प्रतीच्या हॉटेलचे सरासरी दर वधारले आहेत. या ठिकाणी एका रात्रीसाठी ४० हजार रुपयांपेक्षा अधिक भाडे आकारले जात असून हाऊसबोटला कोरोनापूर्व स्थितीपेक्षा पाच पट अधिक भाडे मिळत आहे.

g20 summit in kashmir india lead Tourism of Kashmir
G20 Summit : जून महिन्यात जी २०च्या होणार दोन बैठका; ९ मे रोजी केंद्रीय पथक तयारीचा आढावा घेणार

मुंबई-श्रीनगर विमानाच्या रिटर्न तिकिटासाठी सुमारे ४० हजार रुपये मोजावे लागत आहेत. काश्‍मीरमधील बहुतांश निवासाचे बुकिंग फुल्ल झाले आहे. काश्‍मीर खोऱ्यात पैशाचा वाढता ओघ पाहून बहुतांश काश्मिरी नागरिकांना आता शांतता आणि सद्भावाबरोबरच पर्यटन व्यवसाय असाच बहरलेला असावा, असे वाटत आहे.

यात भरीस भर म्हणजे जी-२० परिषदेने चार चाँद लावले आहेत. परिषदेच्या निमित्ताने शंभरहून अधिक मोटारी, मिनी व्हॅन्सचा ताफा, अनेक देशांचे प्रतिनिधी आणि चित्रपट व पर्यंटन क्षेत्रातील मान्यवर , भागीदार मंडळीची वर्दळ हे चित्र सामान्य काश्मिरी नागरिकांसाठी स्वप्नवत होते. त्यांच्यासमवेत असणाऱ्या अनुवादकाव्यतिरिक्त अन्य काश्मिरी नागरिकांचाही या परिषदेमुळे उर भरून आला आहे. एका अर्थाने, या परिषदेमुळे श्रीनगरला जागतिक नकाशावर आणल्याचा त्यांना आनंद होत आहे.

काश्‍मीरमध्ये तीन दिवसीय जी-२० परिषद झाली, ती अतिशय महत्त्वाची होती आणि त्यात प्रामुख्याने भर चित्रपट पर्यटन यावर होता. त्यात गट चर्चा, सादरीकरण, आंतरराष्ट्रीय मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शन याचा प्रामुख्याने समावेश होता.

बैठकीतील चर्चा आणि संवादापेक्षा सर्वांना मोहित करणारी एक गोष्ट ठरली आणि ती म्हणजे काश्‍मीरचे सौंदर्य. त्याचा अनुभव ते सहजपणे घेऊ शकत होते (सुरक्षा कवच असतानाही). त्या जोडीला यजमान राज्याने जागतिक तोडीचे केलेले आदरातिथ्य हे पाहुण्यांना भारावून टाकणारे होते.

काश्‍मीरचे आकर्षण असलेल्या शांत दल सरोवरात त्यांना घेऊन जाणारा आकर्षक शिकारा, दर्जेदार काश्मिरी हस्तकलेचे सादरीकरण करण्यासाठी स्थापन केलेले सुपर स्मार्ट एन्क्लेव्ह, दररोजची सायंकाळ मंत्रमुग्ध करणारे सांस्कृतिक कार्यक्रम, पोलो व्हू येथील बाजारहाट, प्रसिद्ध मुघल गार्डनची भेट, रॉयल स्प्रिंग गोल्फ कोर्समधला आल्हाददायक वावर या गोष्टींचा तीन दिवस मनमुराद आनंद प्रतिनिधींनी घेतला.

काश्‍मीरच्या सौंदर्याने त्यांना भूरळ पडली आणि तेथून त्यांचे पाय निघत नव्हते. मात्र, याचा प्रत्यक्ष अनुभव स्थानिकांना घेता आला नाही. त्यांनी प्रसारमाध्यमे टिव्ही आणि यूट्यूबवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून या गोष्टी पाहिल्या. तरीही स्थानिक काश्मिरी नागरिकांसाठी शिष्टमंडळानी विविध ठिकाणांना दिलेल्या भेटी, पर्यटन हे सुखद धक्का देणारे होते.

जी-२० परिषदेच्या निमित्ताने जम्मू काश्‍मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, पर्यटन मंत्री कृष्णा रेड्डी यांना भेटण्याचा योग आला आणि आनंदही वाटला. पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री जितेंद्र सिंह, जम्मू काश्‍मीरमधील पर्यटन आणि अन्य खात्याचे अधिकारी, मान्यवर व्यक्तीच्या भेटीगाठी झाल्या. त्यांच्याकडे मी वर मांडलेल्या चार गोष्टींचा उल्लेख केला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, मी सलाम करतो आणि आभार मानतो आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे. त्यांनी यशस्वीपणे काश्‍मीरमध्ये जी-२० परिषदेचे आयोजन करून दाखविले.

अर्थात माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचा आणि अभिमानाचा क्षण म्हणजे जी-२० परिषदेचे शेरपा (सर्व जी-२० कार्यक्रमाचे प्रभारी) अमिताभ कांत यांनी दौऱ्यादरम्यान शिष्टमंडळाला अचानक वाटेत थांबविले आणि माझी पाठ थोपटत राजा राणी ट्रॅव्हल्स ॲड अभिजित पाटील हेच खरे ‘दोस्त ए काश्‍मीर’ असे सर्वासमक्ष जाहीर केले!

जय हिंद!

अभिजित पाटील, अध्यक्ष, दोस्त ए काश्‍मीर राजा राणी ट्रॅव्हल्स प्रा.लि

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com