बांधकाम वाळूला पर्याय...

डॉ. निशिकांत तांबट
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

बांधकाम व्यवसायाला लागणारा महत्त्वाचा व प्रमुख घटक म्हणजे वाळू आणि त्याच्या प्रचंड तुटवड्यामुळं त्याला पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वाळूच्या तुटवड्यामुळे त्याचे भावदेखील गगनाला भिडले आहेत. साहजिकच या भाववाढीचा बोजा बांधकाम व्यावसायिकावर न पडता ग्राहकांवर म्हणजे जागा घेणाऱ्यावर पडतो. साहजिकच या व्यवसायावर अनिष्ट परिणाम होतो, पण अशी वेळ येईपर्यंत थांबणे म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणण्यातला प्रकार.

पूर्वी मातीची घरे बांधत असत. वाळूचा वापर नव्हता. मातीच्या जागी दगडी बांधकाम व चुना वापर सुरू झाला. पुढे चुन्याचा वापर दर्जा भरणे, भिंतीला प्लास्टर, गिलावा असा सुरू झाला. सिमेंट काँक्रिटच्या वापरामुळे वाळूचा मुबलक वापर सुरू झाला. वाळूशिवाय बांधकाम होऊ शकत नाही. साहजिकच वाळूचे साठे व त्याच्या व्यापाराला चांगले दिवस आले. चांगल्या दिवसानंतर वाईट दिवस हा निसर्गनियम. निसर्गावर अतिक्रमण केल्यावर केव्हातरी भविष्यात त्याचे परिणाम भोगावेच लागतात.

‘स्टील प्लॅंटमधील स्लॅग’ वाळूला पर्याय
देशात मोठ्या स्टील प्लॅंटमध्ये खनिजापासून धातू (लोखंड) वेगळा करण्यांसाठी Blast Furnace व इतर इलेक्‍ट्रिक फर्नेस ज्यामध्ये दिवसरात्र खनिजाचे शुद्धीकरण करून लोखंड, स्टील बनवण्याची प्रक्रिया सुरू असते. या प्रक्रियेमध्ये (Slag) तयार करावी लागते व शुद्धीकरणानंतर ती मळी टाकावू किंवा निरुपयोगी ठरते. दर दिवशी शेकडो टन मळी टाकून दिल्यामुळे स्टील प्लॅंटच्या आवारात डोंगर दिसू लागले व या निरुपयोगी मळीचे करायचे काय, असा मोठा प्रश्‍न आ वासून उभा राहिला.

‘स्लॅग’ वापरण्यातील अडथळे
लोखंड किंवा स्टील वितळल्यानंतर स्लॅग एका बाजूने बाहेर टाकली जाते. स्लॅगचे तपमान साधारणपणे १३००-१५०० सेंटिग्रेडपर्यंत असते. बाहेर टाकल्यावर ती हळूहळू थंड होते व त्याचा दगडाप्रमाणे आकार बनून त्याला तोडणे कठीण होते. काय असते या स्लॅगमध्ये म्हणून ती इतकी कठीण होते? लोखंड शुद्धीकरणात वेगवेगळे पदार्थ - चुना, ऑक्‍सिजन गॅस, कार्बन - वापरतात. पुढे उच्च तापमानाला भस्मीकरणामुळे अशुद्ध लोखंडातील काही नैसर्गिक पदार्थ जसे सिलिका, ॲल्युमिना हे स्लॅगमध्ये जातात. त्यामुळे स्लॅगमध्ये वेगवेगळे पदार्थ - कॅल्शियम, सिलिकेट, अल्युमिनेट असे पदार्थाचे मिश्रण होते. तसेच उच्च तपमानाला स्लॅगच्या बरोबरीने थोडे लोखंड / स्टीलचे प्रमाण राहते. त्यामुळे स्लॅगचे मोठमोठे दगड थंड झाल्यावर तोडणे कठीण होते. त्यातील लोखंड वेगळे करणाऱ्यांचा एक व्यवसाय आहे.
पुढे स्लॅगचा वापर लोखंड वेगळे केल्यानंतर, रेल्वेलाईन टाकत असता जमिनीखाली भर म्हणून झाला. हायवेवरील रस्ते करताना भर म्हणूनही याचा वापर होऊ लागला; पण खऱ्या अर्थाने स्लॅग बांधकामासाठी वापरण्याचा प्रयोग साधारण १००-१२५ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये झाला.

स्टील प्लॅंटमध्ये स्लॅग-मळी गरम असता त्याचे वाळूप्रमाणे दाणेदार रूपांतर करण्यात आले. या पद्धतीला ’Granulation’ असे म्हणतात. ग्रॅन्युलेशननंतर ती स्लॅग वाळूच्या ऐवजी वापरून संपूर्ण इमारत उभी केली. ती कित्येक वर्षे टिकली. याचे कारण म्हणजे स्लॅगमधील घटक, त्याचे गुणधर्म हे नैसर्गिक वाळूसारखेच किंबहुना त्यापेक्षा सरस (superior) असतात. तसेच ग्रॅन्युलेशन पद्धतीमध्ये स्लॅगमध्ये अडकलेले लोखंडाचे भाग आपोआप वेगळे होतात व ते काढून टाकणे सुलभ होते.

महाराष्ट्रात भरपूर स्टील प्लॅंट आहेत. तिथे दररोज शेकडो टन स्लॅग निर्मिती होत असते. अशा स्टील प्लॅंटच्या सहाय्याने त्यांच्या दररोजच्या प्रॉडक्‍शनमध्ये ग्रॅन्युलेशन प्लॅंट उभारले तर स्टील प्लॅंटसाठीही ते एक उपयुक्त उत्पादन होऊ शकते व बांधकाम व्यवसायाला नैसर्गिक वाळूसाठी पर्याय मिळतो. स्लॅग ग्रॅन्युलेशननंतर ती वेगवेगळ्या उत्पादनातही वापरता येऊ शकते. यावर म्हणजे ग्रॅन्युलेशन प्रोसेस व त्या प्रॉडक्‍टवर मी स्वतः काम केले आहे.

Web Title: Dr. Nishikant Tambat article