#WeCareForPune गोकुळनगर, सुखसागरनगरचे पाणी पळविले

water
water

गोकुळनगर : गोकुळनगर व सुखसागरनगर परिसरात सध्या पाण्याची मोठी समस्या भेडसावत आहे. पाणीपुरवठ्याची वेळ निश्‍चित नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पाणी रात्रीचे येत असल्याने ज्येष्ठ नागरिक व महिलांनी संताप व्यक्त केला आहे. आमचे पाणी टिळेकरनगर, कोंढवा व येवलेवाडीकडे वळवल्याचा आरोप नागरिकांनी केला.

पाणी प्रश्‍नाबाबत सामाजिक कार्यकर्त्या रक्षा तंवर यांनी "सकाळ संवाद'च्या माध्यमातून प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यानंतर "सकाळ'च्या प्रतिनिधीने वस्तुस्थिती जाणून घेतली असता पाणी समस्या जाणवली. उपनगरात अनेक ठिकाणी पाणी प्रश्‍न भेडसावण्यास सुरवात झाली आहे. अनेक ठिकाणी त्याचा फायदा घेत टॅंकरलॉबी सरसावली आहे. गोकुळनगर, सुखसागरनगर भाग 2, साईनगर, अंबा माता मंदिर या भागातही पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे. पाणी येण्याच्या वेळा कोलमडल्या असून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रात्री एक ते पहाटे चार वाजेपर्यंत पाणी येत असल्याची तक्रार येथील महिलांनी व नागरिकांनी केली.

याबाबत महिला इंदिरा बैस यांनी आपली व्यथा 'सकाळ'कडे मांडली. त्या म्हणाल्या, "सुखसागरनगर येथील महिलांनी 2002 पासून पाण्यासाठी हाल सहन केले आहेत. 2007 ला पाण्याची पाइपलाइन टाकण्यात आली. आगामी 30 वर्षांचे नियोजन करून ही पाइपलाइन टाकण्यात आली; मात्र पाणीच येईना झाले आहे. आमचे पाणी टिळेकरनगर, कोंढवा व येवलेवाडीकडे कसे वळवले गेले. सध्या सुखसागरनगर भाग दोन, साईनगर, चामुंडा स्वीट मार्ट या भागाला रात्री दोन ते पहाटे चारपर्यंत पाणी येते. रात्रीचे उठून ज्येष्ठ नागरिक व महिलांना पाणि भरावे लागते. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी दोन दिवस प्रभाग समितीची बैठक घेऊन अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी काय साध्य केले.' गोकुळनगरमध्ये अनेक गल्या आहेत. गल्ली क्र. 3 ते 7 मध्ये रात्री पाणी येते. त्याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागतो. आमच्या पाणी प्रश्‍नाकडे कोणीच लक्ष देत नसल्याचे सांगत मधुसुदन कोरेकर, चंद्रकांत खरात, माउली शिंदे यांनी संताप व्यक्त केला. तक्रार करूनही महापालिका याकडे लक्ष देत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

''वारंवार पाण्यासाठी तक्रारी केल्या; पण अद्यापही रात्रीचे पाणी येते. त्यामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही. ते वाया जाते.''
- मधुसूदन कोरेकर, गोकुळनगर

''गुरुवारी पाणी बंद होते. शुक्रवारी वडगावची मोटार बिघडली. वृद्धेश्वर येथे 100 लाख लिटरची टाकी आहे. ती भरण्यासाठी वेळ लागतो. त्यातच गोकुळनगर व सुखसागरनगर हा उंच सखल भाग आहे. त्यामुळे टाकी भरलेली असताना पाणी सोडावे लागते; अन्यथा टाकी कमी झाली की या भागातील नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळेल.''
- सुनील अहिरे, पाणीपुरवठा अधिकारी, स्वारगेट
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com