नदी पुनरुज्जीवनाचा ‘रत्नागिरी पॅटर्न’

साईल शिवलकर / ओमकार गिरकर
सोमवार, 21 मे 2018

फणशी हनुमान मंदिरजवळ नदीचा एका वहाळाचा उगम होतो. वाढती घरे, इमारती व लोकसंख्येमुळे या वहाळाशेजारील नाल्यातील सांडपाण्यातील दूषित पाणी या वहाळात मिसळते. हे पाणी जैविक पद्धतीच्या रीड-बेड तंत्रज्ञानाने शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांनी रिसायकल केले. त्यातून आत्मविश्‍वास वाढला. आता पुढच्या टप्प्यात या नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा विडा तंत्रनिकेतनच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी उचलला आहे. गरज आहे ती रत्नागिरीकरांच्या सक्रिय सहभागाची.

शासकीय तंत्रनिकेतनमधील एक प्रकल्प म्हणून विद्यार्थ्यांनी पाणी रिसायकल केले. राज्यभरात जलस्वराज्य जलयुक्त शिवार, नाम फाउंडेशन, पाणी फाउंडेशनद्वारे पाण्यासाठी जे उपक्रम चालू आहेत. कोल्हापूरमध्ये पंचगंगा प्रदूषण थांबवण्याकरिता ‘सकाळ’नेही पुढाकार घेतला. फणशीतील नदी पुनरुज्जीवनाचा आता ‘रत्नागिरी पॅटर्न’ बनू पाहत आहे. जलसंधारणतज्ज्ञ डॉ. उमेश मुंडले यांचेही मार्गदर्शन लाभत आहे. सामाजिक कार्य करणार्‍या रत्नागिरीतील संस्थाही मदत करत आहेत.

रत्नागिरी शहरामध्ये असलेल्या वेगवेगळ्या पाण्याच्या स्रोतामधील एक महत्वाचा पण तितकाच दुर्लक्षित असा पाण्याचा प्रवाह म्हणजे परटवणे नदी. वर्षाचे बारा महिने स्वच्छ पाण्याच्या झर्‍याने ही नदी अखंड वाहते. या पाण्यावर भरपूर लोकांचे जीवन अवलंबून आहे. हा प्रवाह फणशीच्या मारूतीच्या देवळाच्या बाजूने सुरू होतो. पाण्याचा प्रवाह हा उन्हाळयात ही 10 ते 15 एचपी इतक्या वेगाने चालू असतो. हाच प्रवाह पुढे सावंतनगर परटवणेकडून समुद्राला जावून मिळतो.

रीड-बेड तंत्र

फणशी येथे दोन ठिकाणी बंधारे बांधून दूषित पाणी अडवण्यात आले. त्यामुळे सर्व गाळ खाली बसून वरच्या थरातील पाणी पुढे वाहते. या बंधार्‍यांच्या पुढे काही अंतरावर लोखंडी तारांचा जाळीचा बॉक्स ठेवण्यात आला. त्यात दगड-गोटे आणि मातीचा भराव, कर्दळी आणि अळूची झाडे लावली. त्यातून झाडांचे कृत्रिम बेट तयार केले. झाडांची मूळं, खोडांमध्ये गाळ व बॅक्टेरिया अडकून राहिल्याने वाहते पाणी शुद्ध होते. हे पाणी आरोग्यास अपायकारक नाही.

या नदीवरच कोल्हापूर टाईप बंधारा फणशीमध्ये बांधण्यात आला होता. याच नदीमधून शिरगाव ग्रामपंचायत जॅकवेलद्वारे शिरगावमध्ये पाणीपुरवठा करत आहे. बरेच वर्ष या नदीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या नदीच्या उगमस्थानीच गाळ साठला आहे. त्यामुळे पाणी त्या ठिकाणी साठत नाही. तसेच बाजूने वाहणार्‍या सांडपाण्याच्या नाल्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. कारण तिकडून वाहणारे सांडपाणी या शुद्ध पाण्यामध्ये मिसळून साठा आणि जॅकवेलचे पाणी अशुद्ध करत आहे.

योग्य नियोजन करून काम केल्यास हे फायदे

  • कोल्हापूर बंधार्‍यात सुमारे 5 लाख लिटर पाणी साठेल.
  • परटवणे, सावंतनगर भागातील विहीरींना कायम मुबलक पाणी मिळेल.
  • स्थानिक लोकांना रोजच्या कामासाठी पाणी उपलब्ध राहील.
  • पाण्याचा साठा झाल्याने गरज लागल्यास वापरता येईल.
  • परिसरातील वनस्पती आणि पक्ष्यांची संख्या वाढेल.

नदी पुनरुज्जीवनासाठी आराखडा

नदी पुनरुज्जीवनासाठी आम्ही एक आराखडा तयार केला आहे. मारूतीचे मंदिर फणशीपासून 60 मीटर अंतरावरच्या बाजूस नाल्याची काँक्रीट भिंत बांधावी लागेल. मारूतीचे मंदिर फणशीपासून 30 मीटर अंतरावरच्या बाजूस जीर्ण दगडांची भिंत पाडून दुसरी काँक्रीट भिंत बांधावी लागेल. 

फणशीमध्ये 60 मीटर अंतरावरच्या बाजूस 15 मीटर बाय 2 मीटरचा नाला साफ करावा लागेल. यात दगड, माती पडून सांडपाण्याला अडथळा झाला व त्यामुळे हे पाणी नाल्याबाहेर पडत आहे. त्यामध्ये दगड आणि माती पडून सांडपाण्याला अडथळा झाला आहे.  त्यामुळेच सांडपाणी हे नाल्याबाहेर पडत आहे. ही तीनही कामे त्वरित केली तर जॅकवेलचे पाणी आणि नदीचे पाणी शुद्ध होणे शक्य होईल.

चौथे काम म्हणजे फणशीच्या पायरीजवळ असणारा नाला म्हणजे नाल्याचे पाणी पायर्‍यांच्या खालून जाते. तो मार्ग दुरुस्त करावा लागेल. तिथे 4 मिटर बाय 1.2 मिटर बाय 0.3 मिटर ची काँक्रीट भिंत बांधावी लागेल. नंतर नदीमधील गाळ काढण्याचे काम मोठे आहे. फणशी येथे 15 मि. बाय 33 मि. एवढा भाग गाळाने भरला आहे. दोन टप्यामध्ये हा गाळ काढता येईल. 

पहिल्या टप्प्यात बंधार्‍यापासून 15 मि. बाय 15 मि. 192.39 कमीत कमी गाळ काढावा लागेल. व दुसर्‍या टप्प्यात 15 मि. बाय 18 मि. मधून गाळ काढावा लागेल. पुढच्या टप्प्यात फणशी येथे लोखंडी किंवा काँक्रीटचे गेट 1.1 मि. बाय. 0.9 मि. एवढ्या आकाराचे बसवल्यास कायमस्वरूपी होईल.

 

Web Title: Esakal Citizen Journalism Ratnagiri Pattern of River Rejuvenation article