भारताची मदार नैसर्गिक प्रतिकारशक्तीवरच!

Lockdown-India
Lockdown-India

कोरोनाशी लढण्यासाठी देश-राज्य पातळीवर धोरणे ठरवण्यात, त्यांची अंमलबजावणी करण्यात, देशवासीयांनी त्याला साथ देण्यात आपण जसे काही प्रमाणात यशस्वी झालो तसेच काही प्रमाणात अयशस्वीही. काही उद्दिष्टे साध्य झाली आणि काही बाबतीत आपण सगळ्यांच पातळ्यांवर कमी पडलो...

या साऱ्यांचा परिणाम म्हणून आपण आज आपण एका निर्णायक टप्प्यावर उभे आहोत... समाजात आतापर्यंत छुपा असलेला कोरोना आता आपले विक्राळ रूप दाखवत, दात विचकावत बाहेर येऊ लागला आहे... नव्याने एका दिवसात लागण होत असलेल्यांचे रोज तीनशेपर्यंत मर्यादित असलेले गेल्या महिन्यातले आकडे आता तीन हजारांवर गेले आहेत आणि ते कितीपर्यंत वाढतील, याचा अंदाजही बांधता येत नाहीये... अमेरिका-इटलीतील एका दिवसात बाधित होणाऱ्यांची संख्या सहा-सहा हजारांवर गेल्याचे आपण पाहिले असल्याने आपली चिंताही वाढली आहे...एका बाजूने केवळ लक्षणे दिसत असलेल्यांचीच चाचणी करण्याचे धोरण आणि दुसऱ्या बाजूने लक्षणे नसलेल्या, पण कोरोना बाळगून तो पसरवत फिरणाऱ्या
लक्षणहिनांची संख्या साठ टक्क्यांवर, एका बाजूने मर्यादित शहरांच्या काही दाट वस्त्यांमध्ये कोरोनाची वेगाने होत असलेली लागण आणि दुसऱ्या बाजूने त्या वस्त्यांमधील किमान निम्म्या जणांना तिथून हलवून पुढची लागण टाळण्यामध्ये आलेले अपयश, एका बाजूने आधी संपूर्ण आणि नंतर हॉट स्पॉटपुरती मर्यादित ठेवलेली टाळेबंदी आणि दुसऱ्या बाजूने टाळेबंदीला दोन तासांच्या दिलेल्या सुटीमध्ये एकमेकांमध्ये मिसळून एकमेकांना करण्यात येणारे संसर्गाचे सढळ हाताने वाटप...एका बाजूने टाळेबंदीला तिसऱ्यांदा दिलेली मुदतवाढ आणि दुसऱ्या बाजूने तब्बल एक्केचाळीस दिवसांच्या टाळेबंदीला न जुमानता होणारी लागण अन मृत्यू... एका बाजूने लागण रोखण्यासाठी टाळेबंदी निकराने पाळण्याचे आवाहन अन धडपड अन दुसऱ्या बाजूने ती झुगारून मॉर्निंग वॉकपासून ते सर्व प्रकारच्या वस्तू आजच मिळाल्या पाहिजेत, या अट्टाहासाने खरेदीसाठी एकमेकांना चिकटून खरेदी करणारे नागरिक...

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशा परस्परविसंगत गोष्टींमध्ये आपण अडकलो आहोत. साधनसामग्रीची कमतरताही जाणवतेय आणि एवढे करूनही आता पुढे काय करायचे, हे उमगत नाहीये. आपण नेमके कुठे जाणार, हे कधी संपणार, याचा अंदाजही  बांधणे कठीण होतयं...म्हणूनच कोणी जाहीरपणे बोलणार नाही, पण आता हताशपणे एकाच गोष्टीची वाट पाहिली जातेय आणि ते म्हणजे निसर्गच स्वतः मार्ग काढेल, या आशेची. नेचर किल्स ऑर क्युअर, मेडिसीन्स आर फॉर अॅम्युजमेंट ऑफ डॉक्टर्स... असं म्हटलं जातं.ते काही प्रमाणात अतिरेकी असले तरी शेवटी निसर्गच ठरवतो, असं आपल्याला अनेकवेळा अनुभवाला येते आणि याही वेळी समाजाच्या अंगात कोरोना भिनल्यावर आपोआपच त्याच्याशी लढण्याची नैसर्गिक शक्ती त्याच्या म्हणजे
समाजाच्या अंगी येईल. कोरोनाची बाधा झालेल्यांच्या अंगात प्रतिजैविके तयार होतील, म्हणजेच शास्त्रीय भाषेत सामूहिक प्रतिकारशक्ती म्हणजे हर्ट इम्युनिटी तयार होईल आणि कोरोना पूर्णपणाने नाही तरी बहुतांशाने हटेल.
 
... पण हे दुर्दैव आहे प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या साऱ्या मानवजातीचे. चीनच्या दबावामुळे जागतिक आरोग्य संघटनेने साथीच्या शक्यतेचा इशारा उशिरा दिला, अमेरिका-इटलीने लागण सुरू झाल्यावरही बेदरकारपणे दैनंदिन व्यवहार सुरूच ठेवले. डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या सुरूवातीलाच आंतरराष्ट्रीय विमानउड्डाणे रद्द करून देशाची सीमा सील केली असती तर त्या देशांत आतासारखी स्थिती आली नसती, असे तज्ज्ञ सांगतात.

... आणि आपल्या भारतात काय झाले... आपण वेळीच लॉकडाऊन जाहीर केला म्हणून आपल्या देशावर स्तुतिसुमने उधळली गेली, त्याचे श्रेयही दिले-घेतले गेले. लॉकडाऊनची वेळ अचूक साधली, म्हणून हे कौतुक जरूर झाले पाहिजे, पण त्यानंतर त्याच्या अंमलबजावणीमध्ये झालेल्या चुकाही निष्पक्षपातीपणे मांडल्या पाहिजेत. पंतप्रधानांनी 24 मार्चला लॉकडाऊन जाहीर केला आणि लगेचच त्याची अंमलबजावणी सुरू झाली. तज्ज्ञांच्या मते आपली पहिली चूक तीच ठरली. लॉकडाऊन हा कडकडीत लॉकडाऊन हवा होता. याचा अर्थ पुढील एकवीस दिवस घरातून बाहेर पडता येणार नाही.कोणी बाहेर दिसला तर त्याला अटक, अशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी हवी होती. त्यासाठी जनतेला विश्वासात घेऊन तयारीसाठी तीन दिवसांची मुदत द्यायची, त्या काळात त्यांनी वीस दिवसांसाठी जे लागेल ते भरून ठेवायचे. भाजी-डाळी-तेल-तांदूळ-गव्हाचे पीठ-दुधाची पावडर... पण त्यानंतर बाहेर पडणाऱ्याची खैर नाही. पण तातडीने अंमलबजावणीची चूक केल्याने रोज जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी दोन तासांची सूट द्यावी लागली आणि या दोन तासांतच खरेदीसाठी झालेल्या गर्दीने पुढच्या बावीस तासांचा परिणाम मातीमोल ठरवला. बाहेर पडण्याचा विचारच मनात येणार नाही, अशी कडक अंमलबजावणी केली असती तर कोरोना जागीच, ज्यांच्या शरीरात आहे, तिथेच रोखला गेला असता, पण त्याऐवजी दिसले ते हात जोडणारे अन सूर्यनमस्कार घालायला लावणारे पोलिस... दंगलीच्या वेळी लागू करण्यात येणारी संचारबंदी म्हणजे कर्फ्यु आणि कोरोनासारख्या एका मिनिटात शरिरात प्रवेश करू शकणारा विषाणू दूर ठेवण्यासाठी करावी लागणारी कडेकोट संचारबंदी यांतला फरक समजायला हवा होता का नव्हता...

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अंमलबजावणीत दुसरी फट राहिली ती कोरोनाचा उद्रेक होत असलेल्या भागांमधील व्यवस्थापनाची. महाराष्ट्राचेे उदाहरण पाहिले तर राज्यातील कोरोनाच्या एकूण लागणीपैकी जवळपास नव्वद टक्के लागण ही पुणे आणि मुंबई या दोन महानगरांपुरतीच मर्यादित होती. त्यातही बारकाईने पाहिले तर या महानगरांमधल्या काही दाट वस्त्या, काही झोपडपट्ट्यासदृश वसाहतींमध्येच कोरोना एकवटला होता. त्यातील काही लाख लोकांना रोजचे जगणे घरातच जगायचे म्हटले तरी एकमेकांशी शारीरिक संपर्क येणार होता. त्यामुळे तेथील लोकसंख्येला विश्वासात घेऊन त्यातील काही लाख लोकांना पहिल्या टप्प्यातच विलग केले असते आणि त्यांच्या चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवले असते तर आज उद्रेकाची चाहूल लागली आहे तशी लागली नसती. दुर्दैवाने या उपायाची केवळ घोषणाच झाली आणि त्याची अंमलबजावणी नागरिकांवरच स्वेच्छेने सोडून दिल्याने ती केवळ हवेतील बुडबुडा ठरली. स्थानिक आणि राज्य पातळीवरील राजकीय नेतृत्वाचे हे अपयशच ठरले.

लक्षणे असलेल्यांचीच चाचणी हे धोरण कितपत योग्य ठरले, याचाही विचार व्हायला हवा. लक्षणे नसलेल्यांपैकी काही जणांमध्ये आजार बळावल्यानंतरच लक्षणे दिसून येतात, काही जणांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्याने त्यांचा आजार न दिसताच आपोआप बरा होत होता, पण तोपर्यंत त्यांनी कोरोना किती शे जणांपर्यंत पोचवला असेल आणि त्यांनी तो किती हजारांपर्यंत पोचवला असेल, याचा अंदाज तरी करता येईल का, हा प्रश्नच आहे.

...त्यामुळेच आपण आज एका भयावह पायरीवर उभे आहोत. निसर्गाची काही दाने आपल्या बाजूने पडली आहेत तर काही आपल्या विरोधात. पहिले दान आपल्या बाजूने पडले ते म्हणजे या विषाणूची संहारक शक्ती युरोपीय देशांच्या आणि अमेरिकेच्या तुलनेत कमी आहे. भारतीय आणि आफ्रिकी नागरिक त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैलीमुळे अनेक प्रकारचे विषाणू सहजी पचवतात, बीसीजीसारखी लस भारतीयांनी घेतली आहे, भारत उष्ण भागातील देश आहे, आदी अनेक कारणे त्यासाठी पुढे केली जातात. त्यात तथ्य किती ते शास्त्रज्ञ सांगतील, पण परिणाम म्हणजे आपल्याकडे मृत्यूचे आणि लागणीचे प्रमाण कमी होते. पहिल्या दहा लाख चाचण्यांमध्ये अमेरिकेत बाधा झालेल्यांची संख्या होती 1लाख 64 हजार, स्पेनमध्ये दोन लाख, इटलीमध्ये 1 लाख 52 हजार होती तर, भारतात केवळ 39,980.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्यांची संख्या कमी असल्याकडे तज्ज्ञ लक्ष वेधतात. भारताची लोकसंख्या आहे एक अब्ज तीस कोटी तर अमेरिकेची फक्त 32 कोटी. अमेरिकेतील चाचण्यांची संख्या त्रेसष्ट लाखावर गेली आहे तर, भारतातील  केवळ 11 लाख 91 हजार. लोकसंख्येच्या तुलनेत भारतातील चाचण्या कमी झाल्याचे दिसते. अमेरिकेत बाधा झालेल्यांची संख्या प्रचंड म्हणजे 12 लाख 13 हजार आणि मरण पावलेल्यांची संख्या 69 हजार आहे तर भारतात 46 हजारांना बाधा झाली असून दीड हजार जण मरण पावले आहेत. त्यामुळे भारतात चाचण्यांची संख्या कमी असल्याचे सांगितले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावाची गती भारतात वाढली असून ती चिंताजनक बाब ठरते. गेल्या आठवड्याच्या तुलनेत इटलीतील या आठवड्यातील संसर्गाचा वेग केवळ एक टक्का आहे, अमेरिकेत 2.7 टक्के, ब्रिटनमध्ये 3 टक्के तर भारतात तो 6.1 टक्के एवढा मोठा आहे.

आपल्यापुढे आता रशिया (7.5 टक्के) आणि ब्राझील (7.4 टक्के) हे देश आहेत. संसर्गाचा हाच वेग कायम राहिला तर पुढच्या आठवड्यात भारतातील संसर्ग झालेल्यांची संख्या 64 हजारांपर्यंत पोहोचेल आणि त्यापुढच्या दहा दिवसांत तो सव्वा लाखापर्यंत जाईल.

... या स्थितीतून बाहेर येण्यासाठी चाचण्या वाढवा, अशी सूचना तज्ज्ञांनी वेळोवेळी केली आणि मे महिन्याच्या अखेरपर्यंत रोज एक लाख चाचण्या करण्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी मध्यंतरी केली होती. त्यानुसार पुरेशा चाचण्या होण्यासाठी आणखी किमान एक महिना लागेल. तोपर्यंत रोज वाढणाऱ्या रूग्णांवर उपचार करण्याशिवाय दुसरा उपाय आपल्याकडे नाही. पुढील काळात आपल्याकडील आरोग्ययंत्रणा कमी पडेल का, अशी शंका असल्याने सौम्य त्रास होणाऱ्यांनी घरीच विलगीकरण करून राहावे, अशा सूचना आता देण्यात आल्या आहेत. त्यात कुणाचा दोष नसला तरी यापुढील काळात यंत्रणेवर किती ताण पडणार आहे, याचा तो इशाराच म्हटला पाहिजे...

...म्हणूनच, या साथीतून देशाला बाहेर काढेल, असा कोणताही हुकमी पत्ता तूर्त आपल्याकडे नाही. आपण खेळलेल्या सर्व पत्त्यांना आलेले यश वाढत्या आकड्यांमुळे समाधानकारक नाही. त्यामुळेच आता यातून सुटका करेल ती निसर्गशक्ती. सामूहिक प्रतिकारशक्ती विकसित होईपर्यंत जेवढे नुकसान होईल, ते आपल्याला सहन करावे लागेल. त्यानंतर स्थिती सुधारेल आणि ती सुधारली की त्याचे श्रेय मात्र कोणा एका घटकाला देता यायचे नाही. ते घेण्याचे प्रयत्न होतील, पण आपल्याला आभार मानावे लागतील, ते त्या नैसर्गिक शक्तीचेच... तिची प्रार्थना आपण करू या आणि ती करत असताना स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक बळकट, अधिक कणखर बनवण्याचा प्रयत्न करू या...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com