नवी दिल्ली - चीन मधील तियानजिन मध्ये नुकत्याच झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) शिखर परिषदेत रशिया- भारत-चीन हा नवा राजकीय त्रिकोण पुढे आला आहे. जगातील सर्वात मोठ्या आशिया खंडातील तीन शक्ती एकत्र आल्या आहेत..विशेष म्हणजे, पारंपारिक शत्रू चीन बरोबर भारताने गलवानच्या 2020 मधील घनघोर चकमकींनंतर जवळजवळ संपुष्टात आणलेले संबंध पुन्रप्रस्थिपित केले. त्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केलेली मध्यस्थी भारताच्या पथ्थ्यावर पडली आहे. या नव्या त्रिकोणाचे अमेरिकेत `गॅंग ऑफ थ्री’ असे वर्णन केले जाते.'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र,’ या त्रिकालबाधित सत्याची इथं प्रचिती येते. अमेरिकेचा शत्रू चीन, अलीकडेपर्यंत आपला शत्रू असूनही मित्र व्हावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच तियानजिन येथे झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेत पुढाकार घेतला व अध्यक्ष शी जिनपिंग व रशियाचे अध्य़क्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी मैत्रिपूर्ण हस्तांदोलने करून व सखोल चर्चा केली..ज्या रशियातून खनिज तेलाची आयात भारताने चालू ठेवली, तो निर्धार पाहून ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या मालावर तब्बल पन्नास टक्के जकात लावली. अमेरिकेचा अजब तर्क पाहा. 'भारत रशियाकडून खनित तेल आयात करतो. रशियावर अमेरिकेने निर्बंध घातले आहेत.पण, भारताच्या तेल आयातीमुळे रशियाला आर्थिक लाभ होतो. रशियाकडून आलेल्या तेलाचे शुद्धिकरण करून भारत, ते युरोप व अऩ्य देशात विकतो आणि नफा मिळवितो. भारताच्या तेल खरेदीने रशियाचे लष्कर आणखी बळकट होऊऩ युक्रेनवर हल्ला चालू राहातो. त्यामुळे शांतता होऊ शकत नाही..याचा अर्थ, युद्ध चालू ठेवण्यासाठी भारत रशियाला साह्य करीत आहे. भारताला त्यामुळे अद्दल घडलीच पाहिजे.’ म्हणूनच, अलीकडे भारत व अमेरिका दरम्यान होणारा व्यापारी करार स्थगित झाला. चीन व युरोपातील अन्य राष्ट्रे रशियाकडून खनिज तेल आयात करतात, परंतु, त्यांच्यावर ट्रम्प यांनी जाचक आयात लादली नाही.एवढेच नव्हे, ट्रम्प यांनी भारताचा शत्रू असलेल्या पाकिस्तानच्या गळ्यात गळे घातले. पाकिस्तानचे लष्करशहा फील्ड मार्शल असिम मुनीर यांना भोजनास आमंत्रिक केले. इकडे, ट्रम्प यांच्या जखमेवर मीठ चोळले जाईल, अशा रितीने मोदी यांनी तियांजिनमध्ये पंचेचाळीस मिनिटे पुतिन याच्या मोटारीतून सहप्रवास केला आणि भारत-ऱशिया मैत्री अधिक (इनसाइटफुल टॉक्स) दृढ केली. 'भारत–पाकिस्तान युद्ध मीच आटोक्यात आणले,’ असा घोष ट्रम्प यांनी तब्बल चाळीस वेळा करूनही भारताने त्यांचा दावा धुडकावून लावला, याचीही बोच ट्रम्प यांच्या जकातवाढी मागे आहे..वरील तीन नेत्यांच्या बैठकीतून काही गोष्टी स्पष्ट झाल्या.1) भारत व चीन संबंध येत्या वर्षात अधिक दृढ होतील.2) चीन बरोबर सीमावाद सोडविण्याच्या दृष्टीने पावले टाकली जातील3) चीन व भारत यांच्यात व्यापार वाढेल.4) चीनबरोबर व्यापारात असलेल्या 90 अब्ज डॉलर्सची तूट कमी व्हावी, यासाठी चीनतर्फे पावले टाकली जातील.5) सीमेवरील संघर्षाला स्थगिती मिळेल6) रशियाकडून होणारी खनिज तेल व शस्त्रास्त्रे यांची आयात वाढेल.7) ब्रिक्स संघटना अधिक मजबूत होईल8) डॉलरला पर्यायी चलनव्यवस्था निर्माण करण्याचा विचार बळावेल व त्यादष्टीने पावले टाकली जातील..या मैत्रीच्या तोट्यांकडे पाहिले, की असे दिसते, की1) रशिया व युक्रेन दरम्यानच्या युद्धात भारताला कोणतीही मध्यस्थी करता येणार नाही, अथवा स्थान नसेल2) चीन ने पाकिस्तान बरोबर किती जवळीक करावी, त्यांना काय विकावे व विकू नये, यावर भारताचा कोणताही प्रभाव नसेल.3) पाकिस्तानची अर्थव्यवस्था कितीही खालावली, तरी चीन, रशिया व अमेरिका पाकिस्तानला साह्य करतील व त्याबाबत भारत काही करू शकणार नाही.4) अमेरिकेत असलेले भारतीय व तेथे जाणारे स्थलांतरित यांच्याबाबत अमेरिकेने कितीही जाचक कायदे व नियम केले, तरी भारत काही करू शकणार नाही.5) गेल्या पंचवीस वर्षात महतप्रयत्नांनी भारत-अमेरिकेचे संबंध सुधारले होते, ते पुन्हा प्रस्थापित करण्यास किती काळ लागेल, हे सांगता येणार नाही..ही 'गँग ऑफ थ्री आहे,’ असे एकवेळ मान्य केले, तरी तिला जग हवे आहे, ते बहुधृवीय. उलट अमेरिकेला स्वतः भोवती फिरणारे एकधृवीय जग हवे आहे. भारत व चीन यांचे वैमनस्य असल्याने कौंटरवेट म्हणून अमेरिका, युरोप, जपान आदी राष्ट्रे भारताकडे पाहात होती. ते समीकरण बदलेल.इतिहासात 'गॅंग ऑफ द थ्री’ हा शब्द वापरला गेला तो तत्वज्ञ सॉक्रेटिस, प्लाटो व एरिस्टॉटल यांच्याबाबत. जगाला शहाणपण व माणसाला जीवनाचे तत्वज्ञान त्यांनी शिकविले. त्यानंतर `गँग ऑफ फोर’ असा शब्द प्रचलित झाला तो चीनच्या संदर्भात. त्याचे नेतृत्व माओत्से तुंग याची पत्नी जियांग चिंग व तिचे सहकारी झांग चुनकायो, यावो वेनयुआन व वँग हाँगवेन होते..अलीकडील काळात 2010 मध्ये 'गॅंग ऑफ थ्री’ वा `एक्सीस ऑफ इव्हिल’ हा शब्द वापरण्यात आला तो, ब्राझीलचे अध्यक्ष लुला द सिल्वा, तुर्कीयेचे अध्यक्ष रिसेप ताईप एर्डोहान व इराणचे माजी अध्यक्ष महंमद अहमदीनजाद यांच्याबाबत. हे तिघे नेते तेहराणमध्ये भेटले, त्यावर अमेरिकेत टीकेची झोड उठली होती. द सिल्वा यांच्या मुत्सद्देगिरीवर `न्यूज वीक’ साप्ताहिकाच्या 17 मे 2010 च्या अंकात स्तंभलेखक मार्क मार्गोलिस यांनी एका लेखातून जोरदार टीका केली होती व या तीन नेत्यांच्या शिष्टाईचे `रोग डिप्लोमसी’ असे वर्णन केले होते.लुला तेव्हाही अमेरिकेच्या विरोधात होते व आजही विरोधात आहेत. मोदी, लुला, पुतिन शी या नेत्यांनी अमेरिकेला आव्हान तर दिले आहेच, परंतु दुसरे महायुद्ध संपुष्टात येऊन 80 वर्षे झाली, त्यानिमित्त बीजिंगच्या लाल चौकात झालेल्या भव्य परेडच्या (व्हिक्टरी परेड) व्यासपीठावर बसलेल्या शी, पुतिन उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्या उपस्थितीने (नवी गॅंग ऑफ थ्री) ट्रम्प यांचे डोके सणकले व या 'तीन नेत्यांनी अमेरिकेविरूद्ध कट रचलाय,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली..या नेत्यांचे एका व्यासपीठावर येणे, हे आणखी एका कारणासाठी महत्वाचे आहे. ते म्हणजे, तिन्ही साम्यवादी देश अण्वस्त्रधारी आहेत, अमेरिकेविरूद्ध आहेत व त्यातील चीन, अमेरिकेचा नंबर एकचा स्पर्धक देश आहे. परेडला जगातील सुमारे पन्नास नेते उपस्थित होते, यावरून चीनच्या प्रभावाची कल्पना यावी.दरम्यान, 1981 मध्ये रशिया-भारत-चीन यांनी स्थापन केलेल्या व प्रदीर्घ (44 वर्षे) काळ सूप्तावस्थेत असलेल्या 'रिक फोरमचे (आरआयसी)’ पुनरूज्जीवन होण्याची शक्यता आहे..भारत आणि अमेरिकेच्या जकातयुद्धाकडे पाहाता असे दिसते, की अमेरिका व भारत यांच्या दरम्यान दुतर्फा व्यापाराचे प्रमाण 131.8 अब्ज डॉलर्स (2024-25) आहे. त्याखालोखाल भारत – चीन यांच्या व्यापाराचे प्रमाण 129 अब्ज डॉलर्स (2024), तर भारत-रशिया यांच्या व्यापाराचे प्रमाण 68.7 अब्ज डॉलर्स ( मार्च 2025 अखेर) आहे.पण, अमेरिकेने लादलेल्या 50 टक्के जकातीनंतर भारत व अमेरिकेच्या व्यापारात सुमारे 40 टक्के कपात होण्याची शक्यता असून, 2026 मध्ये तो 50 अब्ज डॉलर्स ते 80 अब्ज डॉलर्सने घटेल. ही तूट फार मोठी असून, ती भरून काढण्याचे जबरदस्त आव्हान मोदी यांच्यापुढे आहे. भारतीय बाजारपेठ चीनला किती मोकळी करावी, हे प्रश्नचिन्ह आहे..भारत लोकशाही राष्ट्र असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गेल्या अकरा वर्षांची वाटचाल एकाधिकारशाहीकडे झाली आहे. चीनचे जिनपिंग व रशियाचे पुतिन हे हुकूमशहा आहेत. काही महिन्यापूर्वी भांडवलशाही व लोकशाही अमेरिकेच्या गोटात असलेला भारत आता एकाएकी साम्यवादी राष्ट्रांच्या खांद्याशी खांदा लावून उभा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना सत्तेवर येताच केवळ अमेरिका नव्हे तर जगाचा हुकूमशहा व्हायचं होतं, पण त्यांचीही महत्वाकांक्षा गटांगळ्या खात आहे.1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रशियाच्या (अध्यक्ष लिओनीड ब्रेझनेव्ह) मदतीने अमेरिकेला माघार घेण्यास भाग पाडले होते. तसेच, आता पुतिन यांच्याशी मैत्री करून मोदी अमेरिकेला आव्हान देत आहेत. त्यामुळे देशांतर्गत त्यांची प्रतिमा उजळलेली आहे, हे निश्चित..या स्थितीत `विश्वगुरू’ होण्याचे त्यांचे स्वप्न मात्र हवेत विरून गेले आहे. त्यांना तीन पातळीवर आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे.1) अमेरिकेबाबत परराष्ट्र धोरण नेमके काय असावे, हे निश्चित करणे वा राष्ट्राध्यक्षाच्या पुढील निवडणुका होईपर्यंत `वेट अँड वॉच’ करणे2) हे करीत असताना जगाच्या दृष्टीने 'भारत पूर्णपणे साम्यवादी गोटात गेला आहे,’ असे चित्र निर्माण होण्यापासून भारताला वाचविणे व3) भारताचा जागतिक व्यापार वाढवून ढासाळणाऱी अर्थव्यवस्था, बेरोजगारी व अनास्थेपासून देशाला वाचविणे. 'काहीही झाले, तरी भारताची आर्थिक घोडदौड चालू राहील,’ या भ्रमात भारताला राहाता येणार नाही..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.