शिक्षकांसाठी योगाभ्यास

सुभाष उपासे, योगशिक्षक व क्रीडाशिक्षक, सोलापूर
शनिवार, 20 जून 2020

ओंकाराची साधना केली तर मनाला प्रसन्न वाटते. मनावरचा ताण कमी होतो व एकाग्रता वाढण्यास मदत होते. विपरीत शयनस्थिती (पोटावर झोपून), शयनस्थिती (पाठीवर झोपून), बैठक स्थिती (बसून), दंड स्थिती (उभे राहून) अशा स्थितीत आसन केले तर अंतरेद्रियांची कार्यक्षमता वाढते. अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत होते. योगाभ्यासाने शिक्षक हा एक प्रसन्न निरोगी असा नागरिक तयार होतो व विद्यार्थ्यांचे हित अधिक चांगल्या पद्धतीने पाहू शकतो.  

21 जूनला आपण सर्वजण सहावा "आंतरराष्ट्रीय योग दिवस' साजरा करीत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेत (U.N .G.A) जागतिकस्तरावर आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करावा असे आवाहन केले आणि 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत 177 राष्ट्रांनी याला समर्थन दिले. त्यामुळे 21 जून 2015 पासून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यास सुरवात झाली. त्याला आज पाच वर्षे पूर्ण झाली. 

कोरोना महामारी पार्श्‍वभूमीवर यंदा हा दिवस घरात राहून परिवारासोबत साजरा करण्याचा प्रसंग आपल्या सर्वांवर आला आहे. योगशस्त्रांचा अभ्यास, सराव किती आवश्‍यकता आहे हे आता आपल्याला कोरोना पार्श्‍वभूमीवर जाणवू लागले आहे. या काळात योगासन व प्राणायामचा प्रसार व प्रचार करणाऱ्या संस्था भरीव स्वरूपाचे कार्य करीत असल्याने योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलू लागलेला आहे. फक्त एक दिवस योगदिन साजरा केला म्हणजे झाले असे नाही तर ती आपली जीवनशैली झाली पाहिजे. 

आज धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती आरोग्यसंपन्न जीवनशैली स्वीकारण्याची इच्छा बाळगतो. सर्वांना बाधा आणणारे घटक म्हणजे मानसिक ताणतणाव वाढत आहे. शिक्षकांना स्वतःला शिक्षक म्हणून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. व्यक्तिगत समस्या, शारीरिक समस्या, मानसिक ताणतणाव तीन समस्या एकमेकांशी संबंधित आहेत. सतत उभे राहिल्याने पायांवर ताण येतो, पोटऱ्यांचे स्नायू दुखावतात, गुडघेदुखी होते व शारीरिक थकवा जाणवल्याने रक्तदाब कमी होतो. सतत बोलण्याने घशाचा त्रास होतो. घशातील स्वरग्रंथीवर ताण येतो व त्या दुखावतात, उच्चार बरोबर येत नाहीत. आवाजात लयबद्धता राहत नाही. आवाज शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचू शकत नाही. शाळेच्या वेळेनुसार जेवणाची वेळ बदलल्याने पचण्याच्या तक्रारी उद्‌भतात. वेळी-अवेळी जेवल्यानंतर पचनसंस्थेवर ताण येतो. अपचनाच्या तक्रारी सुरू होतात. काहीवेळा भूक मरते. यामुळे अस्वस्थता जाणवते. व्यक्ती चिडचिडपणा करतो, कामात लक्ष लागत नाही. शाळेत शिक्षकांना फलकलेखन करताना खडू डस्टरचा वापर करावा लागतो. फलकावर खडूच्या साहाय्याने लेखन करताना व डस्टरच्या साहाय्याने फळा पुसताना खडूचे कण नाकतोंडाद्वारे श्‍वासनलिका व अन्न नलिकेत जातात. त्यामुळे फुफुसांची कार्यक्षमता कमी होते. श्‍वसनलिकेत अडथळा व घशाला त्रास होऊन खोकला सतत येतो. रक्तदाब कमी होतो, दम्यासारखे विकार होतात, काहीजणांना ऍलर्जी होते, शिंका येतात, सायनसचा त्रास असेल तर श्‍वास घेताना त्रास होतो. शिक्षकांना शाळेत व दैनंदिन जीवनात अनेक समस्या येतात. अनेक कामे करावी लागतात, त्यामुळे कामात, अध्यापनात आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी एकाग्रता राहत नाही. यासाठी योगाची आवश्‍यकता आहे. 
योग म्हणजे जीवन जगण्याची कला आहे आणि ते अनुभव घेतल्याशिवाय समजत नाही. योगशास्त्रांचे आद्य प्रणेते श्री पतंजली महामुनी यांनी सांगितले आहे. 

योगचित्तवृत्तीनिरोध : योग केल्याने चित्ताचा मूळ घटक असलेल्या सत्व, रज, तम या तिन्ही वृत्तीत बहिर्मुख, अंतर्मुख, निरोध (नियंत्रित) होते. योगाची साधना करण्याचे माध्यम शरीर आहे. शरीराच्या माध्यमातून आणि मनाने अनुभव घ्यायचा आहे. यात शरीर व मन यावर परस्पर पूरक संस्कार होत असल्याने अतिचंचल मनाला एकाग्र करून शरीराची व्याधी दूर होण्याची योजना आहे. योगसाधनेत शरीरातील स्नायूसंस्था, अस्थीसंस्था, रक्ताभिसरण संस्था, श्‍वसनसंस्था, जननसंस्था व अंत:स्त्रावी ग्रंथी यावर परिणाम होतो. नैसर्गिक हालचालीवर नियंत्रण ठेवून संथ श्‍वसन केल्याने प्राणवायूचा वापर कमी करून हृदयाला विश्रांती मिळेल असा सुंदर योगाभ्यास आहे. नियमित आसने केल्याने शरीराची लवचिकता वाढून शरीरातील सप्तधातु, त्रिदोष यांचे संतुलन होते व हार्मोन्सचे नियंत्रण होते. प्राणयामाने शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत प्राणवायू पोचल्याने फुफुसांची कार्यक्षमता वाढते. योगातील काही आसने साखळीप्रमाणे एकमेकांना जोडून सूर्यनमस्कार तयार करण्यात आला आहे. सूर्यनमस्काराने शरीर व मनाला योग्य व्यायाम मिळतो. 
शरीरशास्त्र व शरीर संवर्धन यांचे जीवनात महत्त्व आहे. Prevention is better than cure. हेच योगशस्त्रांचे महत्त्व आहे. सुरवातीला शरीराच्या स्नायूंची लवचिकता फारच कमी असते. शारीरिक थकवा लवकर येतो, जसेजसे पूरक व्यायाम, आसने करू लागलो की लवचिकता हळूहळू वाढते. त्याचबरोबर श्‍वास घेणे व सोडणे यावर नियंत्रण ठेवून शरीर शिथिल ठेवण्याची पद्धती लक्षात आल्यास आसने करण्याची मानसिक तयारीही होते. 

योगशास्त्र बोलायला व ऐकायला सोपे वाटते; परंतु प्रत्यक्षात अनुभव घेतल्यानंतर जीवन अधिक सरल व आनंदी होते. यासाठी आपण उद्याची वाट बघणे टाळले पाहिजे. योगाभ्यास करण्यासाठी वय, स्त्री-पुरुष, जात असा कोणताही भेद केला जात नाही. आनंदी व निरोगी राहण्याचा अधिकार सर्वांना आहे. योगशास्त्रात योगाभ्यास करण्याबरोबर आहार-विहाराचे महत्त्व आपल्याला कळते, त्यामुळे योग्य जीवनपद्धती आपण अंगीकारू शकतो. जेवणाच्या वेळा बदलल्याने पित्ताचा त्रास, अपचन झालेल्यांसाठी वमन धौती ही शुद्धीकरण क्रिया आवश्‍यकतेनुसार व मार्गदर्शनानुसार करावी. हे केल्यानंतर पित्ताचा त्रास कमी होतो. मनाची एकाग्रता साधण्यासाठी त्राटक ही शुद्धीक्रिया आहे. ओंकाराचे महत्त्व योगाभ्यास सांगितले आहे. ओंकाराची साधना केली तर मनाला प्रसन्न वाटते. मनावरचा ताण कमी होतो व एकाग्रता वाढण्यास मदत होते. विपरीत शयनस्थिती (पोटावर झोपून), शयनस्थिती (पाठीवर झोपून), बैठक स्थिती (बसून), दंड स्थिती (उभे राहून) अशा स्थितीत आसन केले तर अंतरेद्रियांची कार्यक्षमता वाढते. अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत होते. योगाभ्यासाने शिक्षक हा एक प्रसन्न निरोगी असा नागरिक तयार होतो व विद्यार्थ्यांचे हित अधिक चांगल्या पद्धतीने पाहू शकतो.  

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या