भाजपला घरचा आहेर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबाळे यांनी जे भाषण केले, ते मोदी सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरले
भाजपला घरचा आहेर

महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी 2 ऑकटोबर रोजी स्वदेशी जागरण मंचच्या स्वावलंबी भारत मोहिमेच्या कार्यकर्त्यांना उद्देशून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबाळे यांनी जे भाषण केले, ते मोदी सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरले. एका अर्थी, ढासाळत चाललेल्या अर्थव्यवस्थेबाबत आकडेवारी सादर करीत सरकारचा `ऑल इज वेल’ हा प्रचार खोडून काढला. त्याविरूद्ध वा त्याचे खंडन करणारी एकही प्रतिक्रिया पक्षाच्या गोटातून अद्याप व्यक्त करण्यात आलेली नाही.

देशातील वाढती गरीबी व असमानता यांचा उल्लेख करीत, उद्यमशीलतेचे वातावरण निर्माण करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. ``नोकरी शोधणारे, नोकरी देणार झाले पाहिजे,’’ असे ते म्हणाले. ``गरीबी एखाद्या दैत्यासारखी देशा पुढे आहे. त्याचे दमन करावे लागेल. अद्यापही 20 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत, ही आपल्यासाठी मोठी खेदाची बाब होय. तब्बल 23 कोटी लोकांची दिवसाकाठी केवळ 375 रू. मिळकत आहे. देशात चार कोटी बेरोजगार आहेत. कामगार क्षेत्रातील पाहाणीनुसार, बेरोजगारीचे प्रमाण 7.6 टक्क्यावर गेले आहे. गेले वर्षभर स्वावलंबी भारत अभियान सुरू असून, त्यातून ग्रामीण भागात रोजगारीची साधने उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी भारतीय इकॉनॉमिक मॉडेल कार्यान्वित करण्यासाठी देशातील सातशे जिल्हयांना प्रेरित केले जात आहे.’’

वस्तुतः ही सारी आकडेवारी सरकार दरबारी उपलब्ध आहे. परंतु, ना पंतप्रधान नरेंद्र मोदी , ना अमित शहा, ना रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास वा केंद्रीय मंत्री त्याचा उच्चार करतात. ``आकडेवारीकडे दुर्लक्ष केले की लोकांना सारे काही आलबेल वाटेल,’’ असे त्यांना वाटत असावे. गेल्या अनेक वर्षात मोदी यांनी निरनिराळया व्यासपीठांवरून अनेक घोषणा केल्या, ``सरकारने यंव केले, त्यंव केले,’’ अशा बढाया मारल्या. परंतु, प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे, ते सांगण्यासाठी होसबाळे यांना बोलण्याची वेळ यावी, ही सरकारची नामुष्की होय.

होसबाळे एवढंच बोलून थांबले नाही, तर देशात वाढणाऱ्या आर्थिक विषमतेवरही त्यांनी बोट ठेवले. ते म्हणाले, ``एका आकडेवारीनुसार भारत जगातील शिखरावर असलेल्या सहा अर्थव्यवस्थेतील एक आहे. पण, लोकसंख्येच्या फक्त 1 टक्का लोकांकडे एक पंचमांश संपत्ती आहे. त्याच प्रमाणे, एकूण लोकसंख्येच्या पन्नास टक्के लोकांकडे देशाच्या एकूण उत्पन्नापैकी केवळ 13 उत्पन्न आहे. ही स्थिती चांगली आहे काय ?’’ असा सवाल त्यांनी केला.

संयुक्त राष्ट्र संघाच्या गरीबी आणि विकास या कार्यक्रमानुसार, देशात मोठ्या प्रमाणात लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही, की सकस आहार मिळत नाही. नागरी संघर्ष व कनिष्ट दर्जाचे शिक्षण हे ही गरीबीचे एक कारण होय. त्यासाठीच नवे शैक्षणिक धोरण आखण्यात आले आहे. हवामान बदलाप्रमाणेच, अकार्यक्षम सरकार गरीबीला जबाबदार आहे. त्यांच्या मते, ``शहरातच केवळ नोकऱ्या मिळतात, असे वातावरण निर्माण केल्याने एकीकडे गावंच्या गावं ओस पडू लागलीत, तर दुसरीकडे शहरातील जीवन नरकप्राय झाले आहे. कोविड – 19 च्या काळात असे सांगितले जात होते, ग्रामीण भागात रोजगारीचे प्रमाण वाढेल. त्यादृष्टीने स्वावलंबी भारत मोहीम सुरू करण्यात आली. आपल्याला देशव्यापी योजनांची गरज नसून स्थानीय पातळीवर राबविता येण्यासारख्या योजनांची गरज आहे. त्यात कृषि, कौशल्यविकास, विपणन आदी क्षेत्रांचा समावेश होऊ शकतो. ग्रामीण उद्योगांना चालना मिळू शकते. तसेच, आयुर्वेदसारख्या भारतीय औषधीपद्धतींचा प्रसार होऊ शकतो. त्यासाठी युवक गटांनी काय साध्य होऊ शकेल, याचे संशोधन केले पाहिजे. कौशल्यविकास हा केवळ शहरी भागातूनच होऊ शकतो, त्यासाठी तंत्रज्ञान हवे, असे म्हणून चालणार नाही.’’

होसबाळे यांनी व्यक्त केलेल्या चिंतेपासून सरकार काही शिकणार काय ? की एका कानाने अयकणार व दुसऱ्याने सोडून देणार? रास्व संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही अलीकडे मशिदी- मदरसामध्ये जाऊन तेथील मुल्ला मौलवींच्या भेटी घेतल्या व देशात मुस्लिमांसाठी जे भयाचे वातावरण निर्माण झाले आहे, त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. या आधी त्यांनी असेही म्हटले होते, की ``प्रत्येक मशिद वा दर्ग्यात शिवलिंग शोधण्याची गरज नाही’’ तसेच, दसऱ्याच्या दिवशी त्यांनी केलेल्या भाषणात देशातील महिलांना सुरक्षा देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यावर भर दिला. परंतु, प्रश्न आहे, हिंदुत्वाच्या नावाने बजरंग दल, विश्वहिंदु परिषद कायदा हातात घेऊन मशिदीत जाऊन राम व देवदेविकांची आरती म्हणतात, हल्ले करतात, द्वेषमूलक भाषणे देतात, त्यांच्यावर या दोन्ही नेत्यांसह मोदी यांचा कोणताही अंकुश राहिलेला नाही. किबंहुना, तुम्हाला विचारतो कोण अशा खाक्यात तथाकथिक हिंदुत्वाने भारलेले तरूण धमक्या देत देशात फिरत आहेत. त्यांच्या हातून अल्पसंख्यांक, दलित, चित्रपट सृष्टी आदी काही सुटलेले नाही. पोलिसांची भूमिका केवळ बघ्यांची आहे, असेच प्रत्ययास येत आहे. की ते करतात, ते योग्य आहे, म्हणून मोदी, भागवत, होसबाळे मौन बाळतात, असे समजायचे का ?

देशातील हिंदूंची संख्या एकूण लोकसंख्येच्या (सव्वा अब्ज) 80 टक्के आहे. हिंदूंना व हिंदुत्वाला कोणतेही मरण नाही, की धोका नाही. असे असताना, काल्पनिक भयाचे चित्र रंगवून समाजात अस्थिरतेचे वातावरण निर्माण केले जात आहे. दुसरे म्हणजे, भगवी उपर्णी गळ्यात अडकवून हे युवक सर्वत्र धाकदपटशा करीत आहेत. गेल्या काही दिवसात इंदूरमध्ये अशा युवकांनी तेथील गल्लीबोळातून सुमारे तीनशे मोर्चे काढल्याचे सांगितले जाते. अलीकडे मध्यप्रदेशातील गरबा उत्सवात काय पाहाण्यास मिळाले? सामाजिक नैतिकतेचा ठेका घेतल्यासारखे ते वागतात. त्यांच्याकडे पाहिले, की त्यांना दुसरा कुठलाही उद्योग उरलेला नाही. नोकऱ्यांची तर गरजच नाही. असे भासते. हे असेच चालणार असेल, तर गुंतवणुक, पर्यटन, महिलांची सुरक्षा, सामाजिक समरसता याबाबात साधक वातावरण निर्माण होणार कसे ? याला कुठेतरी आळा बसणे आवश्यक आहे. त्याची सर्वाधिक जबाबदारी मोदी, भागवत व होसबाळे यांच्यावर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com