esakal | इंद्रजाल, मांडूळ, घुबड, कासवामुळे खरंच धन लाभ होतो? अंधश्रद्धेला आणखी किती खतपाणी I Anthozoa Hexacorallia
sakal

बोलून बातमी शोधा

Anthozoa Hexacorollia

सातारा व कऱ्हाडमध्ये पूजेचे साहित्य विकणाऱ्या दुकानांवर वन विभागाने कारवाई करत इंद्रजाल जप्त केले.

इंद्रजाल, मांडूळ, घुबड, कासवामुळे खरंच धन लाभ होतो?

sakal_logo
By
संजय शिंदे

कष्टाविना धन मिळावे, यासाठी कोण कोणत्या थराला जाईल, हे सांगता येत नाही. सातारा व कऱ्हाडमध्ये पूजेचे साहित्य विकणाऱ्या दुकानांवर वन विभागाने (Forest Department) कारवाई करत इंद्रजाल जप्त केले. याप्रकरणी पाच जण ताब्यात घेतले आहेत. हा प्राणी वन्यजीव अधिनियमानुसार विक्री व जवळ बाळगणे बेकायदेशीर आहे. इंद्रजाल घरात, दुकानांत ठेवल्यास समृद्धी येते, या अंधश्रद्धेमुळे या बाबी बाळगल्या जात आहेत. या साऱ्या प्रकारांमागे अंधश्रद्धा आहे हे लोकांना सांगणार कोण?

सातारा व कऱ्हाडमध्ये पूजा साहित्य दुकानावर छापा टाकून इंद्रजाल प्राणी जप्त करून पाच जणांवर कारवाई केली. हा प्राणी वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार अनुसूची १ मध्ये संरक्षित प्रजातीमध्ये असून, त्याची विक्री व अवैधरीत्या जवळ बाळगणे बेकायदेशीर आहे, तरीही लोक अंधश्रद्धेपोटी तो बाळगत आहेत. घराघरांमध्ये इंद्रजाल अथवा घोरपडीचे अवयव असणारे हातजोडीचे साहित्य शोधून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याचे आव्हान वन विभागासमोर आहे. इंद्रजाल ही वनस्पती असल्याचे अनेकांना वाटते. मात्र, खोल समुद्रात खडकावर वाढणारा हा प्राणी आहे. वन्य जिवांच्या दुर्मिळ व नष्ट होत चाललेल्या प्रजातीमध्ये त्याचा समावेश आहे.

हेही वाचा: साताऱ्यात वनविभागाची धाड; 4 लाखांच्या इंद्रजालासह 80 किलो चंदन, 600 मोरपीस जप्त

नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे व सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करण्याचे काम इंद्रजाल करते, अशी लोकांची भाबडी भावना असल्याने अनेक जण घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावतात. इंद्रजाल आणि घोरपडीचे अवयव घरात, कार्यालयात, दुकानात ठेवल्यास सुखशांती, आरोग्य आणि लक्ष्मी नांदते, या अंधश्रद्धेपोटी या वस्तू बाळगल्या जातात. इंद्रजालप्रमाणेच मांडूळ, घुबड व कासवामुळे धनाचा लाभ होतो, या भाबड्या आशेपोटी लोक ते बाळगणे व त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्यास तयार होत आहेत. मात्र, ही अंधश्रद्धा कशी फोल आहे, हे सांगण्यासाठी समाजातून व सरकारी पातळीवर जाणीवपूर्वक प्रयत्न झाले, तरच वन्यजीवांचा जीव वाचणार आहे. अथवा आज कऱ्हाड, साताऱ्यात, उद्या आणखी कोठे अशी साखळी जिल्ह्याबरोबरच संपूर्ण राज्यात सुरूच राहणार आहे. श्रम न करता कोणत्या तरी अज्ञानाचा फायदा घेऊन जास्तीतजास्त पैसा मिळवता येईल, या भ्रमापोटी या गोष्टी जन्माला येतात. लहान वयापासून विज्ञाननिष्ठेचे आणि निर्भयतेचे संस्कार करणाऱ्या विविध यंत्रणा उभ्या करण्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची जरुरी आहे. एकविसाव्या शतकात आपण आहोत; पण मनाने किती मागच्या काळात रेंगाळत आहोत, याचेच हे पुरावे. याला पायबंद घालण्यासाठी वैज्ञानिक दृष्टी रुजली पाहिजे.

हेही वाचा: इंद्रजाल विक्रीप्रकरणी सातारा, कऱ्हाडामध्ये वन विभागाचे छापे

समुद्रात अस्तित्व महत्त्वाचे

इंद्रजाल ही वनस्पती असल्याचे अनेकांना वाटते. मात्र, खोल समुद्रात खडकावर वाढणारा हा प्राणी आहे. वन्य जिवांच्या दुर्मिळ व नष्ट होत चाललेल्या प्रजातीमध्ये त्याचा समावेश आहे. त्यामुळे समुद्री परिसंस्था उच्च दर्जाची राहण्यासाठी या प्राण्याचे समुद्रात अस्तित्व महत्त्वाचे आहे, असे वनअधिकाऱ्यांनी सांगितले.

loading image
go to top