सुगंधाची मैफिल...

prajakta.jpg
prajakta.jpg

सध्या कोरोनामुळे गाठी - भेटी, पिकनिक - पाटर्या, बैठक-मैफिली सगळं कसं कोपऱ्यात रूसून बसलंय. मनात खूप इच्छा असूनसुद्धा बंधनात पाय अडकलेले आहेत. परंतु कुठल्याही परवानगीशिवाय राजरोसपणे रोज संध्याकाळी आमच्या बागेत मैफिलीची जुगलबंदी दरवळते ती सुगंधाची. जाई, जुई, मोगरा, कुंदा, चमेली, जास्वंदी, शेवंती, निशीगंध, चाफा, रातराणी, गुलाब. सगळ्यांचाच जणू धुमाकूळ रंगतो, तो स्वत:च्या सुगंधाचा श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा. त्या सुगंधीत मैफिलीचा आस्वाद घेण्यासाठी मी पण बागेत पाऊल टाकलं.
 

पांढरा शुभ्र मोगरा मस्त बहरला होता. त्याच तेज फुलांफुलांतून ओसंडत होतं. जवळ जाण्याचा मोह आवरेना. पांढरा रंग हे शांततेचं प्रतीक मानलं जातं, तसाच तो अगदी शांत अभिमानाने डोलत होता झुडूपावर. मी हळूच त्याला विचारले, "मोगरे भाऊ मजेत ना?" मोगरे भाऊ म्हणाले "माझे चाहते चातकासारखी वाट बघतात हो माझी, कधी काय भेट होते. अख्खा महीलावर्ग तर जाम फिदा असतो माझ्यावर. मला विकत घेण्यासाठी चौकाचौकात थांबून मला घेऊन घरी जातात. मी देवाचे कसे आभार मानू? मला रंग नाही दिला परंतु अप्रतिम रूप दिलं सुगंधाच्या रूपाने सगळ्यांना मोहून टाकणारं. माझ्या अनेक प्रजाती आहेत. एकेरी पाकळी, दुहेरी पाकळी, मोतीया, मदनबाण, बटमोगरा, काही वेलीसारखी तर काही झुडूपा सारखी. एक बटमोगरा सोडला तर बाकी सगळ्या थोड्या फार फरकाने समानच आहेत. परंतु बटमोगरा थोडासा गर्विष्ठ हो. सहसा कोणाच्या नजरेत येत नाही. परंतु एकाच गोष्टीची खंत असते ती, आम्हाला झाडावर पूर्ण उमलू, बहरू, बागडू देण्या अगोदरच ओरबाडून नेतात.'' त्याची भावना समजून सांत्वन करणेसाठी मी बोलले, "मोगरे भाऊ कधी कधी दुसऱ्यांना आनंद व सुख देण्याचा मोठेपणा असावा. कारण तुम्ही इंडोनेशिया व फिलीपिन्सचे राष्ट्रीय फुल आहात." 


कमानीवर असलेल्या झुबकेदार जाई - जुईची नजर टपलेलीच होती माझ्यावर. त्यांना संबोधून मी बोलले "जाई - जुई बाई, तुम्ही म्हणजे मस्त जुळ्या बहिणी बरं का! एक छोटीशी तर दुसरी चांदणीच्या आकारासारखी किंचित मोठी. एक पुर्ण पांढरी शुभ्र तर दुसरी हलक्या लालसर छटा असलेली. नाजूक असल्या तरी सुवासिक. सुगंधात दोघंही वरचढ." जाई - जुई बोलल्या, "आमच्या नाजुकपणामुळे कोणी सहसा फिरकत नाही हो आमच्याकडे. छोट्या छोट्या कळ्या काढून गजरा होईपर्यंत आम्ही कोमेजून जातो. त्यामुळे कायम आम्ही वेलीवर बागडत असतो." बाजूला उभ्या असलेल्या कुंदा व चमेली तुमच्याच मोठ्या बहिणी. एक चपटी पाकळीची तर दुसरी फुगीर  पाकळीची. हळूवार पायाला गुदगुल्या झाल्या म्हणून वाकून बघितलं तर ती शेवंती. वाट बघत होती स्वत:च्या कौतुकाची. म्हटलं "शेवंताई काय चाललंय?" त्या म्हणाल्या " आमची कायमच लगबग चालू असते. फुरसत असते कोणाला? गौरी व नवरात्रीत तर शेवंतीचीच फुले व वेण्या वाहील्या जातात. दसरा, दिवाळी, लग्नसराईत आमचाच पहीला मान. आम्ही एकदा झाडावर उगवलो की १५-१५ दिवस मजा करत असतो. त्यातून आकर्षित करणारे आमचे विविध आकार व रंग भूरळ टाकतात म्हणूनच आम्हाला "फुलांची राणी" असंही संबोधलं जातं.

जवळच असलेल्या उंच उंच निशीगंधाने मान हलवून हलवून लक्ष वेधून घेतलं.  "व्वा  निशीगंध दादा तुमच्या सुगंधात जादू आहे बरं का आकर्षित करण्याची आणि बहरायला लागला की महिनोन महीना एका पाठोपाठ एक बहरतच असतो. तुमच्यात पण दोन प्रजाती असतात. एकेरी पाकळी जी जास्ती सुवासिक हार व गजरा या साठी वापरतात व दुसरी दुहेरी पाकळी जी बुकेसाठी वापरतात. बराच लौकिक मिळविला आहेस तू." चाफ्याच्या झाडाखाली जरा पाय मोकळे करावे म्हणून बसले ते चाफा कानात येऊन कुजबुजायला लागला, "माझे सगे सोयरे  भरपूर आहेत हो.  पांढरा चाफा, हिरवा चाफा, पिवळा चाफा, कवठी चाफा, सोनचाफा, नाग चाफा, भुई चाफा. तुम्हाला माहित आहे का नाग चाफा हा श्रीलंका देशाचा राष्ट्रीय वृक्ष! आम्ही सगळेच एका पेक्षा एक वरचढ सुगंधाच्या बाबतीत. पांढरा चाफा तर  ठाण मांडून बसलेला असतो झाडावर.  मर्यादित कालावधीतला पाहुणा म्हटला की तो भुईचाफा. त्यांचे जादूचे किस्से तर अफलातून. उन्हाळ्यात तो पूर्ण अदृष्य होत़ो व जमीनीतून  डोकावतं ते एक फिक्या जांभळ्या ऱंगाच अतीशय नाजुक सुवासिक फुल." निसर्गाच्या कुशीतले दडलेले हे एक एक कलागुण यांचा विचार करत करत लक्ष वेधलं ते मोहक रंगबेरंगी जास्वंदीच्या ताफ्याकडे. लाल, केशरी, पिवळा, हिरव्या पानांत लपलेले निळा, जांभळा,पारवा.. जणू. काही इंद्रधनुष्यातले रंगच सांडून गेलेत. त्यात भर  गुलाबी, सफेद, राणी  रंगाच्या जास्वंदीची. "जास्वंदी बेन , एवढी चमक? काही खास बात?" लालबुंद जास्वंद गर्वाने बोलली " आमचा दिनक्रम ठरलेला असतो. 


सुर्योदयाबरोबर उमलायच व सुर्यास्त बरोबर मावळायच. आमचा सहवास नेहमी बाप्पा सोबत असतो हेच आमचं तेज असण्याच खरं कारण. अभिमान आहे की आम्ही बाप्पाचे लाडके, आमच्या उपस्थितीशिवाय पूजा होतच नाही. बाप्पाच्या चरणी नतमस्तक व्हायला भक्तांची झुंबड असते, तर आमचं बस्तानच कायम बाप्पाच्या चरणी. कोपऱ्यात लपलेली रातराणी ही तीच्या झुबकेदार शेंड्यांपेक्षा खेचून घेत होती ती तीच्या धुंद करणाऱ्या सुगंधाने. " राणी, काय म्हणताय? जग जेव्हा साखर झोपेत असत तेव्हा तु आसमंत बेधुंद करून टाकते ते तुझ्या मुक्त स़ंचाराने. रात्रीचा तुला कोणी प्रतीस्पर्धी नसल्याने तूच तर "नाईट क्विन" आहेस." सगळ्यांच्या स्वागता साठी असलेला 'फुलांचा राजा'गुलाब राजा , त्याच्या बद्दल काय बोलणार?  कित्येक आकार व रंग ठासून भरलेत. फ्रेंडशिप डे असो वा व्हेलेंटाईन डे त्यांच्या शिवाय मजा नाही.  त्याला एकच सांगावं वाटलं, " अहो राजे, बाहेरून काटेरी जरी असले तरी आतून मधाळ आहात बरं का तुम्ही" आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानकरी पण. इराण व इराक चे  राष्ट्रीय फुल हे गुलाबच आहे.


अशा ह्या अनोख्या मैफिलीचा आस्वाद घेता घेता मन सुगंधीत झालं ते प्राप्त झालेल्या सुगंधाच्या ठेव्यामुळे. वादळ, वारा, पाऊस अशा खतरनाक येणाऱ्या अडीअडचणी वर मात करून जर ही फुलं रोजच बहरत आहेत तर मग कोरोना सारख्या भयंकर साथीवर मात करून आम्ही पण नव्या उमेदीने, नव्या जोमाने आपले पुर्ववत दिनक्रम नक्कीच सुरू करू व त्या साठी लागणार आहेत त्या पाच महत्त्वाच्या गोष्टी म्हणजेच, संयम, सहकार्य , श्रध्दा,शांती व आत्मविश्वास. आपली पाच बोटं एकत्र आल्यावर जी पंजात शक्ती निर्माण होते तीच शक्ती ह्या पाच गोष्टीत असल्यावर कोरोनाला आपल्या शक्ती पुढे नमतं घेऊन माघार घ्यावीच लागेल यात शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com