esakal | ज्येष्ठ नागरिक दिन : मन आनंदी अन्‌ व्यस्त राहणे हेच मोलाचे
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ नागरिक दिन : मन आनंदी अन्‌ व्यस्त राहणे हेच मोलाचे

अलीकडच्या काळात कुटुंबातील सर्वजण कामात व्यस्त असल्याने ज्येष्ठांकडे कोणीही लक्ष देत नाही, ही बाब मात्र ज्येष्ठांसाठी निराशादायक ठरते.

ज्येष्ठ नागरिक दिन : मन आनंदी अन्‌ व्यस्त राहणे हेच मोलाचे

sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

सोलापूर : ज्येष्ठांना माया व प्रेमाची अपेक्षा कुटुंबीयांनी पूर्ण करणे अपेक्षित असतानाच परिस्थितीशी जुळवून घेणे, पुरेसा व्यायाम, व्यस्तता व सामाजिक कामे हे चार मुद्दे ज्येष्ठांच्या सुरक्षित व निरोगी जीवनासाठी उपयोगी ठरतात. नातवंडांवर संस्कार व समाजसेवा या दोन जबाबदाऱ्या त्यांच्यासाठी अधिक आनंददायी ठरतात. अलीकडच्या काळात कुटुंबातील सर्वजण कामात व्यस्त असल्याने ज्येष्ठांकडे (Senior citizen) कोणीही लक्ष देत नाही, ही बाब मात्र ज्येष्ठांसाठी निराशादायक ठरते.

एकत्र जेवण, पुरेसा संवाद व काळजी घेण्याची कुटुंबातील सदस्यांची सवय त्यांना आधार देणारी ठरते. एकलकोंडेपणाने नैराश्‍य वाढते. पण घरातील सर्व सदस्य धावपळीत असले तरी त्यांनी साधलेला संवाद, विचारपूस त्यांना कायम ऊर्जा देणारी ठरते. स्वतःला व्यस्त ठेवणे अत्यंत आवश्‍यक बाब ठरते. त्यामध्ये सामाजिक काम, करमणूक, बागकाम, संगीत, वाचन, लेखन, धार्मिक कार्य अशा अनेक कार्यांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवण्याची गरज वृद्धापकाळात असते. याशिवाय समवयस्क मित्रासोबत गप्पाटप्पादेखील तेवढ्याच आनंददायी ठरतात. ही व्यस्तता शारीरिक व्यायाम घडवून आणते तसेच मनाला कामांत गुंतवून ठेवते. कुटुंबासोबत व परिस्थितीसोबत जुळवून घेण्याची तयारी असणेदेखील आवश्‍यक असते. मनाचा उत्साह भरपूर असला तरी शरीर साथ देत नाही. तेव्हा ही स्थिती समजून घेत परिस्थितीशी जुळवून घेतले पाहिजे.

अनेकवेळा या वयात आजारपणाचा त्रासदेखील होऊ शकतो. तो सहन करून त्यावरचे उपाय करून घेताना धैर्य कायम ठेवण्याची गरज आहे. कुटुंब व समाजाकडून अधिकच्या अपेक्षा बाळगल्या तर अपेक्षाभंगाचे दुःख वाट्याला येऊ शकते. तसेच गरजेपुरता व्यायाम केल्यास अन्न पचवणे व शरीर निरोगी राहण्यासाठी ते उपयुक्त ठरू शकते.

हेही वाचा: Solapur : हजारो एकर शासकीय जमिनींचे बेकायदेशीर वाटप!

मुळातच ज्येष्ठांनी परिस्थितीशी जुळवून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच मन आनंदी ठेवून त्याला कोणत्यातरी काम, छंद, समाजसेवा आदीमध्ये गुंतवून ठेवले तर ते अधिक उपयुक्त ठरते. निरोगी जीवन असण्यासाठी पुरेसा व्यायाम असावा. अनेक सामाजिक कामांत ज्येष्ठांना गुंतवून घेता येते.

- घनश्‍याम दायमा, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ, सोलापूर

सकाळी फिरण्याची सवय अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच दुपारी शक्‍यतो ज्येष्ठांनी झोपणे टाळावे. म्हणजे रात्रीची झोप चांगली होते. आहारात दोन पोळ्या, भाजी व एखादे फळ असावे. नातवंडांमध्ये वेळ घालवावा. अन्य छंद किंवा समाजसेवादेखील करता येईल.

- कल्पना रायते, राजस्व नगर, सोलापूर

हेही वाचा: Solapur : 'भीमा' उभारणार 90 कोटींचा आसवनी प्रकल्प!

शासनाने नुकतीच ज्येष्ठांसाठी शरद आरोग्य योजना आणली आहे. या योजनेची अंमलबजावणी तत्काळ केली जावी. ज्येष्ठांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर आहे. त्याकडे लक्ष द्यावे. रेल्वे प्रवास सवलत पुन्हा सुरू करावी.

- अशोक शंकर बगाडे, जुळे सोलापूर

कुटुंबात नातवंडांना चांगल्या पद्धतीने सांभाळावे. त्यांच्यावर संस्कार करण्याचे काम ज्येष्ठांनी केले पाहिजे. भजन व भक्तीच्या माध्यमातून वेळ घालवावा. कमी आहार असावा. शांत राहून स्वतःचे मन आनंदी ठेवून त्याला कामात गुंतवावे. थोडा आधी काळापासून व्यायामाची सवय असेल तर ती पुढे वृद्धापकाळात उपयोगात येते.

- निर्मला ओझा, कार्यकारिणी सदस्या, ज्येष्ठ नागरिक संघ, वर्धमान नगर, सोलापूर

loading image
go to top