जनाईचा विठ्ठल !

Continue the tradition of meeting Shri Vitthal and Saint Sawta Maharaj
Continue the tradition of meeting Shri Vitthal and Saint Sawta Maharaj

संत जनाईचे अभंग म्हणजे उत्कट अशा भावकविताच आहेत. जनाबाईचे भावजीवन इतर कोणत्याही कवयित्रींच्या तुलनेत अधिक संपन्न वाटण्याचे प्रमुख कारण म्हणजे तिचे विठ्ठलाशी असलेले सख्यत्व होय. विविध पातळीवर तिचे विठ्ठलाशी प्रस्थापित झालेले नाते आहे. संत नामदेवांच्या घरी दासी असलेली पोरकी जनी आपला पोरकेपणाचा अभाव भरून काढण्यासाठी विठ्ठलच आपल्या जीवनाचे सारसर्वस्व मानते. जनाईच्या साडेतीनशे अभंगांपैकी जवळपास दीडशे अभंगात विठ्ठल केंद्रस्थानी आहे. तिचे अवघे भावजीवन विठ्ठलानेच व्यापल्याचे दिसते. ‘माय मेली बाप मेला। आता सांभाळी विठ्ठला।। मी तुझे गा लेकरू। नको मजशी अव्हेरू।।’ अशी हृदयस्पर्शी याचना ती करते. मायबाप नसल्यामुळे आपला कैवार विठ्ठलानेच घ्यावा अशी आर्त हाक ती देते. ‘तुजवाचूनी विठ्ठला। कोणी नाही रे मजला।।’ असा पोरकेपणाचा भाव विलक्षण व्याकुळतेने प्रकट करते. अवघ्या जगाचा पिता असलेल्या विठ्ठलाचे कृपाछत्र लाभले तर आपले पोरकेपण संपायला वेळ लागणार नाही, ही तिची श्रद्धा आहे. म्हणून विठ्ठलाकडे ती पुन्हा-पुन्हा विनवणी करते. स्वतःच्या पोरकेपणाचा आधार घेऊन विठ्ठलाचे प्रेम मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करते. जनाईला आठवावा असा भूतकाळ नाही, रमावे असे वर्तमान नाही, आत्मसमर्पण करावे असा भविष्यकाळ मात्र आहे.

पोरकी जनी विठ्ठलामध्येच आपले माहेर पाहते. ‘तू माझे माहेर। काय पाहतोसी अंतर।।’ असे ती विठ्ठलास म्हणते. वडील, आई, छोटा भाऊ, बाल सवंगडी, प्रियकर अशा विविध नात्यांतून ती विठ्ठलाकडे पाहते. त्याच्याशी वेगवेगळा संवाद प्रस्थापित करते. त्यातून शाश्वत नात्याचा अखंडितपणे शोध घेते. विठ्ठलास मानवी पातळीवर उतरण्यास भाग पाडून त्याचे मानवीकरण केल्यामुळे जनाईचा विठ्ठल लौकिकातील सामान्य माणसासारखा दिसतो. वास्तव सत्याचा धागा न सोडता मानवी रूपातील विठ्ठलासोबत ती संवाद साधते. ‘ये गं ये गं विठाबाई । माझे पंढरीचे आई।।’ अशी मातृत्वाची हाक देते. विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी काम सोडून त्याच्या मंदिरात न जाता त्यालाच आपल्या घरी बोलावते. ‘दळिता कांडिता। तुज गाईन अनंता।। मायबाप बंधुबहिणी। तूं बा सखा चक्रपाणी।।’ असे ती म्हणते. जनाईच्या ध्यानी, मनी आणि स्वप्नी विठ्ठलाचा ध्यास आहे. म्हणून ‘देव खाते देव पिते। देवावरी मी निजते।।’ अशी कबुली ती देते.

जनाई ज्या विठ्ठलाच्या भेटीसाठी व्याकूळ होऊन वाट पाहते, अखेर तो आपल्या हृदयातच सापडल्याची अनुभूती उत्कटतेने व्यक्त करते. ही अनुभूती म्हणजे तिचे देहपालटच आहे. या अपूर्व अनुभूतीने जनाईचे मन चैतन्याने न्हाऊन निघते. ‘देहाचा पालट विठोबाचे भेटी । जळ लवणा गाठी पडोन ठेली।।’ जळात अखंड लवण व लवणात जळ अशी ही विठ्ठल जनाईची ऐक्यावस्था आहे. दोघांनाही आता एकमेकांपासून सुटका नाही. भक्तांना मोहिनी घालून आपल्या प्रेमपाशात गुंतवणारा देव, अशी ख्याती असलेल्या विठ्ठलालाच जनाई आपल्यात गुंतवते. आपल्या हृदयाच्या बंदिखान्यात भक्तांचे हृदय चोरणाऱ्या विठ्ठलाला बंदिस्त करते. ‘धरिला पंढरीचा चोर । गळा बांधोनिया दोर।। हृदय बंदिखाना केला। आंत विठ्ठल कोंडिला।। जनी म्हणे बा विठ्ठला। जीवे न सोडी मी तुला।।’ हृदयात बंदिस्त विठ्ठलाला जिवंत बाहेर न सोडण्याचा निर्धार ती बोलून दाखवते. विठ्ठलाच्या हृदयात स्थान मिळवण्यासाठी आजपर्यंत सर्व संतांची धडपड होती. पण, जनाईचे मात्र नेमके उलटे आहे. ती आपल्याच हृदयात विठ्ठलाला बंदिस्त करते.

जनाईच्या प्रेमात गुंतलेला विठ्ठल तिच्या सावलीसारखा वावरतो. हृदयस्थ विठ्ठल तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतो. आपल्या दासी कामात मदतनीस म्हणून विठ्ठल वावरत असल्याचे ती सांगते. ‘झाडलोट करी जनी। केर भरी चक्रपाणी।। पाटी घेऊनि डोईवरी। नेऊनिय टाकी दुरी।।’ जनाईच्या प्रेमापोटी तो हलकी कामे करू लागतो. ती धुणे घेऊन नदीला जाताना लहान भावाप्रमाणे मागे लागून जातो. त्याला पुन्हा पुन्हा जनी आपल्या मंदिरात परत जायला सांगते; पण विठ्ठल तिला सोडून जात नाही.

आपला जिवाभावाचा मित्र म्हणूनही जनाई विठ्ठलाकडे पाहते. देव म्हणून त्याचे कोणतेही दडपण जनाईच्या मनावर नाही. ‘दळूं कांडुं खेळूं। सर्व पाप ताप जाळू।। सर्व जीवमध्ये पाहूं। एक आम्ही होऊनी राहूं।। जनी म्हणे ब्रह्म होऊ। ऐसें सर्वाघटी पाहू।।’ असे ती विठ्ठलास म्हणते. अखंडित सान्निध्यातून तिला विठ्ठलाचा अंत लागला आहे.

म्हणून ‘भीत नाही देवा। आदी अंत तुझा ठावा।।’ असे बेधडकपणे ती जे म्हणते, त्यातून तिचा अधिकार लक्षात येतो. विठ्ठलाच्या अंगणात थांबून त्याला जनाई शिव्यांची लाखोली वाहते. या शिव्यांमध्ये तिरस्कार नसून तळमळ आहे. येथे जनाई विठ्ठलाकडे अपत्यभावाने पाहते.

तारुण्यात पदार्पण केल्यानंतर जनीला स्त्रीत्वाची चाहूल लागते. मनात तारुण्यसुलभ प्रेमभाव अंकुरतात. जनाई निसर्गदत्त भावना दाबून न ठेवता विठ्ठला सोबत संवाद साधून मोकळी होते. आपल्या तरुण मनातील प्रणयभावाच्या पूर्तीसाठी श्रीकृष्णरूप विठ्ठलाला ती प्रियकराच्या रूपात पाहते. ‘विठोबा चला मंदिरात। गस्त हिंडती बाजारात।। रांगोळी घातली गुलालाची। शेज म्या केली पुष्पाची।।’ अशी आळवणी ती करते. या अभंगातील शृंगारिक प्रतिमांतून जनाईच्या मनातील उत्कट प्रणयभाव विलक्षण बेधडकपणे प्रकटले आहेत. स्त्रीच्या भावविश्वातील विविध टप्पे अगदी सहजपणे जनाईच्या अभंगातून साकारले. या अभंगाचे आत्मतत्त्व मात्र विठ्ठलच आहे.

---

देगलूर, ९४२०८१३१८५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com