ओढ आयुष्याची... 

- विराज वडनेरे, पुणे  --------------------- 
Tuesday, 13 August 2019

मामांच्या संस्कारातून माझे जीवन पूर्णपणे बदलले. प्रचंड खस्ता खाऊनसुद्धा ते आनंदी राहतात, हेच मला आश्‍चर्याचे वाटते. त्यांच्याकडून खूप काही घेण्यासारखे आहे. संपूर्ण समाजाला एक शिकवण दिल्यासारखे आहे. हे आमचे लाडके मामा म्हणजे भारत विनायक वाघ. 
 

काही दिवसांपूर्वी मुंबईतील विलेपार्ले येथे जाण्याचा योग आला, निमित्त होते बालकाश्रम (अनाथाश्रम) येथे जाण्याचा. माझ्यासमवेत आमचे मामा, आई, मावशी व भगिनी. 
मी विचारले, ""मामा, आपले विलेपार्लेत काय काम आहे.'' तर आमचे मामा म्हणतात, ""चल मी राहायला होतो, ते माझं घर तुम्हाला मी दाखवतो.'' माझी उत्सुकता अजून वाढली. कारण मामा पुण्यात राहतात, मुंबईला त्यांचे घर कसे काय? 
मामांचा जन्म हा स्वातंत्र्यापूर्वीचा 2 जुलै 1947. वयाची 71 वर्षे पार केलेले आमचे मामा. गप्पागोष्टी करत आम्ही बालक आश्रमात पोहोचलो. आमच्या मामांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता, कारण मामा हे स्वतः त्या अनाथ आश्रमात राहिले होते. 
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. विहीर, तो पूर्वी बंद असलेला रस्ता, यांची मामांना आठवण आली व आपले बालपण डोळ्यांसमोर उभे राहिले. आपण याच विहिरीजवळ आजूबाजूला असलेला मोकळ्या पटांगणात खेळलो, बागडलो याची आठवण मामांना झाली. अवघ्या नवव्या वर्षी ते आश्रमात राहावयास आले होते. 
हे सर्व पाहून मला काही शब्दच सुचेनात. निघताना जे गृहस्थ हल्लीच्या अनाथ मुलांची काळजी घेतात. ते म्हटले, की आज मला माझे वडील भेटले. कारण त्यांचे आडनावसुद्धा एकच, जे मामांचे आडनाव आहे. मामांच्या चेहऱ्यावरचे समाधान आनंद पाहून मी विचारले, ""अजून थांबायचे आहे का?'' 
मामाने मला संगितले, की जे सर शिकवायला होते, त्यांना मला भेटण्याची इच्छा आहे. मग त्यांचा पत्ता घेऊन शोधत शोधत विलेपार्लेतील त्यांच्या घरी पोचलो. मामांच्या गुरुजींचे वय शंभरी पार केलेले असावे. एवढ्या वर्षांत आणि विद्यार्थी भेटायला आल्याचे पाहून गुरुजींच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. 

गुरुजींची भेट आटोपल्यानंतर मामांचे डोळे पाण्याने तरले होते. काही वेळ गेल्यानंतर मामांना एक-एक प्रश्न विचारू लागलो. प्रश्न असे की, ""मामा, तुम्ही बालकाश्रमात कसे काय राहिलात?'' मामा म्हणाले, की ते काही मला माहिती नाही; पण माझ्या आईने मला येथे ठेवले होते. नियमानुसार काही वर्षांनी मी सज्ञान झाल्यानंतर मला बालक आश्रमामधून जाण्यास सांगितले.'' 

मामांना मग पुण्यात यावे लागले. सुरवातीला नातेवाइकांकडे ते राहिले. मामांनी अपार कष्ट केले. सुरवातीला दुकानात जे काम मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करीत असे. काही वेळा पदपथावर झोपून दिवस काढले. वायरिंगची कामे केली, रस्त्यावर उभे राहून पेपर विकले, पडेल ते काम करीत मामांनी पोटाची खळगी भरली. आई-वडील, भाऊ-बहीण, नाते-गोते असूनसुद्धा मामांना अनाथ आश्रमामध्ये राहावे लागले, या विचाराने माझ्या मनात काहूर माजत राहते. 
मामांनी अपार कष्टाने कुटुंबाचा सांभाळ केला. समाजामध्ये सर्वांचे नातेगोते सांभाळले. स्वतः अनाथ राहूनसुद्धा मुलांना आई, वडील, भाऊ, काका, मामा-मावशी कोण असते, हे नाते समजावले व सर्व नात्यांची घट्ट वीण आजही टिकवून ठेवली. 
कालांतराने त्यांना आईची पहिली भेट झाली; पण मामांनी तिचा राग न करता उलट प्रेमाने जवळ केले. आईला त्यांनी कधीही विचारले नाही, की तू मला तिथे का ठेवले? मामांचा हा मोठेपणा पाहून मला त्यांच्याकडून प्रचंड गोष्टी शिकायला मिळाल्या. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attraction of Life