तर सुविधांना लागणार कात्री

tax.jpg
tax.jpg

पुणे  : शहराशेजारील गावांमध्ये झपाट्याने नागरीकरण वाढत आहे. त्याच वेगाने येथील कचरा, पाण्याची समस्या वाढण्याबरोबरच वृक्षराजीही कमी होत आहे. मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीने याबाबत गांभीर्याने दखल घेतली आहे. "मिळकतदारांनो, ओला-सुका कचरा वेगळा करा, रेन वॉटर हार्वेस्टिंग करा आणि वृक्षारोपणही करा; अन्यथा सर्व सुविधा बंद करण्यात येतील,' असा सज्जड इशाराच पंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे. मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
भूजल संपदेच्या संरक्षणासाठी "रेन वॉटर हार्वेस्टिंग', तर पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षलागवड व संवर्धन ही काळाची गरज झाली आहे. ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या मिळकतधारकांनी या दोन्ही गोष्टी करणे बंधनकारक आहे. याशिवाय कचरा व्यवस्थापनाची समस्याही दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करीत आहे.
या तीनही प्रश्नांवर ग्रामसभेत चर्चा होऊन त्याबाबतचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. ओला-सुका कचरा वेगळा करणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि वृक्षलागवड करणाऱ्या मिळकतधारकांनाच यापुढे सुविधा देण्यात याव्यात, असे बैठकीत ठरवण्यात आले आहे. याशिवाय अशाच मिळकतींना करामध्ये सूटही देण्यात येणार आहे. या उलट हे दोन्ही उपक्रम न राबविल्यास संबंधित मिळकतधारकांच्या सुविधा ग्रामपंचायत बंद करणार असल्याचेही ग्रामसभेत ठरविण्यात आले आहे.
सरपंच शिवराज घुले यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष ग्रामसभा घेण्यात आली. त्यात पाणी बचतीसाठी ग्रामस्थ बबन जगताप व रत्नमाला घुले यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगची सूचना मांडली. वृक्षलागवड व संवर्धन करण्याची सूचना ग्रामस्थ गायत्री घुले, अनिल फुंदे यांनी मांडली, तर सुका व ओला कचरा वेगळा करण्याची सूचना सुरभी जोशी व शुभांगी शिंदे यांनी केली.
पाणी बचत आणि पाणी संवर्धन करणे गरजेचे असून, त्यासाठी ग्रामपंचायतीने जनजागृती करून त्याची अंमलबजावणी करावी, असे पत्र पंतप्रधान कार्यालयाकडून सरपंचांना आले आहे. त्याला अनुसरून ही विशेष ग्रामसभा घेण्यात आल्याचे ग्रामविकास अधिकारी अनिल कुंभार यांनी सांगितले.

हवाई दलाने ग्रामपंचायतीला दिली
कचरा डेपो बंद करण्याची सूचना

ग्रामपंचायतीकडून सध्या गायरान जमिनीवर कचरा डंपिंग केला जात आहे. मात्र, त्यावर फिरणाऱ्या पक्ष्यांमुळे विमान मार्गात अडथळा येऊन धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हवाई दलाने ग्रामपंचायतीला हा कचरा डेपो बंद करण्याची लेखी सूचना दिली आहे. त्यामुळे हा प्रश्न आणखी गंभीर झाला आहे.

"ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मिळकतधारकांनी घर किंवा परिसरात किमान दोन झाडे लावून त्याचे पुढील पाच वर्षे संगोपन केल्यास मिळकतधारकाला प्रत्येक वर्षी 150 प्रमाणे पाच वर्षांचे 750 रुपये करात सवलत देण्यात येणार आहे. तसेच उपलब्ध साधन सामग्रीनुसार रेन वॉटर हार्वेस्टिंगही मिळकतधारकांनी करून घ्यायचे आहे. तसेच ओला-सुका कचरा वेगळा करावा. त्यासाठी संबंधित मिळकतधारकांना मार्गदर्शनही करण्यात येणार आहे, असे सरपंच शिवराज घुले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com