Ganesh Festival गणेशोत्सव, मोदक व डायबिटीस

डॉ. वर्षा खत्री
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

गणपतीचे आगमन केवळ भक्तांच्या घरातच नाही, तर दृदयातही होते. परंतु, या निमित्ताने आपण सर्वांचे आवडते मोदक आणि अन्य गोड पदार्थही पोटामध्ये ढकलतो. विविध प्रकारचे गोड पदार्थ हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे आणि तो सणांचा एक भाग मानला जातो. येणारे मित्र व नातेवाईकही गोड पदार्थांच्या माध्यमातून सणांमध्ये सहभागी होतात. अशा वेळी, गोड पदार्थ नाकारणे किंवा कमी खाणे अयोग्य मानले जाते.परंतु, विशिष्ट आजार असलेल्या व्यक्तींनी अशा साजरीकरणामध्ये सहभागी होत असताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा, त्यांच्या आरोग्यावर बेतू शकते.

गणपतीला अनेकदा ‘विघ्नहर्ता’ असे समर्पकपणे म्हटले जाते. लाखो भाविक कोणताही नवा व्यवसाय किंवा काम सुरू करण्यापूर्वी गणपतीचे नाम जपतात व त्याचा आशीर्वाद घेतात. घरामध्ये गणपतीची लहान मूर्ती आणतात. तसेच अनेक भाविक लोकप्रिय मंडळांच्या गणपतीचेही दर्शन घेतात. मग यासाठी त्यांना अनेक तास किंवा अनेक दिवस रांगेमध्ये प्रतीक्षा करावी लागली तरी त्यांची हरकत नसते.

गणपतीचे आगमन केवळ भक्तांच्या घरातच नाही, तर दृदयातही होते. परंतु, या निमित्ताने आपण सर्वांचे आवडते मोदक आणि अन्य गोड पदार्थही पोटामध्ये ढकलतो. विविध प्रकारचे गोड पदार्थ हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे आणि तो सणांचा एक भाग मानला जातो. येणारे मित्र व नातेवाईकही गोड पदार्थांच्या माध्यमातून सणांमध्ये सहभागी होतात. अशा वेळी, गोड पदार्थ नाकारणे किंवा कमी खाणे अयोग्य मानले जाते.परंतु, विशिष्ट आजार असलेल्या व्यक्तींनी अशा साजरीकरणामध्ये सहभागी होत असताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा, त्यांच्या आरोग्यावर बेतू शकते.

विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असलेला एक आजार म्हणजे डायबिटीस. आजूबाजूला इतके चविष्ट गोड पदार्थ असताना त्यापासून स्वतःला दूर ठेवणे अवघड असते. परंतु, गोड पदार्थांचा आस्वादही घेता येईल आणि विशिष्ट काळजीही घेतली जाईल, असा मध्यम मार्ग यातून काढता येऊ शकतो. 

डायबिटीस झालेल्या व्यक्तींनी साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी घेण्याचे काही सोपे उपाय पुढे दिले आहेत: 

नैसर्गिक गोडपणा असलेले पदार्थ निवडणे : 
मोदक व गणेश चतुर्थी यांचे अतूट नाते आहे. वाफवलेले मोदक अधिक आरोग्यदायी असतात, कारण ते तळलेले नसतात. परंतु, त्यामध्ये असलेल्या प्रचंड साखरेमुळे डायबिटीससारखे आजार असलेल्या व्यक्तींसाठी ते धोकादायक असतात. त्यामुळे, साखरेच्या ऐवजी गुळ, खजूर किंवा अंजीर अशा नैसर्गिक पर्यायांचा वापर करावा. गुळामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते व शरीरातून घातक टॉक्सिन्स बाहेर टाकून लिव्हर स्वच्छ करण्यासाठी गुळामुळे मदत होते. तसेच, खजूर व अंजीर अतिशय आरोग्यदायी आहेत व शरीराला प्रचंड ऊर्जा देणारे आहेत.

निरोगी जीवनशैली अंगिकारणे : 
केवळ सणासुदीच्या वेळीच नाही, तर संपूर्ण वर्षभर आरोग्याविषयी जागरुक राहणे आवश्यक आहे. शारीरिक हालचाली असलेली दैनंदिनी व नियमित व्यायाम यांचा समावेश असलेली निरोगी जीवनशैली अंगिकारल्यास फिट राहता येते. त्यामुळे आजारांना दूर ठेवता येते. यासाठी, शारीरिक प्रयत्न गरजेचे आहेत. त्याचबरोबर मानसिकदृष्ट्या तयार राहावे. तीव्र इच्छाशक्तीने ठरवलेल्या गोष्टी पूर्ण कराव्यात.

प्रमाण व वेळ यावर नियंत्रण ठेवणे : 
भरपूर प्रमाणात खाण्याच्या ऐवजी कमी प्रमाणात खाण्याकडे लक्ष द्यावे. यामुळे, डायबिटीस असलेल्या व्यक्तीची ब्लड शुगर पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल. याबरोबरच, आरोग्याशी संबंधित कोणतीही गुंतागुंत होऊ नये, याची दक्षता घेण्यासाठी नियमित कालावधीने थोडे थोडे खावे. खाण्याच्या योग्य वेळा निश्चित करणे गरजेचे आहे. रात्री उशिरा, असे वेळी-अवेळी खाल्याने आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.

आरोग्यदायक पदार्थ निवडणे :
 सर्वच गोड पदार्थ आरोग्यदायी नसतात व आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम करतात, हा गैरसमज आहे. बाजारात असे असंख्य पदार्थ उपलब्ध आहेत जे रुचकर असतातच, शिवाय भरपूर ऊर्जा देतात. निरोगी पदार्थ म्हणजे महागडे पदार्थ, असेही समजू नये - सर्व निरोगी पदार्थ महाग असतात, असा चुकीचा समज आहे.

वेळेवर आरोग्याची तपासणी करून घेणे :
सर्व व्यक्तींनी वेळेवर व नियमितपणे आरोग्य तपासणी करून घेणे, तसेच डायबिटीसची तपासणी करण्यासाठी ब्लड शुगरची पातळी तपासून घेणे महत्त्वाचे आहे. त्याचे निदान वेळेवर झाले तर झटपट वैद्यकीय उपचार घेता येऊ शकतात आणि त्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवण्याची शक्यता वाढते. वेळेवर व नियमित आरोग्य तपासणी केल्याने व्यक्तीला आजाराची काळजी घेता येतेच, शिवाय फिट राहता येते.    

थोडक्यात, अन्नपदार्थ हा कोणत्याही साजरीकरणाचा अविभाज्य भाग आहे आणि विशेषतः सणासुदीमध्ये त्याचे महत्त्व विशेष आहे. परंतु, आरोग्याच्या समस्यांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही किंवा त्यांना कमी प्राधान्य देऊन चालणार नाही, हेही लक्षात घ्यायला हवे. डायबिटीससारखे आजार असलेल्या व्यक्तींनी ही काळजी घ्यायला हवी, कारण आरोग्य चांगले असेल तर वर्षातून विशिष्ट दिवशीच नाही, तर दररोजच सण असल्यासारखे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival, Modak, sweet foods and diabetes