'ती'ची उध्दारकर्ती सावित्रीबाई माझी!

'ती'ची उध्दारकर्ती सावित्रीबाई माझी!

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची आज (ता. 3) जयंती. त्यानिमित्त त्यांच्या कार्याविषयी.. हिंदू धर्मात शतकानुशतके दृढ झालेले मतभेद, जातिभेद, लिंगभेद, अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा, रूढीप्रिय घातक परंपरा व अन्यायी धर्मकल्पना यांमुळे शुद्रातिशूद्र व स्त्रिया यांच्यावर अन्याय होत होता. स्त्रियांची परिस्थिती अत्यंत दयनीय होती. माणसाला माणसासारखे वागविण्याचा साधा माणुसकीचा विचार त्याकाळी लयाला गेला होता. ज्ञान ही फार मोठी सत्ता असून स्त्रिया आणि दलित बहुजन वर्गाची उन्नती त्याच्याशिवाय होऊ शकणार नाही. हे ओळखून प्रत्यक्ष शिक्षण प्रसाराच्या कार्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी स्वत:ला आयुष्यभर वाहून घेतले. 

सन 1854-55 मध्ये देशातील साक्षरता अभियानाची सुरूवात जोतीराव व सावित्रीबाई यांनीच केली. संपूर्ण देशात मुलींसाठी शाळा आणि नेटीव्ह लायब्ररी सर्वप्रथम सुरू करण्याचे श्रेय या पती-पत्नींकडेच जाते. खंडोजी नेवसे पाटील नायगाव (जि. सातारा) येथील मातब्बर शेतकरी, न्यायी, उदार व धार्मिक स्वभावाचे होते. त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई नम्र व सेवाभावी स्वभावाच्या होत्या. अडल्या-नडल्या सर्वांचीच मदत करायच्या. सुपीक जमिनीत बी पेरले म्हणजे चांगले उगवते, चांगले फोफावते तसा या मातीचा गुण. कर्तव्यदक्ष व धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या घराण्यात इ. स. 1831 मध्ये सावित्रीबाईंचा जन्म झाला होता. पुण्यातील गोविंदराव फुले शेती व्यवसाय सांभाळून फुलांचा धंदा करीत. त्यांच्या प्रतिष्ठित व्यक्‍ती म्हणून नावलौकिक होता. स्वभावाने शांत, परोपकारी, धार्मिक वृत्तीचे होते. धनकवडीचे झगडे पाटील यांची मुलगी चिमणी हिचा विवाह गोविंदराव फुले यांच्याशी झाला होता. त्यांना दोन मुलगे होते. थोरला राजाराम, धाकटा जोतीराव. जोतीरावांच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत चिमणाबाईंचे निधन झाले. निधनानंतर मावस बहीण सगुणाबाईंनी राजाराम व जोतीरावांचे संगोपन केले. संस्कार केले. व्यायामपटू, सदृढ, निरोगी, देखण्या व शिक्षण घेत असलेल्या जोतीरावांचे वय तेरा वर्षांचे झाले. त्याकाळी बालविवाह करीत असत. सावित्रीबाई नऊ वर्षांच्या झाल्या. देखणी, निरोगी, गुणसंपन्न, घरकामात तरबेज, सद्‌गुणी सावित्री जोतीरावांसाठी पसंत झाली. इ. स. 1840 मध्ये हा लग्नसोहळा मोठ्या उत्साहाने पार पडला. मानवमुक्तीच्या महान कार्यात दोन शक्ती एकत्र झाल्या होत्या. गोविंदरावांचे घर मीठगंज पेठेत गोरगरीब व दीनदुबळ्या लोकांच्या वस्तीत होते. सावित्रीला या लोकांचे दु:ख पाहून माणुसकीचा गहीवर येई. मनात करूणा निर्माण होई. मानवतेच्या महान शिकवणुकीची रूजवणूक सावित्रीच्या मनात या काळात झाली. 

सगुणाबाई एका गोऱ्या इंग्रजी साहेबांकडे घरकाम करण्यास जात. साहेबांच्या बायकोने प्रेमाणे सगुणाबाईंना रंगीबेरंगी चित्रांचे पुस्तक दिले. सगुणाबाईंनी ते पुस्तक पाहण्यासाठी सावित्रीबाईंना दिले. सावित्रीने जिज्ञासापोटी चित्रांचा अर्थ सांगण्याची गळ जोतीरावांना घातली. जोतीरावांनी चित्रांचा अर्थ सांगितला. सावित्रीच्या मनोमन उत्सुकतेपोटी जोतीरावांनी सावित्रीस तेव्हापासून लिहायला, वाचायला शिकविण्यास सुरूवात केली. मळ्यातील आंब्याच्या झाडाखाली भारतीय स्त्रीच्या ज्ञानाच्या युगाचा प्रारंभ झाला. सावित्री व सगुणाबाई बुद्धिमान होत्या. शिक्षणात दोघीांनीही चांगली प्रगती केली. नॉर्मल स्कूलच्या मिचेल बाईंनी दोघींचीही कसून परीक्षा घेतली व स्कूलमध्ये तिसऱ्या इयत्तेसाठी प्रवेश दिला. दोघीही मेहनती व जिद्दी स्वभावाच्या होत्या. चौथ्या वर्षाची परीक्षा पास झाल्या. गोविंदरावांच्या घरातील दोन स्त्रिया देशातील सर्वप्रथम प्रशिक्षित शिक्षिका झाल्या. अभूतपूर्व घटनेने जोतीरावांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. ज्या घटनेमुळे समतेच्या आधारावर मानवी मूल्यांची जोपासना करण्याची प्रवृत्ती वाढीस लागली. योगायोगाने ही प्रेरणाही जोतीरावांना सावित्रीने दिली. त्याकाळी शुद्रांना उच्चवर्णीयांच्या लग्नकार्यात, धर्मकार्यात, धर्मकार्यात वावरण्यास मज्जाव होता. सखाराम परांजपे व जोतीराव जिवाभावाचे मित्र होते. सखारामने थोरल्या भावाच्या लग्नास जोतीरावांना जोतीरावांना आग्रहाने बोलावले होते. जोतीराव लग्नास गेले. नवरा मुलगा मिरवणुकीने जात होता. मोठ्या आनंदाने जोतीराव लोकांसोबत चालत होते. 

ब्राह्मणांचा मिथ्या अभिमान बाळगणाऱ्या काही ब्राह्मणांनी जोतीस ओळखले. शूद्राच्या मुलास आपल्याबरोबर लग्नाच्या वरातीत चालण्याचा अधिकार नाही. या कृत्यामुळे आपला धर्म बाटतो आहे. त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. रागाने बेभान झाले. एकजण जोतीरावांच्या अंगावर धावून गेला. आमच्यासारख्या उच्चवर्णीय ब्राह्मणांबरोबर लग्नाच्या मिरवणुकीत तुला चालण्याचे धाडस तरी कसे झाल? तुझ्या या कृत्यामुळे आमचा धर्म बाटला. आम्हाला विटाळ झाला. चल हट मूर्खा, जा निघून या मिरवणूकीतून। अत्यंत अपमानास्पद भाषा ऐकून जोतीबांना काही सुचेनासे झाले. डोक्‍यात विचारांचा कल्लोळ माजला. ते शब्द जिव्हारी लागले. त्यांची अस्मिता उंचबळून आली. अपमान सहन न झाल्याने त्यांच्या अंगाची लाहीलाही झाली. रागाने फणफणत ते घरी आले. विहिरीतील पाणी काढून भडाभडा डोक्‍यावर ओतून घेतले. सावित्रीबाई कपडे देत म्हणाल्या, तुम्ही शिकून ज्ञानी बनलात. वाचनाने मान अपमानाची समज आली. बाकीचे लोक तर जनावरांपेक्षाही हलके जीवन जगत आहेत. त्या लोकांचा स्वाभिमान जागा करून त्यांना शहाणे कोण करून देणार? '' सावित्रीने मुलभूत प्रश्‍न परखडपणे मांडले. जोतीबांना मनोमन्‌ पटले. सावित्रीने एक सत्य उलगडून दाखविले. निरागसपणे जोतीरावांना म्हणाल्या, तुम्ही मला जसं शिकवून शहाणं केलंत, तसं सर्वांना शिकवून शहाणं करा.'' सावित्रीनेच भावी उदात्त कार्याचा स्फुल्लींग चेतविला. 

ज्ञान नाही, विद्या नाही । ते घेण्याची गोडी नाही। 
बुद्धी असून चालत नाही। त्यास मानव म्हणावे का? 

या काव्यपंक्‍ती सावित्रीबाईंच्या काव्य फुले ' या पद्य संग्रहातील आहेत. त्यांची बुद्धीमत्ता अफाट होती. कोणतेही निर्णय त्या दूरदृष्टीने पण अचूक घेत. सावित्रीबाई नसिर्ग कवियित्री होत्या. पिवळा चाफा', जाईचे फूल', काव्यफुले, ओव्या, माझी जन्मभूमी, गुलाबाचे फूल, फुलपाखरू आणि फुलाची कळी, अभंग बावनकशी सुबोध रत्नाकर यांसारख्या कविता लिहून आपल्या प्रतिभेचे दर्शन केले आहे. कारणपत्वे सावित्रीबाईंनी पतीला नायगावहून तीनपत्रे लिहिलेली उपलब्ध आहेत. अवितर उद्योगासारखा दुसरा मित्र नाही ही त्यांची भावना होती. 1 जानेवार 1848 मध्ये पुण्यात भिडे वाड्यात मुलींच्या शाळेत सावित्रीबाई पहिल्या शिक्षिका झाल्या ही घटना ऐतिहासिक आहे. पतीपत्नींनी एक विचार व धाडसाने पुणे परिसरात अठरा शाळा सुरू केल्या. याचे दायित्व सावित्रीबाईंकडे जाते. अतिशय कार्यप्रवण राहूनही जोतीरावांना पती, गुरू व सहकारी म्हणून नेहमीच आदराचे स्थान दिले. सावित्रीबाईंचे दूरगामी विचारांचे, अचूक च धडाडीचे निर्णय जोतीरावांनी स्वीकारून अंमलात आणले आहेत. सावित्रीबाईंच्या सर्वगुणसंपन्न व साहसी व्यक्‍तीमत्वाचे जोतीरावांना खूप कौतुक असे. त्यांच्याच साथसांगत सहकार्याने मी शैक्षणिक व सामाजिक सुधारणांचे कार्य करू शकलो ह्याची कबूली दिली आहे. बालहत्या प्रतिबंधक आश्रम, दुष्काळ, व्हिक्‍टोरिया आश्रम, जोतीरावांचे अखेरचे आजारपण, यशवंतचा दत्तकपुत्र म्हण स्वीकार, प्लेगची साथ इत्यादी प्रसंगात सावित्रीबाईंनी अहोरात्र अविरत कष्ट उपसले. शैक्षणिक कार्यातून सर्व स्त्रियांना कायमस्वरूपी समृद्ध व स्वावलंबी बनविले. आजन्म त्यांच्या ऋणात राहण्यात आनंद वाटेल. अशा चिरस्मरणीय, स्फूर्तीदात्री, युग स्त्री सावित्रीबाई जोतीराव फुले यांना मन:पूर्वक साष्टांग दंडवत! 

Edited By : Balkrishna Madhale

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com