उभ्या आयुष्यात बहिणीला असं रडताना पाहिलं नव्हतं...

उभ्या आयुष्यात बहिणीला असं रडताना पाहिलं नव्हतं...

पोलीस उपनिरीक्षक कल्याणी सकुंडे-पिसाळ. माझी मोठी बहिण. सध्या मुंबईला सेवा बजावत आहे. गेल्या महिन्यात तब्येत बरी नसल्यामुळे तिनं सुट्टी घेतली होती. याच सुमारास कोरोना विष्णाुच्या काही केसेस पुणे आणि मुंबईत समोर येत होत्या. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन देशभरात लॉकडाऊन जाहीर झाला. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत होते. खास करुन मुंबईमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. कल्याणी गावाकडेच इकडे सुट्टीवर असल्यामुळे आम्ही मात्र निवांत होतो. दरम्यान पंधरा दिवसांपूर्वी अचानक तिच्या सिनीयर ऑफिसरचा फोन आला. त्यांनी तिला सांगितले होतं की, '' मॅडम.. कोरोनामुळं पोलीसांवरचा ताण खूप वाढलाय. सर्वांच्या डे-नाइट ड्युट्या चालू आहेत. त्यात काही पोलीसांना क्वारंटाईन केलंय. आम्हाला माहिती आहे, तुम्ही 'सीक लिव्ह' वरती आहात. पण तरीही तुम्ही ड्युटीवर आलात तर बरं होईल." 

हा फोन आला आणि घरातलं वातावरणच बदललं. काहीजण तर म्हणाले,' राहूद्या ती ड्यूटी. वेळ पडली तर सोडून दे. जीवापेक्षा नोकरी महत्वाची आहे का ?' जयदीप पिसाळ - देशमुख म्हणजे आमच्या दाजींनी हा निर्णय कल्याणीवरच सोडला. कल्याणीने काही काळ विचार केल्यानंतर तिनं ड्युटीवर जायचा निर्णय घेतला. त्यावेळी सहाजिकच आम्ही सर्वचजण काळजीत पडलो.  ती उद्या जाणार म्हणून मीही पळशीला गेलो. जेवण झाल्यावर आम्ही सर्वजण हॉलमध्ये गप्पा मारत बसलो होतो. विश्व चॅनेल बदलत होता. त्यानं अचानक गाण्यांचं चॅनेल लागलं. त्यावर गाणं लागलं होतं 'ये जाते हुये लम्हों... जरा ठहरो जरा ठहरो'. बॉर्डर पिक्‍चरमधलं हे गाणं पहात असताना अचानक कल्याणीला भरून आलं आणि ती दाजींच्या गळ्यात पडून रडायला लागली आणि म्हणाली, '''जयदीप.... मला जर काय झालं तर पोरांना नीट सांभाळ... देवांशचं काय नाही, त्याला कुणीपण सांभाळेल. पण विशूवर ध्यान दे. तो कडकडी आहे, त्याला सगळे हाडिक झिडीक करतात.'' 

तिला रडू कंट्रोल होईना... दाजी, नाना, मम्मी, भैय्या आम्ही सर्वजण तिला समजावतोय पण तिला हुंदकाच आवरत नव्हता... मी उभ्या आयुष्यात तिला असं रडताना पाहिलं नव्हतं. तिला असं पाहून आमचे सगळ्यांचेच डोळे पाणावले होते. विश्व, देवांशही रडू लागले. दाजी तिची समजूत काढायचा प्रयत्न करत होते, '' अगं कल्याणी, का रडतीये एवढी... येडे, काय नाय होणार तुला ... आणि झालंच तर देशासाठी हुतात्मा होशील. त्यानंतर ती जे बोलली, त्यानं आम्हीही शॉक झालो. ती म्हणाली, '' जयदीप... शहीद होणं वेगळं...गोळी लागून मेलं, तर बॉडी तिरंग्यात गुंडाळून येते.मान मिळतो. हजार माणसं गोळा होतात. पण, इथं जर मला काय झालं, तर खांदा द्यायला चार माणसंही यायची नाहीत. बाकीच्यांचं सोड; माझ्या पोरांना पण मला बघायला मिळायचं नाही."  तिचं ऐकून उत्तर ऐकून आम्ही सगळेच सुन्न झालो होतो. तिच्या मनात नक्की काय चाललंय, हे आम्हाला कळून चुकलं होतं.खरंतर आम्ही कुणीच इतका विचार केला नव्हता. तिचं उत्तर ऐकून तिला समजवायला आमच्याकडे शब्द नव्हते. मलाही तिची अवस्था पहावीशी वाटेना म्हणून मी तिथून उठलो आणि थेट अंबवड्याला घरी आलो. त्या रात्री मला झोपच नाही लागली. दुसऱ्या दिवशीही तिला सोडायला जायची माझी हिम्मत झाली नाही. जयदीप दाजी आणि प्रशांत पवार तिला सोडायला गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com