महात्मा गांधी - सर्वात ‘निर्भय' माणूस

महात्मा गांधी - सर्वात ‘निर्भय' माणूस

मोहनदास करमचंद गांधी... हे नावं आता जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलयं. स्वतंत्र भारताच्या ‘राष्ट्रपित्याचे नाव आहे हे... भारताच्या स्वातंत्र्यलढयाचे नेतृत्व गांधीजींनी केले. हे वाक्य् अर्धसत्य आहे. जगातील तिसऱ्या राष्ट्रांच्या स्वातंत्र्यलढ्याचे गांधी हे स्फुर्तीस्थान आहेत हे पूर्णसत्य आहे. भारतासारख्या विविध जातीधर्मांनी ग्रस्त अशा भुभागाचे नेतृत्व करणे ही काही खायची गोष्ट नाही. पण गांधी ही किमया करत राहिले .तब्ब्ल 33 वर्षे, खरेतर 28 वर्षे गांधी हेच स्वातंत्र्यलढयाचे सर्वोच्च नेते होते. त्यांच्यासवे चालणारे सरदार पटेल, पंडीत नेहरु, मौलाना आझाद यासारखे मातब्बर नेते होते. पण जनतेची अचूक नसं पकडण्याची किमया गांधीना खूप जास्त ठाऊक होती.आपल्या भोवतींच्या दिग्ग्ज नेत्यांचे ते नेते होते. भारताबरोबरच इतर जगातही गांधी हा माणूस ‘भारतीयत्वाचे प्रतिक' बनून राहिला होता. अगदी आजही भारत म्हणजे बुद्धाचा देश या ओळखीमध्ये नव्यानं भर पडली ती म्हणजे भारत हा बुध्दाचा देश आहे आणि भारत हा महात्मा गांधी यांचा देश आहे. कोणत्याही राष्ट्राला अभिमान वाटेल अशी काही व्यक्तीमत्वे जेव्हा इतिहासात उभी राहतात तेव्हा त्या देशाची ओळख त्या व्यक्तीच्या नावावरुन ठरते. गौतम बुध्दानंतर गांधी यांनाच हा सन्मान प्राप्त झाला. भारताच्या इतिहासात या माणसाने अशी कोणती मोलाची भर घातली आणि हा साधा मनुष्य जगाच्या प्रतिनिधीत्वाची आपली वाट कशी काय सुकर करु शकला हे समजून घ्यायला हवे.

महात्मा गांधी - सर्वात ‘निर्भय' माणूस
मुंबई वगळता गरब्यास सरकारची नियमांसहित परवानगी

महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात येथील पोरबंदर या ठिकाणी झाला. अत्यंत धार्मिक कुटुंबात लहानाचे मोठे झालेल्या मोहनदासवर आईकडून धार्मिकतेचे आणि वडीलाकडून शिस्तीचे संस्कार घडुन आले. लहानपणी अत्यंत बुजरा असणाऱ्या मोहनदासचे वयाच्या बाराव्या वर्षी कस्तुरबा या मुलीशी विवाह झाला. या जोडप्याने एकमेकांना साथ करत पतीपत्नी या नात्यापासून 63 वर्षाचा संसार करेपर्यंत मैत्र या सुंदर कल्पनेपर्यंत मजल मारली. या जोडप्याला चार मुले झाली. पण भारतातील करोडो लोकांचे ते खऱ्या अर्थाने ‘मायबाप' होते. गांधी उच्च शिक्षणाकरता इंग्लंडला गेले तेव्हा आईला दिलेल्या वचनानुसार त्यांनी मद्य, मांस, स्त्री यापासुन स्वत:ला कटाक्षाने दूर ठेवले. पुढील जीवन काळातही त्यांनी हे सत्व पाळले. इंग्लंडमध्ये असताना त्यांनी शाकाहारीचा ध्यास घेतला आणि आयुष्याच्या शेवटीपर्यंत तो पाळला.निसर्गोपचाराचे अक्षरश: वेड लागले. इंग्लंडहून परत आले मात्र आई निधन पावलेली. अशातच वकिली देखील जमेना. पहिलया खटल्यातच पक्षकाराला पैसे परत देण्याची वेळ आली. अशावेळी दक्षिण आफ्रिकेतील दादा अब्दुल्ला यांच्या कामाकरता बोलावणे आले इथेच एका लाजऱ्याबुजऱ्या मोहनदासचा ‘निर्भय गांधी' म्हणून लोकांना परिचय झाला. दक्षिण आफ्रिकेत असतानाच दादा अबदुल्लांच्या कामासाठी पिटरबर्झ येथे जाताना इंग्रजी हुकुमशाहीशी आणि साम्राज्यवादाशी ओळख झाली. रेल्वेच्या डब्यातून त्यांना अपमानास्पद पद्धतीने बाहेर काढले गेले आणि त्या रात्री मोहनदासने ‘महात्मा गांधी' यांच्याशी संवाद केला. इथून सुरुवात झाली ब्रिटीश सत्तेला आव्हान देण्याची. दक्षिण आफ्रिकेत असतानाच लिओ टॉलस्टॉय आणि रस्कीन या दोघांनी गांधी यांच्य जीवनात प्रवेश केला. दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना अवमानाच्या वागणुकीला गांधी यांनी आव्हान दिले. एक वर्षासाठी आफ्रिकेत गेलेले गांधी तब्ब्ल 21 वर्षे तिथे राहिले. तो लढा यशस्वी केला आणि 1915 साली गांधी आपल्या मातृभुमीच्या स्वातंत्र्यासाठी भारतात परतले. तेव्हा त्यांचे वय होते 45 वर्षे. पुढील 33 वष हा माणूस भारताच्या स्वातंत्र्याकरता झगडत राहिला आणि शेवटी ते मिळवलेच. भारतात आल्या आल्या त्यांनी वर्षभर नामदार गोखलेंचया सुचनेचा स्विकार करुन भारत फिरुन पाहिला. इथेच मनाशी एक रणनीती बनवली. जो प्रयोग दक्षिण आफ्रिकेच्या भुमीवर यशस्वी केला होता त्यामध्ये काही अधिकची भर घालत त्यांनी ‘सत्याग्रह' मार्गाची निवड केली. लोकमान्य टिळकांच्या मृत्युने 1920 साली स्वातंत्र्यलढयाचे नेतृत्व गांधीकडे चालून आले आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत गांधी हेच भारताचे सर्वोच्च नेते राहिले. असहकार चळवळ, मिठाचा सत्याग्रह, चले जाव चळवळ या तीन प्रमुख लढ्यातून त्यांनी देशवासियांना जागे केले. याखेरीज शेतकऱ्यांचे लढे, कामगारांचे लढे, स्त्रियांच्याही विकासाचे लढे आणि अस्पृश्यता निर्मुलनाचे लढे वकूबाने लढवले. ब्रिटीशशाहीचे अंतरंग उघडे पाडत, भारतीयांना एका विधायक दिशेने घेऊन जात, भारतीय स्वातंत्र्य मिळवलेच.स्वातंत्र्यानंतरही देशातील उसळलेल्या आगडोंबाला शमविण्यासाठी गांधी कार्यरत राहिले.अशाच एका क्षणी गोडसे या नराधमाने त्यांच्या शरीराचा खून केला. पण गांधीचे शरीर मृत्यू पावले तरीही त्यांचे विचार व मार्ग संबंध देशालाच नव्हे तर, जगाला मार्गदर्शन करत उभे राहिले.

गांधी ही व्यक्ती नेमके कोणत्या कारणासाठी आजदेखील प्रस्तूत आहे? गांधीनी नेमके योगदान जगाच्या इतिहासात नोंदवले? या दोन प्रश्नांच वेध घेतला तरी गांधींचे मोठेपण व महानता कळून येते. गांधी अशा एका कालखंडाचे महत्वाचे दर्शक आहेत जेव्हा संबंध जग हे एका महायुध्दाची तयारी करत होते. पहिल्या महायुध्दाचे परिणाम जगाने पाहिले तरीही त्याची युध्दाची खुमखुमी संपली नाही. गांधी भारतात परतले तो काळ असाच होता पहिल्या महायुध्दाचा. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेते होते लोकमान्य टिळक. गांधी परतले त्याच्या दुसऱ्याच वर्षी लोकमान्यांच्या पुढाकाराने मुस्लीमहिताचा ‘लखनौ करार' करण्यात आला. टिळकांचे हे पाऊल गांधी नीटपणे आकळत होते. त्यांनी तेव्हा शेतकरी व कामगारांच्या लढयाचे नेतृत्व केले. टिळक मृत्यु पावले आणि गांधी स्वातंत्र्यलढयाचे सेनापती बनले. मग या सेनापतीने इथल्या सामान्य जनतेला अधिकाधिक स्वातंत्रयलढयात सामिल करुन घेत साधे पण आशयाने भरगच्च असे कार्येक्रम दिले. गांधीचे पहिले मोठेपण हेच की, त्यांनी देशाच्य स्वातंत्र्य्‍लढयात प्रत्येक सामान्य माणसाला ‘एक भुमिका' दिली.लहान मुलगा, तरुणाई, वृध्दृ मंडळी, स्त्रिया अशा सर्व महत्वाच्या घटकांना स्वातंत्र्याच्या आंदोलनात अत्यंत अफाट संख्येने गांधी घेऊन आले. देशातील मोठया संख्येला आपण आपल्या देशासाठी योगदान दिले पाहिजे अशा भावनेने प्रेरीत केले. वकील, डॉक्टर असे महत्वाचे घटक देखील आपल्या आयुधांसहीत समोर आल्या. एकाच स्तरावर स्वातंत्र्याचे आंदोलन आणण्यात गांधी जवळजवळ यशस्वी ठरले. याचे काही इष्ट परिणाम दिसुन आले.दुसरे गांधींचे मोठेपण म्हणजे ‘ आधी राजकीय की आधी सामाजीक ‘या प्रश्नाचे पहिले योग्य उत्तर गांधी यांनी कृतीने दिले. राजकीय स्वातंत्र्य महत्वाचे आहेच पण सामाजीक सुधारणा देखील महत्वाच्या आहेत. दोन्ही चाके एकाचवेळी चालली पाहिजेत. याचकरता सत्याग्रहींना राजकीय ओदोलन चालवताना अस्पृश्यता निर्मुलन, ग्राम स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा असे कार्यक्रम दिले. तिसरे मोठेपण नोंदवताना हे सांगितलेच पाहिजे की,गांधीनी स्वातंत्र्य आंदोलन चालवताना लोकांना लोकशाहीचे शिक्षण दिले. नेहरु, पटेल असे नवभारताचे शिल्पकार याच मुशीत तयार झाले. भारताच्या राज्यघटनेत नोंदवलेल्या नागरीकांच्या कर्तव्याचे आणि अधिकारांचे जणू हे पुर्वप्रशिक्षणच होते. चौथे मोठेपण नोंदवताना गांधी यांनी स्वातंत्र्य मिळवताना साधनशुचितेचा धरलेला आग्रह. भारतीय स्वातंत्र्याचा मार्ग हा ‘सत्याग्रही' स्वरुपाचा ठेवून गांधीनी भारताच्या हिताची सर्वाधिक मोठी गोष्ट केली. या मार्गाला सत्य व अहिंसा यांची जोड देऊन गांधी यांनी भारताच्या नागरीकत्वाचा आदर्शच घालून दिला. पाचवे मोठेपण म्हणजे गांधी यांनी आपल्या स्वांत्र्याचा लढा हा कंवळ एका देशाच्या स्वातंत्र्याचा भाग नसून समस्त तिसऱ्या जगातील गुलामीत असणाऱ्या देशांचा मार्ग मानला. विशेषत: नेहरु व सरदार यांना याचे विशेष भान होते. आपल्यासहीत इतर विश्वाजील देशांच्या गुलामगिरीचा विचा करुन जगातील शोषीतांना जोडून ठेवण्याची गांधी यांची कृती नि:संशय त्यांचे मोठेपण दाखवते.

महात्मा गांधी - सर्वात ‘निर्भय' माणूस
घटस्थापनेपासून मंदिरं उघडणार; मुंबईकरांना मात्र 'हा' नियम लागू

गांधी यांचे महानपण देखील अशाच पातळीवर तोलावे लागते. गांधी यांचे महानपण म्हणजे त्यांनी दाखवलेल्या मार्गामुळेच अगदी आजही आपण भारतीय माणूस ब्रिटीशांचा द्वेष करत नाही. ज्या ब्रिटीशांनी आपल्याला 150 वर्षे गुलामीत ठेवले त्यांच्या विषयी कटुता न बाळगता आपण आज व्यवहार करु शकतो याचे श्रेय गांधींचे आहे. गांधीनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात हे भानं सतत जागृत ठेवले की ब्रिटीश साम्राज्यवादाशी आपला लढा आहे, सामान्य ब्रिटीश नागरीकांशी आपला लढा नाही. गांधींच्या या जागरुकतेनेच आपल्यातील माणूसपण टिकले आणि आपण आपल्या राजकीय शत्रूचा द्वेष करायला शिकलो नाही. गांधींची सर्वात महत्वाची महानता आहे ती म्हणजे त्यांनी भारतीय जनतेला निर्भयतेची शिकवण दिली आणि ‘निर्भय' बनवले.जगातील सर्वात मोठया साम्राज्याला भिडताना भारतीय माणसाचे निर्भयपण वाढवण्यात गांधी यांनी मोठी कामगिरी बजावली. सामान्य माणसाला त्यांनी निर्भय बनवले आणि मग हीच सामान्य माणसे आपल्या पध्दतीने आपल्या देशाच्या इतिहासात आपले योगदान नोंदवू लागलीत. ब्रिटीश साम्राज्यवाद्यांच्या डोळयात डोळे घालून स्वातंत्र्याचे गीत गाऊ लागले.ब्रिटीशांच्या संगीनींना आपल्या छाती लावू लागले. ज्या तुरुंगवासाची भिती सामान्य लोकांना वाटायची त्या तुरुंगाची भीतीच निघून जाऊन तुरुंग हे ‘देशसेवेचे निवासस्थान' बनले. ज्या न्यायव्यवस्थेला जनता भिऊन असायची त्याच न्यायव्यवस्थेला जनता ठोकर मारु लागली. जुलमी कायद्याला न घाबरता लोक कायदेभंग करु लागले. गांधीनी हे निर्भयपण भारतीय जनतेच्या नसानसात भिनवले.याकरता गांधी यांनी आपले नैतिक चारीत्र्य कायम जनतेसमोर उघडे ठेवले.

मोहनदास करमचंद गांधी ते महात्मा गांधी हा प्रवास काही एका रात्रीचा नव्हता. 78 वर्षाच्या आयुष्यातील क्षण नि क्षण याकरता हा मनुष्य कार्यरत राहिला. ज्या मार्गावरुन आपल्याला जायचे आहे त्या मार्गाने निश्चित पावले टाकत गेला. आपल्या बरोबर कुणी असावे ही अपेक्षा देखील केली नाही. सत्याचा मार्ग त्याने कधी बदलला नाही. अहिंसेवरची निष्ठा ढळली नाही. श्रमप्रतिष्ठा हा गुण स्वत:मध्ये गुंतवत कायम काम करत राहिला. गांधी हा माणूस मुळातच प्रयोगशील होता. आयुष्यभर मानवी जीवनाच्या हिताचे प्रयोग तो करत राहिला.य प्रयोगात त्याच्या बदनामीची कारस्थाने विरोधकांनी रचली. त्याच्यावर जीवघेणे हल्ले केले. जाती, धर्म यांच्या संघटकांनी आपापल्या वकुबाने त्याला अडचणीत देखील आणले. पण हा मनुष्य हटला नाही. त्याच्यावर भ्याडपणाचे आरोप त्याच्या मृत्युनंतर अधिक झाले. पण हा आपल्या आयुष्यात सदैव निश्चल राहिलेला मनुष्य त्याच्या मुळ प्रतिमेला जाणीवपूर्वक वेगळया रंगात विरोधकांनी रंगवले. मात्र गांधी घाबरला नाही. कारण त्याच्या संपूर्ण जीवनाचे सारं सामावलयं ते त्याच्या निर्भयपणात. जगातील मानवी इतिहासातील गांधी हा सर्वात निर्भय मनुष्य होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com