निसर्गानंच ठरवावं उजाडपण केव्हा थांबवायचं ?

निसर्गानंच ठरवावं उजाडपण केव्हा थांबवायचं ?

आजवर इतका धिंगाणा घातलाय माणसाने पण निसर्ग देतोच आहे भरभरून. उलट हैदोस आपण घातला नसता ना, तर शुद्ध हवेचं, हिरवाईचं, सुपीक जमिनीचं, निर्मळ पाण्याचं साचलेपण झालं असतं. माणसं निरोगी आणि दीर्घायुषी झाली असती. मात्र, निसर्गातल्या घटकांनाच हाताशी धरून आम्ही चुकांची कबुली दिली आहे. आता निसर्गानंच ठरवावं हे वाढत जाणारे अतिक्रमण, वाढत जाणारं उजाडपण केव्हा थांबवायचं ?

परीक्षेबरोबर संपल पर्यावरणाचं महत्त्व
फुलं, पानं, झाडं, प्राणी, पक्षी, कीटक, नदी, नाले, झरे, तलाव, समुद्र, धबधबे, हवा, माती, आकाश, डोंगर, दऱ्या, पर्वत, टेकडी या साऱ्यांची गोळाबेरीज म्हणजे पर्यावरण. थोडक्‍यात प्रगत मानवानं यातला एकही घटक सोडला नाही ज्यावर स्वैर आक्रमण केलं नाही. झाडं, जंगलं तोडण्यासाठी, नदी, समुद्र भराव घालण्यासाठी, डोंगर फोडण्यासाठी, आकाश धूर सोडण्यासाठी असतात. या साऱ्यांवर आम्हा माणसांची नितांत श्रद्धा जडली आहे. आम्हालाही ही कल्पना नसते, की निसर्गात कुठेही आम्ही पोचलो की प्रदूषण करून येतो. शालेय जीवनात पर्यावरण दहा मार्काला होतं. त्यामुळे परीक्षेबरोबर त्याचं महत्त्वही ही संपून गेलं.

प्रगतीचा अव्याहत मार्ग
पर्यावरणाची काळजी घ्यायला सेवाभावी माणसं, संस्था, सरकारी खाती असतात, हा समज दृढ करून घेतला की मग पुढे सोपं जातं. मग नदीकाठी हॉटेल्स, डोंगरावर महाविद्यालयं, झाड कापून इमारती, टेकडी फोडून रस्ता असा प्रगतीचा महामार्ग अव्याहत सुरू राहतो. बरं आजची ही निसर्गाची हानी पुढच्या पन्नास-साठ वर्षांत त्यावेळच्या पिढ्यांना वाईट परिणाम भोगायला लावेल यातली गंभीरता मनाला आज जाणवावी इतकी संवेदनशीलता केव्हाच संपून गेली आहे. अहो भाऊ, एवढा विचार नाही करायचा आणि मनाला काही लावून नाही घ्यायचं. पुढचं पुढं बघू ! विनाशाच्या वेळी आपण थोडेच पृथ्वीवर असणार आहोत? काय राव तुम्ही पण?

पर्यावरण दिवसाचा फक्त इव्हेंट
भाऊ तुम्हाला म्हणून सांगतो, पर्यावरण विषयक जागृती करण्यासाठी दरवर्षी पर्यावरण दिनाचा कार्यक्रम आम्ही आमच्या मतदार संघात घेतो. पर्यावरण दिंडी, रोपं वाटप, वृक्ष दिंडी, पर्यावरणावर निबंध स्पर्धा, पुन्हा त्याचं बक्षीस वाटप, असा जंगी कार्यक्रम घेतो आपण. गेल्यावर्षी, "पर्यावरणाचं रक्षण करा, सुखी जीवनाची वाट धरा' हा संदेश देणारे एक हजार फ्लेक्‍स वाटले, "सेव्ह ट्री, सेव्ह नेचर'ची एक लाख स्टिकर वाटली. मैदानात मोठा कार्यक्रम घेतला. तिथं "प्लॅस्टर ऑफ पॅरिस' वापरून निसर्ग उभा केला होता. थर्माकोलची सजावट, झाडांचे बुंधे वापरून डेकोरेशन, नाश्‍त्याला बर्गर आणि शीतपेयाशिवाय मोठा स्पीकर लावला होता. पाच हजार पातळ प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग वाटल्या. आकाशात झाडांचे रंगीबेरंगी शोभेचे दारूकाम केलं. आता आणखी काय करायचं पर्यावरण दिनाला? मला तर काही कळेनासं झालंय भाऊ ! हा सगळा कार्यक्रम फेसबुकवरून लाइव्ह होता. दहा हजार लाईक्‍स आले. आता बोला !

निसर्ग देतोच आहे भरभरून
भाऊ एवढी जंगलं आपण कापली पण लाकूड, प्राणी, पक्षी संपले का? जमिनी एने केल्या, अन्नधान्य कमी पडतंय का? डोंगर, टेकड्या फोडल्या, पाऊस थांबला का? पाण्याचे स्रोत, प्रवाह कुठेही कसेही फिरवले, पण पिण्याचं पाणी मिळायचं थांबलं का? उलट पूर येतात. आपल्याकडे निसर्ग कचऱ्यासारखा आहे. उगीच काही लोक बाऊ करतात. पर्यावरण वाचवा-वाचवा म्हणतात. आजवर इतका धिंगाणा घातलाय माणसाने पण निसर्ग देतोच आहे भरभरून. उलट हैदोस आपण घातला नसता ना, तर शुद्ध हवेचं, हिरवाईचं, सुपीक जमिनीचं, निर्मळ पाण्याचं साचलेपण झालं असतं. माणसं निरोगी आणि दीर्घायुषी झाली असती, त्यात मजा नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

नियोजन अन निर्णयही चुकले
निसर्गावर आपण आक्रमण केलं म्हणून उंच इमारती उभ्या राहिल्या, कारखाने उभे राहिले, मानवी वस्त्या वाढल्या, सगळीकडे रेलचेल वाढली, पैसा वाढला, रोजगार वाढला हे कोणी बघतच नाही भाऊ! आपल्या उद्योगांमुळे तर इतर अनेक व्यवसाय बहरले! आता हे सगळं करताना नियोजन चुकलं असेल, निर्णय चुकले असतील, पण काम करणारा माणूसच चुकतो हेही नैसर्गिकच आहे भाऊ ! बरं, आता या दुरुस्त्या करणं, सोपं आहे का? त्यापेक्षा नवीन चुका करण सोपं आहे ! आपल्याकडे चुकांनाही अनेक दशकांचा इतिहास आहे भाऊ !

आभाळंच फाटलय शिवणार तरी कुठं-कुठं?, आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?, सरड्याची धाव कुंपणापर्यंत !, अति तिथं माती !, डोंगर पोखरून उंदीर काढला !... निसर्गातल्या घटकांनाच हाताशी धरून आम्ही चुकांची कबुली दिली आहे. आता निसर्गानंच ठरवावं हे वाढत जाणारे अतिक्रमण, वाढत जाणारं उजाडपण केव्हा थांबवायचं ? चेंडू त्याच्या कुंपणात आहे. बरोबर ना भाऊ ?

पुणे

महाराष्ट्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com