Tukaram Beej : स्वातंत्र्याचा सर्वांगीण विचार करणारे तुकोबाराय खरे वाटाडे!

हे महामानवा, बा तुकारामा! आजही आपले निर्वाण आठवले की; आठवतात तुमच्या जीवनातील अनंत वेदना आणि त्यापासून जन्मलेल्या जिवंत अभंग संवेदना! उणेपुरे ४२ वर्षे लाभलेले देदीप्यमान आयुष्य! आपले जगणे आपल्या वर्तमानाला हलवून गेले आणि आमचा वर्तमान, भविष्यकाळ फुलवून गेले! आयुष्याचे सोने होणे म्हणजे काय? तुकाराम!
Tukaram Beej 2024
Tukaram Beej 2024esakal

(तुकाराम बिजेनिमित्त प्रा. डॉ. विठ्ठल खंडुजी जायभाये यांचा विशेष लेख)

हे महामानवा, बा तुकारामा! आजही आपले निर्वाण आठवले की; आठवतात तुमच्या जीवनातील अनंत वेदना आणि त्यापासून जन्मलेल्या जिवंत अभंग संवेदना! उणेपुरे ४२ वर्षे लाभलेले देदीप्यमान आयुष्य! आपले जगणे आपल्या वर्तमानाला हलवून गेले आणि आमचा वर्तमान, भविष्यकाळ फुलवून गेले! आयुष्याचे सोने होणे म्हणजे काय? तुकाराम! यावच्चंद्रदिवाकरौ म्हणजेच तुकाराम! स्वतःच्या जगण्याच्या कविता करणारा हा वेडा कवी कधी अनंत जन्म-मरणाच्या कविता लिहून गेला ते त्यालाही कळले नाही!

एखाद्या कवीच्या कविता विकून आणि त्या गावून अनेकांनी आपले इमले उभे केले, गाड्या-घोड्या घेतल्या! केवळ तुझ्यामुळेच अनेकांची लग्ने जुळली! केवढा पुण्यवान तू बापा! किती किती अनमोल बीज पेरून ठेवलेस! एवढेच काय तुझ्या नावाने वारकरी संस्था निघाल्या, त्यातून संस्थानिक तयार झाले, मात्र अजून आम्हाला खरा तुकाराम कळलाच नाही! हे बा, तुकारामा! आज तुझ्या नावावर महाराष्ट्रभर ढोंगी बक्कळ पैसे घेऊन गावोगाव तुझा वेश परिधान करून तुझ्या निर्वाणाच्या निमित्त मगरीचे अश्रू ढाळताहेत! ओरडून लोकांना "तुकोबाराय हे एक महान त्यागी, वैरागी संत होते" असे सांगताहेत. अनेकांनी तर अजून तुझा संपूर्ण गाथा वाचलाही नाही (तेंव्हा त्यांना संपूर्ण तुकाराम कळणार कसा?) आणि तेच तुझ्या नावावर पोतेच्या पोते भरत आहेत! हे तुकोबा, आपलं काय व्हायला हवं होतं? आणि आम्ही काय करत आहोत? जिकडे पहावे तिकडे आग लागली आहे.

Tukaram Beej 2024
ED Raids: लॉकर किंवा भिंतीत नव्हे, चक्क वॉशिंग मशीनमध्ये दडवले होते 2.54 कोटी रुपये; ईडीच्या छाप्यात झाले उघड

आज तर अक्षरशः पाणी पेटले आहे! बा तुकारामा, तुझ्या फोटोचा कोण कोण आणि कुठे कुठे दुरुपयोग घेतोय? असे एक अनेक प्रश्न नित्य सतावत असतात! सडेतोड कविता लिहिणारा तुकोबा आमचा वारस असतांना आज आमच्या कविता थिजल्या आहेत. आज लोक खूप शिकले आहेत, परंतु तुझ्या सारख्या कविता फार काही भेटत नाहीत. ज्या शिवबांना आणि मावळ्यांना तूच पाईकीचे अभंग सांगून आपण आपले राज्य, रयत यांच्याशी कसं एकनिष्ठ राहून लोकसेवा केली पाहिजे (?) हा उपदेश केला होता. तो उपदेश तर आम्ही केंव्हाच विसरलो आहोत, तुकोबा! शिवबा आणि तुमचा फोटो मात्र आम्ही एकत्र खुशाल लावतो आहोत! त्या फोटो वापरण्याच्या बदल्यात मांसाहार आणि दारू पिणे मात्र सुसाट सुरु आहे.

असे असले तरी सर्व काही संपले आहे असे मानणारे आम्ही नाहीत. बा तुकोबा! आपल्या जाण्यानंतर आज पावणे चारशे वर्षानंतरसुद्धा तू केवळ अन् केवळ तुझ्या शक्तिशाली शब्दांनी आमच्यात जिवंत आहेस! बा तुकोबा, आपला एकेक अभंग आम्हाला शंभर हत्तींचे बळ देऊन जातो. त्या बदल्यात आम्ही मात्र तुझे ऋण फेडू शकत नाहीत. आपल्या अभंगातील एका एका वचनावर अनेक ग्रंथ होतील एवढं सामर्थ्य त्या हृदय शब्दांत आहे.

Tukaram Beej 2024
Shivsena UBT: तिकिट जाहीर पण आले ईडीचे समन्स, ठाकरे गटाचे उमेदवार अडचणीत; काय आहे प्रकरण?

अमृताची फळें अमृताची वेली । ते चि पुढे चाली बीजाची ही ॥१॥

ऐसियांचा संग देई नारायणा । वोलाचा वचना जयांचिया ॥ध्रु.॥

उत्तम सेवन सितळ कंठासी । पुष्ट कांती तैसी दिसे वरी ॥२॥

तुका म्हणे तैसें होइजेत संगें । वास लागे अंगें चंदनाच्या ॥३॥

असे एक एक अनमोल रत्न प्रकट करणारे तुकोबाराय आपल्याला कुठे नेवून ठेवताहेत? आपल्याला काय विचार करायला लावताहेत? आणि आज आपण काय विचार करत आहोत? माय-बाप वाचक सज्जनहो, आज आपण काय आणि कसा विचार करत आहोत? त्यावरच आपले वर्तमानातील आनंदी जगणे आणि भविष्यातील अनमोल विचारांची पेरणी अवलंबून आहे. आपल्या वाढत्या वयाबरोबर आपल्याला प्रगल्भता आलीच पाहिजे. भेदाचे विचार मावळले पाहिजे. जे काय बोलायचे ते समोरासमोरच बोलले पाहिजे. तुकोबांचा वरील अभंग त्यांच्या विचारांची उंची लक्षात आणून देतो.

स्वातंत्र्याचा सखोल आणि सर्वांगीण विचार करणारे तुकोबाराय म्हणजे खरे वाटाडे. आज आपण तुकोबांचे वैश्विक विचार वाचल्यावर आपल्याला आपले हसू यायला लागते! एकही दिवस शाळेत न गेलेले तुकोबा अखंड आयुष्य शाळेत शिकणाऱ्या आणि शिकवणाऱ्यांना अजून कळलेच नाहीत! यापेक्षा शिक्षणाचे दुर्दैव ते काय म्हणावे? आपल्याला फळ कोणते हवे आहे? अमृताचे फळ हवे असेल तर वेल सुद्धा अमृताचीच लावावी लागेल. मग त्या वेलीला फळे, बीजही अमृताचेच येणार! इथे आई-वडील-आपत्य असा त्रिवेणी संगम तुकोबा घडवून आणतात. तुकोबांनी इथे कुटुंबाचे त्रैराशिक मांडले आहे. आपले प्रमाण काय? इच्छा काय? त्यावर आपले फळ अपेक्षित आहे. अगदी याचा आपण सखोल विचार करायला पाहिजे.

तसेच संगतीचा परिपाक सुद्धा तेवढाच तोलामोलाचा आहे. महान लोकांच्या संगतीने आपण कृतार्थ व्हावे. ज्यांच्या वचनात ओल आहे तीच मंडळी माझे संगती. अन्न कसे असावे? खायला उत्तम, कंठाला थंड आणि जे शरीराचे पोषण करते तशी संगती हवी. चंदनाच्या संगतीत क्षणभर जरी राहिले तरी त्याचा सुगंध दरवळतो. त्या न्यायाने अमृताच्या संगतीत आम्ही सतत रहावे अशी तुकोबा प्रार्थना करतात. तुकोबा वाचले की; कुणाचीही प्रतिभा फुलून यावी. त्याच न्यायाने आज तुकोबांच्या निर्वाणादिनी त्यांच्या जीवनाचे असे चिंतन होते.   

धन्य म्हणवीन इहलोकी लोका । धन्य आम्ही तुका वाचीयेला॥

वाचून तव अभंग जीवनी अमृत । जगण्याचे हे वृत्त सांपडले॥

नको बडबड नको बा देखावा । तुकोबा ठसावा खोल अंतरात॥

नको काही मागणे कुणाशी । वाचिन लिहीन तुकोबा अहर्निशी॥

कीर्तन भजन झाला पैशाचा खेळ । भक्तीचा मेळ लागेची ना॥

काय मिळे मग देवही रुसला । अंतरी बा ठसा ठसला नाही॥

हिंडती दारोदार विकती तुकोबा । यापरीस भिकोबा बरे देवा॥

तुकाराम म्हणून तुका हरविला । सौद्याने खचविला कीर्तनात॥

न हे वारस तुकोबांचे होती । वेश मंबाजीचे फिरती घेउनीया॥

जर तुकाराम आज आला खाली । काय काय चाली दिसतसे॥

धाय मोकलून रडे  हे पाहून । ढोंग चाले बा सोंग कीर्तनात॥

नको कीर्तन नको बा भजन । पुन्हा मी डोंगरात जातो बापा॥

भाव भक्तीचा तुम्ही बाजार मांडला । तुकोबा रडला कीर्तनात॥

सोडली कंबर बसला खाली । गेला दूरदेशी पक्षी भुर्र उडून बा॥

चला तर मग! आपल्या परंपरेला आपण जपलेच पाहिजे. आपल्या पूर्वजांचा वसा-वारसा मोठ्या ताकदीने पुढे नेतांना येणाऱ्या काळात सामान्य माणसांनी संतांच्या श्रेष्ठत्वाचा अनमोल खजाना अबाधित राखतांना आपल्याला मोठ्या जबाबदारीने वागावे, बोलावे, लिहावे लागेल. तुकोबांना साता समुद्रापार नेऊन त्यांच्या महान प्रतिभेचा, त्यागाचा, विचारांचा, अक्षरांचा, चरित्र, चारित्र्य, जीवनाचा महान संदेश जगभर पोहोचवावा लागेल.

विविध भाषेत तुकोबांच्या अभंगांचे भाषांतर, चिंतन झाले पाहिजे. ज्यांना हिंदी येते त्यांनी तुकोबा हिंदीतून, इंग्रजी येते त्यांनी तुकोबा इंग्रजीतून अनुवादित करून जगभर पसरविला पाहिजे. तुकोबांच्या संगतीने आपण आपले जीवन कृतार्थ करून घेतले पाहिजे. आपला वर्तमान आणि भविष्य उज्वल करायचे असेल तर तुकोबांच्या शब्दांची आजीवन कास धरावी लागेल. त्यांच्या विचारांचे अनुसरण करावे लागेल! असे होणे म्हणजे त्यांच्या बीजाचे वृक्षात रुपांतर होणे आहे, अन्यथा केवळ देखावा! जय तुकोबाराय!

प्रा .डॉ. विठ्ठल खंडुजी जायभाये

कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय, सोनपेठ जि. परभणी (महाराष्ट्र)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com