Kasba By Election 2023: कसब्यात बापटांच्या 'टिप्स'ने 'कमळ'फुलणार?

महापालिकेत गेल्या निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या भाजपचं लक्ष आगामी निवडणुकांकडं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळं प्रचारात सक्रीय नसलेले खासदार गिरीष बापटही आता सक्रीय झाले आहेत.
Kasba By Election 2023 News
Kasba By Election 2023 NewsEsakal

सबा विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आगामी पोटनिवडणूक भाजप शिंदे गटाच्या मदतीने लढविणार आहे. कसबा मतदार संघात पूर्वी खासदार गिरीष बापट यांचे वर्चस्व होते.

ते खासदार झाल्यानंतर मुक्ता टिळक या मतदारसंघातून निवडून आल्या. मात्र,गेल्या महिन्यात त्यांचे दुर्दैवी निधन झाले. (Will Girish Bapat Help BJP to won Kasaba Bi Election in Pune)

या मतदारसंघातून टिळक (Tilak) कुटुंबियांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, भाजपने मुक्ता टिळक यांचे पूत्र कुणाल टिळक यांना पक्ष प्रवक्तेपदाची संधी दिली. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश यांच्या बरोबरच, गणेश बीडकर, धीरज घाटे,हेमंत रासने हे इच्छुक होते. त्यापैकी पक्षाने हेमंत रासने यांच्या पारड्यात उमेदवारी दिली.

१९९५ च्या विधानसभा निवडणुकीपासून पुढच्या पाच निवडणुका या मतदारसंघातून जिंकणारे भारतीय जनता पक्षाचे सध्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) प्रकृती अस्वास्थ्यामुळं निवडणुकीच्या प्रत्यक्ष प्रचारात आतापर्यंत तरी नव्हते.

पण आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीची सूत्रं हाती घेतल्यानंतर बापट आणि राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) निवडणुकीत सक्रीय झाले आहेत. बापट मतदारसंघात प्रत्यक्ष फिरु शकले नाहीत तरी त्यांचा पूर्वानुभव भाजपच्या निश्चितच कामाला येईल.

काही अपवाद वगळले तर या मतदारसंघावर भाजपचेच (BJP) वर्चस्व राहिले आहे. १९६२, १९६७ आणि १९७२ या तीन निवडणुकांत काँग्रेसनं ही जागा जिंकली होती. आणिबाणीनंतरजनता लाटेत १९७८ मध्ये डाॅ. अरविंद लेले या मतदारसंघातून निवडून आले होते. १९८० मध्ये भाजपकडून त्यांनी ही जागा राखली.

८५ मध्ये काँग्रेसचे उल्हास काळोखे इथून निवडून आले. पण १९९० मध्ये पुन्हा अण्णा जोशींनी ही जागा भाजपकडे खेचून आणली.

१९९५ नंतर मात्र या मतदारसंघावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. १९९५ पासून पुढच्या पाचही निवडणुका गिरीष बापटांनी जिंकल्या.आता या मतदारसंघात रासने काय कामगिरी करतात याकडं लक्ष लागलं आहे.

२०१४ ची निवडणूक सध्याचे काँग्रेसचे (Congress) उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनव लढवली होती. काँग्रेसकडून रोहित टिळक रिंगणात होते. त्यावेळी रविंद्र धंगेकर यांना २५ हजार ९९८ मतं पडली होती.

तर रोहित टिळक यांना ३१ हजार ३२२. भाजपचे गिरीष बापट ७३ हजार ५९४ मतं मिळवून निवडून आले होते. तर २०१९ च्या निवडणुकीत मुक्ता टिळक यांना ७५ हजार ४९२ मतं मिळाली होती. थोडक्यात आमची मतं पक्की आहेत हे सांगायला भाजपला वाव आहे.

२००९ च्या निवडणुकही मनसेकडून लढवेल्या धंगेकरांना ४६ हजार ८२० मतं मिळाली होती.पण त्यावेळी शहरी भागात मनसे प्रमुख राज ठाकरेंची लोकप्रियता होती. त्याचा फायदा धंगेकरांना झाला होता. त्यामुळंच ते एवढी मतं मिळवू शकले होते.

पण आता मनसे रिंगणात नाही. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपची सध्या वेगळी गणितं सुरु आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही या निवडणुकीत भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे मनसेची मतं भाजपलाच मिळण्याची निश्चित शक्यता आहे.

Kasba By Election 2023 News
Kasba Bypoll Election : राजकारणात खळबळ उडवणाऱ्या फडणवीसांच्या 'त्या' 7 तासांच्या बैठकीत काय घडलं?

त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचा पुणे दौरा आहे. त्याचा आणि निवडणुकीचा काही संबंध नाही असं सांगितलं जात असलं तरी भाजपला एक प्रकारची शक्ती प्रदर्शनाची संधी याद्वारे निश्चितच मिळेल.

त्याचाही वेगळा फायदा भाजपला होऊ शकतो. या निमित्तानं राज्यातील भाजपच्या बड्या नेत्यांची पुण्यातली आवक वाढली आहे. सुमारे ४० नेत्यांची फौज भाजपनं या निवडणुसाठी उतरवली आहे.

कसबा कधीच भाजपचा नव्हता असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मध्यंतरी 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाले होते. कसबा मतदारसंघाच्या इतिहासात हा मतदारसंघ पहिल्यान निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाकडं होता.

चार वेळा काँग्रेसकडं तर नऊ वेळा भाजपकडे हा मतदारसंघ राहिला आहे. त्यामुळं आता पोटनिवडणुकीत हा मतदारसंघ कुणाकडं जातो याकडं राजकीय निरिक्षकांचं लक्ष लागलं आहे.

महापालिकेत गेल्या निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या भाजपचं लक्ष आगामी निवडणुकांकडं आहे. कालच फडणवीस पुण्यात होते. रात्री उशीरा त्यांनी गिरीष बापट यांची भेट घेतली. त्यावेळी बापट यांनी त्यांना कसब्याच्या निवडणुकीसाठी काही 'टिप्स' दिल्याची चर्चा कार्यकर्त्यांत आहे.

या मतदारसंघात बापट मुरले होते हे नक्कीच. त्यामुळे त्यांच्या या 'टिप्स'मतदानात कशा परिवर्तित होतील, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यातच आजच बापट यांनी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे.

स्वतः फडणवीस हे धूर्त राजकारणी आहेत. राज्यात महाविकास आघाडीला बाजूला सारून शिंदे गटाशी भाजपचं सूत जमवून देण्यात फडणवीसांची काय भूमीका होती हे सगळ्यांनीच पाहिलं आहे. आता कसब्याची पोटनिवडणूक स्वतः फडणवीसांनी मनावर घेतली आहे. त्याचाही भाजपच्या मतांवर निश्चित चांगला परिणाम होईल, असं इथले नेते बोलत आहेत.

ही निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडी म्हणून लढते आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या एका महिला नेत्यानं इथून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

मात्र, त्यांच्या दहाव्याचे विधी होण्याअगोदरच अशी इच्छा व्यक्त करणं योग्य नसल्याचं राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कार्यकर्त्यांना आणि इच्छुकांना बजावलं होतं. त्यात कालच धंगेकर यांच्या एका बॅनरवरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो गायब असल्याचे वृत्त व्हायरल झाले.

त्यामुळे आता मविआत वाद असल्याची नवी चर्चा सुरु झाली आहे. याचा फायदा भाजप कसा उठवतो यावरही निवडणुकीची काही गणितं ठरतील.एकूणच पुढचा आठवडा कसबा बातम्यांच्या केंद्रस्थानी राहणार हे निश्चित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com