... सगळेच भानावर येऊयात... 

 सुनील माळी
रविवार, 22 मार्च 2020

""गर्दी करू नका, रविवारी जनता कर्फ्यु करूयात,'' असं आवाहन कुणी केलं, सरकार कोणत्या पक्षाचं आहे, पंतप्रधान कोण आहेत आणि मुख्यमंत्रीपदी कोण बसलं आहे, याला आता काडीचीही किंमत नाहीये.

आज सकाळी काय झालं..., इयरफोन लावून तळजाई टेकडी उतरवणारा तरूण दिसला. मध्येच तो पचकन थुंकला. त्याला हाक मारली तर ऐकू आली नाही. मग हातानंच त्याला खूण केली अन "थुंकू नको', अशी विनंती केली. तो ओशाळला आणि हात वर करत "सॉरी' खूण करत निघून गेला... टेकडीवरच्या वनउद्यानाचं दार बंद आणि त्यावर "कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्यानात प्रवेश बंद आहे', असा फ्लेक्‍स लावलेला. तरीही दरवाजा चढून आत गेलेले तरूण तशाच पद्धतीनं येताना दिसले... 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुजाण नागरिकांनो...., असं करू नका... आता आपण सगळेच भानावर येऊ यात... 

ही वेळ आहे आपणच ठरवलेल्या एका विचारामागे एक होऊन उभं राहण्याची अन तसं वागण्याची. एकमेकांना सुरक्षित ठेवण्याची. 

""गर्दी करू नका, रविवारी जनता कर्फ्यु करूयात,'' असं आवाहन कुणी केलं, सरकार कोणत्या पक्षाचं आहे, पंतप्रधान कोण आहेत आणि मुख्यमंत्रीपदी कोण बसलं आहे, याला आता काडीचीही किंमत नाहीये. आता आपल्या सगळ्यांच्याच जिवाचा, अगदी जिवंत राहण्याचाच प्रश्‍न उभा ठाकलाय. त्यामुळं ठरवलेल्या काही गोष्टी आपण सगळ्यांनीच तंतोतंत पाळणं आवश्‍यक आहे. 

Coronavirus : ‘चला, सारे मिळून, कोरोना हटवूया’

आपण ठरवलंय ना, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करायची नाही, बागा-उद्यानं बंद करायची-तिथं अजिबात जायचं नाही. अगदी आवश्‍यक खरेदीसाठीच मोजक्‍या वेळाच बाहेर पडायचं, कामावर ठेवण्यात आलेल्या अत्यावश्‍यक सेवांशिवाय कुणी सार्वजनिक-खासगी वाहनांनी ये-जा करायची नाही. मग असं असेल तर मग या लिखाणासोबतच्या फोटोत दाखवल्याप्रमाणं बंद दारावर चढून उद्यानात जायचा दुराग्रह आपण का बरं करतो ? 

... अशा प्रकारांनी आपण काय करतो आहोत ? आपणच ठरवलेल्या नियमांना आपण तोडतो आहोत. कुणी रस्त्यावर थुंकतो, कुणी बंद उद्यानाचं दार चढून आत जातो, कुणी हातावर "क्वारंटाईन्ड' असा शिक्का मारून घरी बसण्याची सक्ती केलेल्या प्रशासनाला धुडकावून गर्दीत फिरतो, अशा कुणाला रेल्वेतून उतरवलं जातं, कुणी पार्ट्या देतो, लागण झालेला कुणी दवाखान्यात न जाता घरीच स्वतःला डांबून घेतो पण उपचारांअभावी आपला संसर्ग दुसऱ्याला लागण्याच्या शक्‍यतेची फिकीर करत नाही, दुबईहून आलेला कुणी त्रास होत असतानाही विमानतळावर उतरण्याच्या आधी स्वतःच औषध घेऊन त्रास तात्पुरता लांबवतो अन त्यामुळं तपासयंत्रणेला त्याचा पत्ता लागत नाही, कुणी तोंडावर उलटा हात न ठेवता खोकतो... 

हे थांबलं पाहिजे. सामाजिक एकीचं दर्शन फक्त उत्सवात एकत्र येऊन नाचण्यात, दर्शनासाठी रांगा लावण्यात, सामूहिक आरत्या अन इतर धार्मिक कृत्यं करण्यात, लग्न-पार्ट्यांना गर्दी करण्यातच घडवायचं नसतं तर केवळ आपल्या शहरावर नव्हे देशावर नव्हे तर जगातील साडेसहा अब्ज मानवजातीवर आलेलं विषाणुरूपी संकटाचा सामना करतानाही दाखवायचं असतं. इटलीसारख्या देशात एका दिवसात 627 जण, इराणसारख्या देशात अडीचशे जण मरण पावत आहेत. जगात दोन लाख 45 हजार जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झालेली आहे अन एकूण मृत्यूंनी दहा हजारांचा आकडा गाठला आहे. आपल्या देशात आतापर्यत 223 जणांना लागण झाली आहे. त्यातील सर्व राज्यांत आपला क्रमांक पहिला असून आपल्या राज्यात 63 जणांना लागण झाली आहे. रोज त्यात थोडीथोडी भर पडते आहे असं म्हणेपर्यंत शनिवारी दुपारपर्यंत आणखी 11 जणांना लागण होऊन 52 ची संख्या 63 पर्यंत वाढली आहे. त्यातल्या चार जणांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे. उत्तर प्रदेश-केरळ-कर्नाटकापाठोपाठ आपल्या शेजारच्या गुजरात राज्यातही आता कोरोनानं शिरकाव केला आहे. 

CoronaVirus : पुण्यातील सिंहगड पायथा परिसर पडला ओस: जनता कर्फ्यूला प्रतिसाद 

यातला लक्षात घेण्यासारखा भाग असा की ज्या अजस्र चीनच्या वुहानमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावाची सुरूवात झाली त्या चीननं त्यांच्या नेहमीच्या शिस्तबद्धरित्या तो आटोक्‍यातही आणलाय. घरातून बाहेर पडायचंच नाही, जीवनावश्‍यक वस्तू आणण्यासाठी एकालाच बाहेर जायची परवानगी, मोठ्या प्रमाणावर जंतुनाशकांची फवारणी, पंधरा मोठ्या रूग्णालयांची आश्‍चर्य वाटेल एवढ्या कमी वेळात उभारणी, परदेशी जाण्या-येण्यावर कडक निर्बंध या आदेशांचं काटेकोर पालन त्या देशानं केलं आणि साथ आटोक्‍यात आणली. आता तिथं नव्यानं कुणालाही कोरोनाची लागण होत नाहीये. 

परदेशाचं कौतुक करताना आपल्या देशातल्या सरकारनं, प्रशासनानं पहिल्यापासूनच ज्या गंभीरपणानं ेहे आव्हान पेलण्याची तयारी केली त्याकडंही अजिबात दुर्लक्ष होता कामा नये. त्यामुळंच आपल्याकडे अजून तेवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही आणि त्या प्रादुर्भावाचं सार्वत्रिक साथीत रूपांतर झालेलं नाही. साथ येण्याच्या सहा पातळ्यांपैकी दुसऱ्या पातळीवर आपण आहोत... 

... पण आपली पाठ आपण थोपटत असताना गाफील अजिबात राहता कामा नये. प्रशासनाच्या या तयारीला सर्व समाजाची मनापासून साथ हवी आहे. तरच कोरोनाला हद्दपार करता येईल. आनंदाचा भाग असा की या ठरलेल्या गोष्टी मनापासून पाळण्याच्या सार्वत्रिक प्रयत्नाचं प्रत्यंतर येते आहे. व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकानं बंद केली, नागरिकही त्याला साथ देताना दिसताहेत. असं असलं तरी काही जणांकडून आपण ठरवलेले नियम मोडले गेले तर सारच मुसळ केरात जाऊ शकतं. म्हणजे एखाद्या बाधिताकडून संसर्ग वेगानं पसरू शकतो. त्याची काही उदाहरणं आपल्या अवतीभवती दिसतात. तुम्हाला ती दिसली तर आपल्यापैकी कुणीही प्रेमाच्या भाषेत अशा नागरिकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देऊ यात. 

पंतप्रधानांनी रविवारी जनता कर्फ्युचं आवाहन केलंय. तो शंभर टक्के यशस्वी होणं, हे आपल्या सगळ्यांच्याच हिताचं ठरतं. मुळात कोरोनाचा विषाणु वातावरणात 12 तासांपर्यंत राहू शकतो. जनता कर्फ्यु चौदा तासांचा असला तरी शनिवारी संध्याकाळनंतर सोमवारी सकाळपर्यंतचे 34 तास आपण त्याला स्पर्श केला नाही तर तो मरून जाईल. त्यामुळं त्याचा प्रादुर्भाव आटोक्‍यात येईल. अर्थात एखाद्या वेळेला आठवड्यातून एकदा किंवा दोनदा असा कर्फ्यु पुढं लागू करावाही लागू शकेल. त्याचीही तयारी आपण ठेवली पाहिजे. परदेशाहून येणाऱ्या प्रवाशांमुळं मुख्यतः आपल्याकडे कोरोनाचा संसर्ग होतो आहे. त्यामुळे 2 पासून बंद होणारी विमानसेवा 27 नंतर पुन्हा चालू झाली की आलेल्यांची तपासणी करणं, त्यांना अलग ठेवणं याबाबीही आपल्याला कटाक्षानं कराव्या लागतील. 

काही लाख मुलं पुण्यासारख्या शहरात केवळ शिक्षणासाठी आपलं घर सोडून आली आहेत. खाणावळी बंद झाल्यानं त्यांच्या जेवणाचीच भ्रांत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात. त्यांना औषधांपासनं ते दूध-नाष्टा-जेवण देण्याचा प्रश्‍न उभा आहे. केवळ पुणंच नव्हे तर मुंबई, पिंपरी, नागपूर यांसारख्या महानगरांतल्या नागरिकांनाही ही अडचण आहे. यासाठी आपल्याला गर्दी न जमवता काही करता येईल का ? त्यासाठी आपण विचार करू. स्वयंसेवी संस्थांपैकी काहींनी हातपाय हलवायला सुरूवात केलीये, पण त्याला आता वेग यायला हवा. 

... त्यामुळं कोरोनाची ही लढाई थोडा वेळ घेणारी, आपल्या संयमाची परीक्षा पाहणारी अशी ठरणार आहे. त्यात आपण निश्‍चितच उत्तीर्ण होऊ, फक्त गरज आहे ती शिस्तीची, थोडी कळ काढण्याची, एकमेकांना सावरण्याची-शिकवण्याची...

इतर ब्लॉग्स