काश्‍मीर मैत्री चौक सुशोभित करा 

सकाळ संवाद
Tuesday, 21 January 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

काश्‍मीर मैत्री चौक सुशोभित करा 

भारती विद्यापीठ परिसर: कात्रज डेअरीसमोर सरहद शाळेलगत पीएमपी बसथांब्याजवळ तीन रस्ते एकत्र येतात. या ठिकाणी काही वर्षांपूर्वी पदपथाच्या वर एक चौथरा बांधून त्यावर धातूची अतिशय सुंदर अशा फुलपाखराची प्रतिकृती बनविण्यात आली. त्याच्या आजूबाजूला हिरवळही करण्यात आली. या चौकाला काश्‍मीर मैत्री चौक अशा नावाचा फलकही लावण्यात आला. परंतु, सध्या या भागाची दुरवस्था झाली आहे. फुलपाखरावरचा रंग खराब झाला आहे. लोक तेथे लघुशंका करतात. कचरा टाकतात. तरी महापालिकेने हा दुर्लक्षित भाग पुन्हा एकदा सुशोभित करावा. 
- नारायण मुसळे 

शिवाजी रस्त्यावरील वाहतूक 
चतुर्थीला सुरू ठेवावी 

शिवाजी रस्ता: प्रत्येक चतुर्थीला शिवाजी रस्ता पीएमपी बस व अन्य वाहनांसाठी बंद केला जातो. फक्त राष्ट्रपती जाणार असतील तरच रस्ता बंद ठेवावा, हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. गणपती दर्शनाकरिता रस्ता वाहतुकीसाठी बंद करणे हे कोणत्या कायद्यात बसते? याचा पोलिस प्रशासनाने विचार करावा. रस्त्यांवर वाहतूक सुरळीत ठेवावी. 
- मुकुंद जोशी 

 

त्या दिवशी दैवयोगाने वाचलो... 
दांडेकर पूल : रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मी दांडेकर पुलाकडून येऊन नवश्‍या मारुती चौकात उजवीकडे सिग्नल मिळाल्यावर वळत होतो. तेवढ्यात, एक पॅगो रिक्षा पलीकडील रस्त्यावरील पेट्रोल पंपावर डिझेल भरून विरुद्ध बाजूने सिग्नल तोडून थेट राजाराम पुलाकडे वेगाने जायचा प्रयत्न करत होती. रस्ता दुभाजक व त्यावरील झाडे यामुळे मला ती दिसू शकली नाही. असे कुठले वाहन येईल, अशी अपेक्षाही नसताना वळताना एकदम भरधाव वाहन येताना दिसल्याने माझा गोंधळ उडाला; परंतु दैवयोगाने मी वाचलो. या चौकात व अलीकडील गणेशमळा चौकात जनता वसाहतीमधून चुकीच्या बाजूने येऊन प्रत्येक सिग्नलला अशी अनेक वाहने नियमभंग करत असतात. पोलिस कधीही कारवाई करताना दिसत नाहीत. कदाचित, एखादा बळी गेला की वाहतूक पोलिस जागे होतील. नवश्‍या मारुतीच्या मागील परिसरात राहणाऱ्या सर्वंच नागरिकांना हा धोका नियमित अनुभवावा लागतो. जीवावर उदार होऊन उजवीकडे वळायला लागते. राजाराम पुलाकडून येणारी वाहने सिग्नलच्याआधीच सुरू होतात व उजवीकडचा सिग्नल काही सेकंद असल्याने वळायचा धोका कायम राहतो. याशिवाय या चौकात सरळ जाणारी अनेक वाहनेही उजव्या लेनमध्ये उभी राहतात व वळणाऱ्या वाहनांना अडथळा करतात. अर्थात, शहरातील अनेक चौकांतील उजव्या वळणाऱ्या सर्वच वाहनांना असा अनुभव येतो. पुण्याइतकी बेशिस्त वाहतूक आणि सिंहगड रस्त्याएवढी चुकीच्या बाजूने होणारी वाहतूक जगात कुठे नसेल. 
- कुमार करकरे 
 

बीएमसीसी रस्त्यावर फलक लावा 
प्रभात रस्ता : प्रभात रस्ता ते बीएमसीसी रस्ता येथे पादचारी व सायकल मार्ग करण्यात आला आहे. अनेक नागरिक सकाळी तिथे नियमित चालण्यासाठी येतात. तिथेच महिलांसाठी ई-टॉयलेट आहे; परंतु त्याचा वापर कसा करायचा, याची माहिती नसल्याने त्याचा वापर होत नाही. तेव्हा तेथे माहिती फलक लावावेत किंवा तेथे कामगार नेमावेत, म्हणजे त्याचा वापर होईल. 
- विनिता चिटणीस 
 

संभाजी पुलावरून 
डावीकडे वळण्यास परवानगी द्या 

पुणे : संभाजी पुलावरून दुचाकी वाहनांना अनुमती आहे. आणखी एक विनंती आहे, की लाल दिवा असताना; पण रस्ता पूर्ण मोकळा असताना म्हात्रे पुलाकडून संभाजी पुलाकडे जाणाऱ्या वाहनांना दंड भरावा लागला. पुण्यात समोर लाल दिवा असताना अनेक ठिकाणी डावीकडे वळले तरी चालते, त्यानुसार येथेही वाहनचालक डावीकडे वळत असतात आणि त्याचा फटका बसतो. रस्ता पूर्ण मोकळा असेल, तर डावीकडे वळण्यास अनुमती असावी. 
- सु. ह. जोशी 
 

शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न सोडवा 

पुणे : शहरात वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी शहरात हेल्मेटसक्ती राबवली जात आहे. शहरातील बहुतेक सर्व रस्ते अरुंद आहेत. रोज वाहतुकीची कोंडी होते. रस्ता अडवून पदपथांवर विक्रेते बसलेले असतात. शहरात रोज घरफोड्या, खून, दरोडे, बलात्कार, साखळीचोर, गाड्यांची जाळपोळ, गैरव्यवहार, गुंडगिरी दहशत अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून पुणेकरांना सुरक्षित ठेवावे. सर्व रस्त्यांवरील पदपथांवरील अतिक्रमणे कायमस्वरूपी हटवावीत. वाहतुकीची कोंडी सोडवावी. या सर्व गोष्टींतून नागरिकांना सुरक्षितता द्यावी. बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाई करावी. 
-एम. डी. पवार 
 

पीएमपीमध्ये कुशल कर्मचाऱ्यांचा अभाव 
पुणे ः "पीएमपीसमोर देखभालीचा प्रश्न' ही बातमी वाचताना जाणवले की बेरोजगारी आहे आणि कुशल कर्मचाऱ्यांचा अभावही आहे; म्हणजे बेरोजगारी हा फक्त सरकारचा दोष नाही व नव्हता. पीएमपीमध्ये कुशल कर्मचाऱ्यांअभावी देखभालीचा खर्च वाढला तर पीएमपी तोट्यात जाणारच. 1200 पैकी फक्त 140 कर्मचारी आयटीआय उत्तीर्ण असतील, तर एवढी भारुडभरती कोणी व का केली, याची चौकशी करायला हवी. "आयटीआय' उत्तीर्ण उमेदवारांची खरीच एवढी वानवा आहे का? पदोन्नती दिलेल्या उमेदवारांना योग्य तऱ्हेने प्रशिक्षण दिले तरी ही वेळ येणार नाही. पीएमपी सक्षमतेने चालली तर रस्त्यांवरील वाहने कमी होऊन पार्किंगची समस्या कमी होऊ शकेल. 
- वासंती सिद्धये 
 

 

अधिकाऱ्यांची दफ्तरदिरंगाई कारणीभूत 
कोथरूड : "महर्षी कर्वे पुतळा मेघडंबरी दीडशे दिवे बंद व त्यावरून अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी,' "अतिक्रमण केलेल्या हॉटेलवर कारवाईस टाळाटाळ,' "विद्यापीठाच्या दिरंगाईमुळे दुसऱ्या सत्रात पहिल्या वर्षीच्या परीक्षा', "द्रुतगती मार्गाची दुरवस्था,' "वाचनालयाची शेड बनले तळीरामांचा अड्डा', "मदतीपासून शेतकरी वंचित,' "खडकवासला धरणातील पाण्यावर वीजनिर्मितीचा प्रकल्प रखडला,' या गेल्या आठवड्यातील "सकाळ'मधील प्रमुख बातम्या होत्या. या सर्व बातम्यांमध्ये एक गोष्ट समान होती ती म्हणजे अधिकाऱ्यांची दफ्तरदिरंगाई, हृदयशून्यता व असंवेदनशीलता. माझ्यासमोर आलेल्या कामाची फाइल सामाजिक दृष्टीने किती महत्त्वाची आहे व ते काम जलद व उत्कृष्ट केले नाही, तर किती जणांना असह्य त्रास होणार आहे हे जर देशातील नोकरशाहीला कळत नसेल, तर त्यांच्या शिक्षणाच्या पदव्यांना काही अर्थ नाही. मी या राष्ट्राचे काही देणे लागतो, हेच नागरिकांना, नेत्यांना व नोकरशाहीला समजत नाही. 
- संदेश झेंडे 
 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beautify Kashmir Friendship Chowk