Geeta Rao Gupta: राजदूत गीता राव गुप्ता भारत दौऱ्यावर, मणिपूरमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत सरकारला सल्ला देणार?

Geeta Rao Gupta: राजदूत गीता राव गुप्ता भारत दौऱ्यावर, मणिपूरमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत सरकारला सल्ला देणार?

Geeta Rao Gupta : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन नियुक्त महिलांच्या जागतिक समस्यांविषयीच्या राजदूत (अँबॅसडर एट लार्ज) श्रीमती गीता राव गुप्ता 1 ते 8 ऑगस्ट पर्यंत भारताच्या दौऱ्यावर आल्या आहेत. त्या मूळच्या मुंबईच्या. या दौऱ्यात गुजरात, मुंबई व बंगरूळू ला भेट देणार असून, जी-20 च्या शिखर परिशदेच्या निमित्ताने भारत सरकारच्या विद्यमाने आयोजित केल्या जाणाऱ्या मंत्री स्तरावर होणाऱ्या महिला सक्षमीकरणविषयक परिषदेला उपस्थित राहातील.

त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात अध्यक्षांच्या खास साह्यक व सुरक्षा मंडळातील महिला समस्या (जेंडर) विषयक खास सल्लागार रॅकेल व्होगेल्स्टीन, दक्षिण व मध्य आशिया विभागाच्या सह सचिव नॅन्सी जॅकसन, मुंबईतील अमेरिकन कौन्सुलेटच्या कौन्सिल जनरल माइक हॅंके, युएसएडच्या ज्येष्ठ अधिकारी जॅमिले बिगिओ यांचा समावेश आहे. 

महिला विषयक समस्या व त्यांची सोडवणूक या संदर्भात अमेरिकेच्या जागतिक प्रयत्नांचे सूत्रचालन राजदूत गुप्ता करतात. याकडे पाहता, भारतातील मणिपूर, पश्चिम बंगाल व अन्य राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत त्या सरकारला सल्ला देणार काय, असा सवाल विचारला जात आहे की परिषदेत केवळ वरवरची चर्चा होणार, हे लौकरच कळेल. या संदर्भात मोदी सरकारची पावले गोगलगाईच्या गतीने पडत आहेत. त्यांच्या सरकारमधील कोणताही नेता बोलायला तयार नाही. बोलायचे असेल, तर कसा केवळ विरोधकांना दोष दिला जातो.  अखेर सरकारचे कान टोचायला सर्वोच्च न्यायालयाला पुढाकार घ्यावा लागला. मणिपूरमधील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोसळल्याची खरमरीत टिप्पणीही न्यायालयाने केली. संसदेत याच विषय़ावरून रणकंदन चालू आहे. पंतप्रधानांनी केवळ सारवासारवी करणारे एक वक्तव्य करून मौन धारण केले. आता मणिपूरमधील घटनांबाबत विरोधकांना कसे गोवायचे, याचे आराखडे बांधले जात आहेत. चीनमधून बंडखोरांना होणारा शस्त्रपुरवठा व म्यानमारधून येणारे शरणर्थी, ही आणखी दोन कारणे जोडीला आहेत.

पाच व सहा ऑगस्ट रोजी राजदूत गुप्ता मुंबईत खाजगी क्षेत्र व नागरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर भारताच्या महिलांविषयक धोरण व अंमलबजावणीबाबत विचारविनिमय करणार आहेत. किमान त्यावेळी तरी या घटनांचा उल्लेख व्हावा, अशी अपेक्षा आहे. व्हाईट हाऊसने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे, की महिला समानतेविषयक भारताची प्राधान्ये., महिलांची आर्थिक सुरक्षा व त्या दृष्टीने होणारे प्रयत्न, त्यांच्या उन्नतीच्या मार्गात येणाऱ्या अडचणी व लिंगभेद मिटविण्यासाठी तसेच महिलांविरूद्ध सुरू असलेल्या हिंसाचार या मुद्यांवर चर्चा होईल.

राजदूत गुप्ता व नॅन्सी जॅकसन या 7 ऑगस्ट रोजी बंगरूळू येथे होणाऱ्या ``विकनेक्ट इंटरनॅशनल एशिया पॅसिफिक कॅन्फरन्स’’मध्ये भाग घेणार असून, त्यात बीजभाषणे देतील. परिषदेदरम्यान त्या महिला नेत्या व समाज कार्यकर्त्यांबरोबर महिलांचे हक्क, अधिकार व  सक्षमीकरणाबाबत विचार विनिमय करतील.

वर उल्लेखल्यानुसार, राजदूत श्रीमती गुप्ता मूळच्या ( जन्म 1956) मुंबईच्या. अध्यक्ष जो बायडन यांनी नोव्हेबर 2021 मध्ये त्यांची नेमणूक केली. त्या आधी 2017 पासून त्या संयुक्त राष्ट्र संघात महिला विषयक विभागाच्या संचालक होत्या. एचआयव्ही एड्स् चे प्रतिबंधक कार्यक्रम, महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण, दारिद्र्य, भूक व उपासमारी आदी समस्याच्या क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले आहे.` इन्टरनॅशनल सेन्टर फॉर रिसर्च ऑन विमेन’ या संघटनेच्या अध्यक्ष पदाव्यतिरिक्त `बिल अँड मेलिंडा गेट्स फौंडेशन’मध्ये 2010 ते 2011 मध्ये त्यांनी काम केले. राष्ट्रसंघाचे माजी महासरचिटणीस बान की मून यांनी त्यांची युनिसेफच्या उप कार्यकारी संचालकपदी नेमणूक केली.

भारतात त्यांचे शिक्षण मुंबई, दिल्ली व बंगरूळू येथे झाले. त्याचप्रमाणे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये असताना त्यांनी तज्ञ गटाबरोबर महिलांसाठी पदवीपरिक्षेचा शिक्षणक्रम तयार केला. अमेरिकेत त्या उच्च पदावर असल्या, तरी भारतीय म्हणून त्यांच्याकडून भारतीय महिलांना न्याय मिळावा, या दिशेने ठोस पावले उचलण्यासाठी सरकारला परखड सल्ला दिला जाईल, अशी अपेक्षा केल्यास ते वावगे ठरणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com