कामगार संघटनेचे जनक : नारायण लोखंडे 

डॉ. प्रमोद फरांदे 
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते नारायण मेघाजी लोखंडे यांनी महात्मा फुलेंच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांच्या अन्यायाविरोधात आवाज उठवत बॉम्बे मिल हॅंडस्‌ असोसिएशन ही देशातील पहिली कामगार संघटना स्थापन केली. या संघटनेच्या आणि "दीनबंधु' या पत्राच्या माध्यमातून त्यांनी आवाज उठवून कामगारांना साप्ताहिक सुट्टी, दुपारच्या जेवणाची सुट्टी, कामाच्या निश्‍चित वेळा, सर्वत्र सारखा पगार अशा विविध मागण्या मान्य करून घेतल्या व कामगारांना त्यांचे हक्क अधिकार मिळवून दिले. शुक्रवार (ता. 9) त्यांचा 121 वा स्मृतिदिन. त्यानिमित्त....

सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते नारायण मेघाजी लोखंडे यांनी महात्मा फुलेंच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांच्या अन्यायाविरोधात आवाज उठवत बॉम्बे मिल हॅंडस्‌ असोसिएशन ही देशातील पहिली कामगार संघटना स्थापन केली. या संघटनेच्या आणि "दीनबंधु' या पत्राच्या माध्यमातून त्यांनी आवाज उठवून कामगारांना साप्ताहिक सुट्टी, दुपारच्या जेवणाची सुट्टी, कामाच्या निश्‍चित वेळा, सर्वत्र सारखा पगार अशा विविध मागण्या मान्य करून घेतल्या व कामगारांना त्यांचे हक्क अधिकार मिळवून दिले. त्यासाठी त्यांनी सातत्याने लढा उभारला. त्या काळात लोकशाही पद्धतीने लढा करून त्यांनी देशामध्ये लोकशाही विचारांची पायाभरणी केली. शुक्रवार (ता. 9) त्यांचा 121 वा स्मृतिदिन. आजची कामगारांची स्थिती पाहता पुन्हा एकदा लोखंडे यांच्यासारखे नेतृत्व उभे राहण्याची गरज आहे. 

नारायण लोखंडे हे अतिशय स्वाभिमानी, जिद्दी, हरहुन्नरी, कष्टाळू, अभ्यासू असे व्यक्तिमत्त्व होते. महात्मा फुले यांच्या सहवासात त्यांना समाजस्थितीचे ज्ञान झाल्याने ते समाजकार्याकडे वळले. त्यासाठी त्यांनी गिरणीतील स्टोअरकिपरची नोकरी सोडली. त्यांच्या रूपाने बहुजन समाजाला विकासदृष्टी देणारा संपादक, सत्यशोधकी विचारवंत, समाजसुधारक मिळाला. त्या काळात गिरण्यांमध्ये कामाच्या वेळा, पगार निश्‍चित नव्हते. दुपारच्या जेवणाची सुट्टी नव्हती. सहा वर्षांच्या मुलालाही कामावर घेतले जाई.

गिरणी व्यवस्थापकांकडून मनमानी पद्धतीने गिरणी कामगारांची अनिर्बंध पिळवणूक केली जाई. सत्यशोधक चळवळीचा सर्व प्रकारच्या शोषणाला विरोध असल्याने नारायण लोखंडे यांनी महात्मा फुलेंच्या प्रेरणेने कामगारांसाठी कार्य करण्यास प्रारंभ केला. "दीनबंधु'तून त्यांनी कामगारांवरील अन्याय, त्यांच्या प्रश्‍नांबाबत लिहिण्यास सुरुवात करून सरकारचे, बुद्धिजीवी वर्गाचे याकडे लक्ष वेधले. कामगार ऍक्‍ट लागू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू केला. कामगार अॅक्‍टमध्ये केवळ अल्पशा तरतुदी असल्याने सुधारित अॅक्‍टसाठी रेटा लावण्यास सुरुवात केली.

लहान मुलांना कामावर घेऊ नये, अशी तरतूद करण्यास भाग पाडून लोखंडेंनी बालकामगार मुक्तीचा नारा त्यावेळी दिला. कामाच्या ताणामुळे बालकामगारांचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक नुकसान होत असल्याचे लोखंडे वैज्ञानिक पद्धतीने पटवून देतात. कामगारांचे संघटन करून त्यांना त्यांचे हक्क, अधिकारांची जाणीव करून देत त्यांच्या सभा घेतल्या. या सभांना 10 हजारहून अधिक कामगार उपस्थित राहत व सभेसाठी जागा अपुरी पडत असे. त्यामुळे लोक भितींवर, झाडांवर चढून लोखंडे यांचे भाषण ऐकत असत. कामगारांना आठवड्यातून एकदा साप्ताहिक सुट्टी, दुपारच्या जेवणाची सुट्टी, महिला, पुरुष कामगारांच्या कामाच्या निश्‍चित वेळा, सर्वत्र सारखा पगार, वेळेवर पगार, अपघात झाल्यास कामगार बरा होईपर्यंत पूर्ण पगार, औषधोपचाराचा खर्च द्यावा, मृत्यू झाल्यास कामगाराच्या कुटुंबाला पेन्शन मिळावी, मुलांच्या शिक्षणाची सोय, 16 वर्षांखालील मुलांस बालकामगार समजावे... अशा विविध मागण्यांचा कायदा करण्याची मागणी लोखंडेंनी केली.

ब्रिटिशांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने परिणामांची पर्वा न करता लोखंडेंनी "दीनबंधु' पत्रातून ब्रिटिशांवर प्रखर शब्दात प्रहार करून फॅक्‍टरी ऍक्‍ट लागू करण्यास भाग पाडले. पुढे या ऍक्‍टच्या अंमलबजावणीवरूनही लोखंडे ब्रिटिशांवर तुटून पडले. गिरणी मालकांनी रविवारी साप्ताहिक सुट्टी देण्यास विरोध दर्शविला. कामगार महिन्यातून 5 ते 6 दिवस दांड्या मारतात, यंत्राच्या दुरुस्तीसाठी, तेलपाणी करण्यासाठी 15 दिवसांतून एक दिवस मशीन बंद असते. त्यादिवशी सुट्टी असते, अशी विविध कारणे गिरणी मालक देत. त्यावर लोखंडेंनी यंत्र दुरुस्तीवेळी तेलपाणी करण्यासाठी, झाडलोट करण्यासाठी कामगारांना कामावर यावे लागते. त्यादिवशी त्यांना सुट्टी मिळत नाही. उलट त्यादिवशी काम करूनही त्यांना पगारसुद्धा मिळत नसल्याचे लोखंडे पुराव्यासह दाखवून देत. त्यावर रविवार हा ख्रिश्‍चन लोकांचा दिवस आहे. त्या दिवशी कशाला सुट्टी हवी, असे कारण सांगून कामगारांमध्ये दुफळी निर्माण करून साप्ताहिक सुट्टीचा डाव हाणून पाडण्याचा प्रयत्नही मालकांकडून केला गेला. त्यावर लोखंडेंनी रविवार हा खंडोबाचा वार असून कामगार खंडोबाचे भक्त आहेत, असा युक्तिवाद केला. अखेर लोखंडेंच्या दबावामुळे गिरणी मालकांना साप्ताहिक सुट्टी देण्याचे मान्य करावे लागले आणि कामगारांना साप्ताहिक सुट्टी सुरू झाली. 

लोखंडेंनी आपले सारे आयुष्य समाजबदलासाठी वाहिले. या चळवळीमागे सत्यशोधकी तत्त्वज्ञान होते. कामगारांच्या उन्नतीसाठी ते आयुष्यभर लढत राहिले. मात्र त्यांनी कधीही हिंसेला स्थान दिले नाही. सनदशीर मार्गाने त्यांनी चळवळ उभी केली आणि चालवली. 1893 मध्ये काही कामगारांनी व्यवस्थापकास मारहाण केली असता लोखंडेंनी कामगारांची "दीनबंधु'मधून जाहीररीत्या कानउघाडणी करत, जे काही करायचे आहे ते सनदशीर मार्गाने करा, कायदा हातात घेऊ नका, असा कडक इशारा दिला.

त्यांच्या चळवळीमागे बुद्धांचे अहिंसेचे तत्त्वज्ञान होते. कोणतीही व्यक्ती, समाजाच्या विचारांमध्ये बदल झाल्यास रक्तरंजित क्रांतिशिवाय परिवर्तन घडवता येऊ शकते, यावर लोखंडेंचा विश्‍वास असल्याचे यावरून दिसून येते. लोखंडेंनी उभारलेल्या कामगार लढ्यातून, समाज परिवर्तनाच्या कार्यातून लोकशाहीची पायाभरणी केल्याचे सिद्ध होते. आजची कामगारांची होत असलेली दयनीय स्थिती, कामगार कायद्याची होत असलेली पायमल्ली, शिक्षणासह सर्व क्षेत्रात आलेल्या कंत्राटी तत्त्वामुळे एकाच कामासाठी मिळणारे विषम पगार, कामगारांची होत असेलली पिळवणूक पाहता लोखंडे यांच्यासारख्या पुन्हा एका नेतृत्वाची काळाची गरज बनली आहे. त्यासाठी लोखंडे यांचे कार्य, विचार हे आजही दिशादर्शक आहे. 
 

Web Title: Dr Pramod Pharande article