...तर काय हरकत आहे... पाऊल मागे घ्यायला?

need for dialogue between two friends
need for dialogue between two friends

मित्राचा एक किस्सा... 
मोबाईलची रिंग वाजली...अनोळखी नंबरवरून फोन होता... 

""कसा आहेस मित्रा...'' आवाज ओळखून मित्र आनंदला.. ""सर, मी मस्त... काय म्हणताय?'' 
""काही नाही... कोकणात निघालो होतो. कोल्हापुरात आलोय. येथे आलो आणि तुझी आठवण झाली... म्हणून तुला फोन केला.'' 
दोघांमध्ये बोलणे झाले. मित्र खूश झाला. मला फोन करून त्याने झाला प्रकार सांगितला. त्याच्या सांगण्यातून आनंद ओसंडत होता. खूप दिवसांनी त्याच्या पूर्वीच्या एका वरिष्ठांनी आवर्जून फोन केल्यामुळे त्यांच्या आठवणीत आपण आहोत, या कल्पनेने तो कमालीचा सुखावला होता. प्रत्येक बाबतीतच ते वरिष्ठ असल्यामुळे आणि अनेक बाबी त्यांच्याकडून शिकलेला असल्यामुळे त्यांच्याप्रती असलेला आदर या एका फोनने आणखी दुणावला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोणतेही काम नसताना केवळ ख्यालीखुशाली विचारण्यासाठी असा अचानक फोन येणं हे त्याला खूप सुखावणारं ठरलं. त्याचा आनंद माझ्यासोबत शेअर केल्यामुळे मलाही मस्त वाटलं; मात्र त्याच्या एका वाक्‍यावर मी अडकून राहिलो. 

""कोणतेही काम नसताना केवळ आपुलकीने त्यांनी माझी चौकशी केल्यामुळे मी खूश आहे.'' या त्याच्या वाक्‍याने मी काहीसा अस्वस्थ झालो. हे खरेच आहे. हल्ली सहज ख्यालीखुशाली विचारण्यासाठी फोन केल्याची उदाहरणे दुर्मिळ बनू लागली आहेत. (फोनवर तासन्‌ तास फालतू गप्पा मारणारे महाभाग यामध्ये येत नाहीत). तुम्हीही आठवून पाहा, आपल्या दूरगावी असणाऱ्या जवळच्या मित्राला, स्नेह्याला अगदी सहजच फोन केव्हा केला होता ते? नाही आठवत ना?... हे असंच झालेलं आहे. आपण सगळेच एका शर्यतीमध्ये सहभागी झालो आहोत. प्रत्येकाला वेगाने पळायचे आहे. खूप-खूप पुढे जायचे आहे. यशस्वी होण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी आहे. ही स्पर्धा जीवघेणी आहे, अशी चर्चाही सगळेच अगदी एक सुरात करतो. प्रत्यक्षात मात्र आपणही त्याच गर्दी सामील झालेलो आहोत आणि हळूहळू आपले भानही सुटू लागले आहे. यातून बाहेर पडायला हवं. यातून बाहेर पडण्याचा प्रयत्नच केला नाही तर आपण अधिकच गुरफटत जाऊ. एक वेळ अशी येईल, की आपण हाक मारली तरी आपल्यासाठी म्हणून धावून येणारे आपले मित्र, सगेसोयरे आपल्यापासून इतके दुरावलेले असतील, की ते आपल्यापर्यंत पोचणेच अवघड होऊन जाईल. यावर उपाय आहे.... 

कधी तरी आपल्या मित्राला विनाकारण फोन करायला हवा. कधी तरी अचानक त्याला जाऊन भेटायला हवं. त्याच्याशी संवाद साधायला हवा. खरा मित्र आपले पाय जमिनीवर ठेवण्यात मोलाची कामगिरी बजावतो. कधी तरी परगावी असलेल्या आई-बाबांना अचानक भेटायला जायला हवं... कधी तरी मैत्रिणीला किंवा मित्राला कोणत्याही अपेक्षेशिवाय फोन करायला हवा... शक्‍य असेल तर भेटून संवादाचा पूल बांधायला हवा. कधी तरी अचानक बायकोच्या हातात गजरा आणून ठेवायला हवा... खूप करतेस आमच्यासाठी, म्हणत... जेवणाची अचानक ट्रीट द्यायला काय हरकत आहे? कधी तरी दमून आलेल्या नवऱ्याच्या हातात नवा कोरा शर्ट ठेवून सरप्राईज दिलं तर बिघडलं कुठं? कधी तरी आजीच्या कुशीत शिरून आपलं मोठेपण विसरायला हवं. तिच्या सुरकुतल्या चेहऱ्यावर हात फिरवत मायेची सय अनुभवायला हवी... खूप दिवस न भेटलेल्या, बोललेल्या आपल्या जुन्या मित्र-मैत्रिणीला अचानक भेट देऊन आनंद वेचायला हवा. एखाद्याविषयी मनात गिल्ट घेऊन जगत असाल तर धाडस करून त्याची माफी मागायला हवी... एखाद्याबद्दल मनात असलेली अढी विसरून संवादासाठी हात पुढे करायला हवा. अहंकाराचं कवच वेळीच हळुवार बाजूला करायला हवंय. हे सगळं करणं फारसं अवघड नाही. त्यासाठी थोडंसं मागच्या पावलावर येण्याची तयारी हवी. दोन पावले मागे येऊन लाखमोलाचा आनंद गवसणार असेल तर काय हरकत आहे... पाऊल मागे घ्यायला? 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com