नृसिंहवाडीत आजपासून कृष्णावेणी माता उत्सव

दत्तात्रय भानुदास पुजारी
बुधवार, 24 जानेवारी 2018

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे २४ जानेवारी ते २ फेब्रुवारीअखेर कृष्णावेणी मातेचा उत्सव होत आहे. त्यानिमित्त...

कृष्णा-पंचगंगा संगम तीरावर नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या बारा वर्षांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या दत्तनगरात २४ जानेवारीपासून २ फेब्रुवारीपर्यंत कृष्णावेणी मातेच्या उत्सवास प्रारंभ होत आहे. पौष शुद्ध द्वितीयेला प्रतिवर्षी या उत्सवाचे स्तंभपूजन केले जाते.

शत्तकोत्तर वाटचाल होऊनही या उत्सवाचा दिमाख व पारंपरिक धार्मिकपणा आजतागायत टिकून आहे. दत्तावतारी थोरले महाराज म्हणून ज्यांना ओळखण्यात येते, त्या प. पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी या उत्सवाची सुरुवात केली असल्याचे येथील जुन्या पिढीतील पुजारी मंडळींकडून सांगण्यात येते. पूर्वी दक्षिणेकडील अगदी नदीजवळील घाटावर हा उत्सव होत असे; परंतु सध्या हा उत्सव दत्त मंदिराच्या उत्तरेकडील भव्य शामियान्यात होतो. सूर्य रथावर बसून पृथ्वी परिभ्रमण करण्यास सुरुवात करतो म्हणून रथसप्तमी या पुण्य दिवशी या उत्सवाची सुरुवात होते.

बुधवारी (ता. २४) सकाळी धार्मिक पूजनाद्वारे कृष्णावेणी मातेच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना होईल. विशेष म्हणजे आजची तरुण पिढी या उत्सवात मोठ्या संख्येने कार्यरत झाली आहे. प्रतिवर्षीच्या या उत्सवात विविध स्वाहाकाराद्वारे होमहवन करून देवीदेवतांना प्रसन्न करून घेण्यात येते.

मातेच्या मूर्तीविषयी ‘कृष्णलहरी’ या ग्रंथात टेंबे स्वामी महाराजांनी सुंदर वर्णन केले आहे. ‘शमित तृष्णे’ या विशेषणाने त्यांनी तिचा जयजयकार केला आहे. तृष्णा म्हणजे तहान. ही माता सर्वच जीवांची भौतिक व शारीरिक तृष्णा शमन करते.
कृष्णामाता म्हणजे भगवान विष्णूचा जलावतार आहे. मानवी जीवनाचे अंतिम लक्ष्य भगवतप्राप्ती आहे आणि ते करून घेण्यासाठी तृष्णेकडे पाठ फिरवून कृष्णेच्या सन्मुख लीन होणे हा एकमेव मार्ग टेंबे स्वामी महाराजांना दिसतो. म्हणून ते या ग्रंथात कळकळीने सांगतात, जो भक्त कृष्णेची सेवा व भक्ती करतो, तोच भगवंताची कृपा प्राप्त करून घेतो.

कागलकर यांच्या घराण्यात ही मूर्ती ठेवण्याचा पूर्वीपासूनचा मान आहे. उत्सवाच्या दिवशी ही मूर्ती वाजतगाजत दत्त मंदिरात आणण्यात येते. सुवासिनी व माहेरवाशिणी यांच्याकडून  मूर्तीला नैवेद्य देऊन पंचारतीने ओवाळले जाते. ब्रह्मवृंदाकडून आरत्या, पदे, नामजपाचा अखंड जयघोष सुरू असतो. ‘कृष्णा विष्णू तनू साक्षात वेण्या देवो महेश्‍वरा’ म्हणजेच कृष्णा नदी ही विष्णूस्वरूप, वेणा ही शिवस्वरूप, तर कुकुदमती (कोयना) ही ब्रह्मस्वरूप आहे. 

Web Title: Dattatreya Bhanudas Pujari article