esakal | 'शाळा सुरू करा' हीच असेल शिक्षक दिनाची भेट
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा

'शाळा सुरू करा' हीच असेल शिक्षक दिनाची भेट

sakal_logo
By
डॉ. रूपेश चिंतामणराव मोरे, कन्नड

यंदा शिक्षक दिनाच्या निमित्ताने सतत एक विचार मनात येतो आहे की, गेल्या एकोणीस महिन्यापासून आम्हा शिक्षकांचे शाळेत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकविणे बंद आहे. या काळात आमच्या शिक्षक असण्यातील अर्थ काहीसा धूसर होत चालल्याची भावना बोचू लागली आहे. या काळात आम्हाला शिक्षकपण जगता आले नाही,याची मानत खंत आहे. ऑनलाइन शिक्षण, ऑफलाईन शिक्षणासाठी आमच्या शिक्षक बांधवांनी आपापल्या परीने प्रयत्न केले आहेत. पण आमचे ते प्रयत्न सर्वच विद्यार्थ्यांपर्यत पोहचण्यासाठी अपुरे पडले हेही वास्तव आहे.

त्यामुळे यंदा आपण शिक्षक दिनाच्या शुभेच्छा तरी कशा स्वीकारायच्या? असा प्रश्न मला सतावतो आहे. शासनाला जर शिक्षकांना शिक्षकदिनाच्या शुभेच्छा द्यायच्याच असतील तर राज्यातील सर्व शाळा सुरू करून त्या शुभेच्छा द्याव्यात. आम्हा शिक्षकांसाठी याच शुभेच्छा अनमोल असतील. शाळा सुरू करणे का आवश्यक आहे? व त्या कशा पद्धतीने सुरू करता येऊ शकतात? यासाठी हा लेखन प्रपंच आहे.

सध्या अस्तित्वात नसलेल्या तिसऱ्या लाटेची भीती आत्ता का?

गेल्या एकोणावीस महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद आहेत. कोरोनाची दुसरी लाट आता बऱ्यापैकी ओसरली आहे,पण सध्या नसलेल्या पण भविष्यात येण्याची शक्यता असलेल्या तिसऱ्या लाटेच्या भीतीने टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला होणारा विलंब चिंतनीय आहे. दुसरी लाट ओसरली आहे, तिसरी लाट कधी येईल हे आता नक्की सांगता येत नाही. जर समजा भविष्यात येणाऱ्या काळात तिसरी लाट आलीच तर तेव्हा पुन्हा शाळा बंद करता येतीलही, पण आज कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आहे. या काळाचा फायदा घेऊन शासनाने आताचा काळ उपयोगात आणायला हवा. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी, शासनाने शाळा सुरु करण्यासाठी पावले उचलायला हवीत.

शाळा बंदमुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान मोठे

राज्यातील ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत.आता शासनाने प्राथमिक विभागाचे वर्गही सुरू करायला हवेत. प्राथमिक विभागाचे वर्ग सुरू करणे हे शैक्षणिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे. छोट्या वर्गातील सर्वच मुले ऑनलाइन शिक्षणाला उत्तम प्रतिसाद देतील अशी खात्री नाही. त्यामुळे प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्याला शिकवल्या जाणाऱ्या लेखन, वाचन, संभाषण, अंकओळख, मूलभूत गणिती क्रिया या क्षमता जर योग्य वेळी मुलाला शिकविल्या गेला नाहीत, तर मुले अभ्यासात मागे पडण्याची दाट शक्यता असते. छोटी मुलं शिकवलेला भाग लवकर विसरतात, हीच मुले मोठ्या वर्गात गेल्यावर त्यांना मूलभूत संकल्पना समजलेला नसल्या तर त्यांचा अभ्यासातील रस कमी होत जाईल. त्यामुळे पुढे ही मुले शाळाबाह्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सेतू आणि नियमित अभ्यासक्रमाच्या निमित्ताने, सेतू चाचणीच्या संदर्भात आम्ही विद्यार्थी संवाद, गृहभेटी करतो आहोत. शिक्षक म्हणून आमचे जे निरीक्षण आहे त्यात विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर आधीपेक्षा खराब झाले आहे. मुले अभ्यास विसरली आहेत हे प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे माध्यमिक वर्गासोबत प्राथमिक शाळेचे वर्ग सुरू करणे खूप गरजेचे आहे .

असे सुरू करावेत प्राथमिक शाळेचे वर्ग

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात प्रत्येक वाड्या, वस्ती, तांडा, पाड्यावर, गावात किमान एक तरी प्राथमिक शाळा आहे. त्यात राज्यातील जवळपास ९० टक्के पेक्षाही जास्त प्राथमिक शाळा या जिल्हा परिषदेच्या आहेत. एकूणच जिल्हा परिषदेचा ज्या शाळा आहेत त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त शाळांत पटसंख्या की पन्नास विद्यार्थ्यांपेक्षा कमी आहे.दोन शिक्षकी शाळा आहेत. या सर्व शाळा खेडेगावांमध्ये आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव जवळपास नाहीच आहे किंवा अपवादात्मक ठिकाणी तो असला तरी त्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे ग्रामीण भागात वीस ,तीस, चाळीस,पन्नास पटसंख्येच्या प्राथमिक शाळा सुरू करता येऊ शकतात. शिक्षक आणि विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती या शाळांमध्ये ठेवता येऊ शकते. शारीरिक सामाजिक अंतराची समस्या इथे एवढी जाणवणार नाही. शाळेच्या परिसरात माध्यमिक विभागाचे वर्ग भरत नसल्यामुळे या शाळा सुरू करणे शक्य आहे. शासनाने या मुद्द्याचा गांभीर्याने विचार करायला हवा.

मोठ्या शहरांमध्ये किंवा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या प्राथमिक शाळेमध्ये ५० टक्के क्षमतेने विद्यार्थी शाळेत बोलावून शाळा सुरू करण्याचा विचार शासनाने करायला हवा. दहावी-बारावीचे वर्ग सुरू करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच प्राथमिक विभागाचे वर्ग सुरू करणेही महत्त्वाचे आहे, हे शासनाने लक्षात घ्यायला हवे.

शहरी भागातील माध्यमिकचे वर्ग त्वरित सुरू करावेत

गेल्या १५ जुलैपासून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरू झाले आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थिती ही समाधानकारक आहे. शाळेमध्ये आल्यामुळे एखादा विद्यार्थी कोरोना बाधित झाला आहे . अशी बातमी ऐकण्यात आली नाही .हा अनुभव लक्षात घेता राज्य सरकारने शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग लवकरच सुरू करायला हवेत. ग्रामीण भागातले वर्ग सुरू होऊन होऊन दीड महिन्याहून अधिक कालावधी लोटला आहे. शहरात अजून इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झालेले नाहीत ,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा अभ्यास शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा पुढे गेला आहे.अजून पुढे जर काही काळ शहरातील शाळांच्या बाबतीत निर्णय झाला नाही, तर भविष्यात ग्रामीण व शहरी भागातील मुलांचे एकावेळी मूल्यमापन करण्याबाबत काही प्रश्न उभे राहतील. या कारणांमुळे शासनाने शहरी भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यायला हवा .

शहरातील शाळा सुरू करण्यास अडचण काय?

'शहरांमध्ये सर्वच मुलं मोठ्या घरची आहेत, सर्व शाळा या ऑनलाईन सारख्या सुविधा देतात' अशी परिस्थिती नक्कीच नाही. शहरात बोटावर मोजण्याइतक्या शाळा श्रीमंतांच्या पाल्यांना शिक्षण देतात. बाकी शाळांमध्ये कष्टकरी, गरीब कुटुंबातील पालकांची मुले शिकतात. ही मुले अधिक काळ शाळा बंद राहिल्या तर बालमजुरीकडे वळू शकतात. त्यामुळे ही मुलं बालकामगार बनण्याआधी शिक्षणाच्या प्रवाहात राहण्यासाठी शहरी भागांमध्ये शाळा सुरू करणे खूप गरजेचे आहे. ग्रामीण भागामध्ये कोरोना मुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याच्या अटीवर आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. महानगराला लागून असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील शाळा (स्कूल) या नियमांचा फायदा घेऊन सुरू झाल्या आहेत. या 'स्कूल' मध्ये जाणारे बहुतांश विद्यार्थी शहरी भागातून स्कूल बस द्वारे महानगराला लागून असलेल्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये जातात. जर शहरातून मुले आपल्या ग्रामीण हद्दीतील 'स्कूल' मध्ये जाऊन शिक्षण घेतात , तर मग शहरातील शाळा सुरू करण्याला काय अडचण आहे ? या बाबींचा विचार करून शासनाने शाळा लवकर सुरू करायला हव्यात .

प्रत्येक मूल दररोज शाळेत असावे...

मागील एकोणावीस महिन्यांपासून मुले शाळेपासून दूर आहेत आता मुलांना शाळेत येण्याची तशी सवय राहिली नसेल आणि आपण पन्नास टक्के उपस्थितीचा नियम लावून मुलांना एकदिवसा आड शाळेत बोलावले तर मुले घरी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एका दिवशी पन्नास टक्के मुले शाळेत बोलविण्या ऐवजी एकाच दिवशी ५० टक्के मुलं एका(सकाळ) सत्रात व ५० टक्के मुलं दुसर्‍या (दुपार) सत्रात अशा पद्धतीने शाळेत मुले बोलावली तर मुलांना दररोज शाळेत येण्याची सवय लागेल . अभ्यासाची गोडी लागेल दररोज मुले शिक्षकांच्या संपर्कात राहतील. शिक्षकांना दररोज विद्यार्थ्यांचा अभ्यास बघता येईल, त्यांना अभ्यास देता येईल. या कोरोना काळाने शाळा व शिक्षक यांचे महत्त्व नव्याने अधोरेखित झाले आहे. आईविना पोरक्या झालेल्या मुलाला कोणी कितीही प्रेम दिले तरी त्याला आईच्या प्रेमाची सर येऊ शकत नाही. अगदी शाळेचेही तसेच आहे. मुलांना घरी ठेवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कितीही चांगले शिकविले तरी त्याला प्रत्यक्ष शाळेची सर येऊ शकत नाही. शाळा हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे. या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करून शाळा त्वरित सुरू करण्याविषयी सकारात्मक निर्णय घेऊन आम्हा शिक्षकांना शिक्षक दिनाची भेट द्यावी.

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

loading image
go to top