बैलांसह जीवापाड भलरी जपणारा शाहिर.. दत्ता मोरे.

गोविंद पाटील
मंगळवार, 24 एप्रिल 2018

ही भलरी जिवंत ठेवलेला एक लोककलाकार कोनवडे (ता. भुदरगड) येथे राहतो .. दत्ता मोरे हे त्याचं नाव... लहानपणापासून बैल बाळगून बिद्री कारखान्याला ऊस वाहतूक करणारा दत्ता भल्या सकाळी ऊसाच्या फडात.. बैलगाडी हाकताना रस्त्याने ही गाणी गातो..

लोकसाहित्य हे खेड्यापाड्यातील लोकजीवनाचा आरसा असतो... कृषी संस्कृतीचा भार पेलणारा बैल हा या साहित्याचा केंद्रबिंदू होता.आज खेड्यात ट्रॅक्टरने धुमाकूळ घातला आहे. बैल नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.. पूर्वी हा बैल शेतकऱ्यांच्या कुटूंबाचा अविभाज्य भाग होता..गो-कुळातल्या या प्राण्यांच्या संगोपनासाठी शेतकरी..त्याची मालकिण..पोरे .. जीवापाड मेहनत घेऊन त्याला जपायची..प्रसंगी स्वता उपाशी राहून त्याची काळजी घ्यायची..बेंदूर सणाला त्याची पूजा व्हायची.. गोडधोड खायला दिले जायचे.. शेतकरी त्याच्या कौतुकाचे गाणे गायचा तीच भलरी...बैलगाणी.

ही भलरी जिवंत ठेवलेला एक लोककलाकार कोनवडे (ता. भुदरगड) येथे राहतो .. दत्ता मोरे हे त्याचं नाव... लहानपणापासून बैल बाळगून बिद्री कारखान्याला ऊस वाहतूक करणारा दत्ता भल्या सकाळी ऊसाच्या फडात.. बैलगाडी हाकताना रस्त्याने ही गाणी गातो...मालकासाठी राबणाऱ्या बैलांचे कौतुक गाताना तो म्हणतो...

"आरं गाडीच्या गाडीवाना...
 तुझ्या गाडीला हिरवा रंग..
राधा पाहून झाली दंग
गाडी मारतो पांडुरंग....."

हा तरुण गाडीवान गाडी घेऊन कोकणात गेल्यावर एक आक्रित घडतं..तो एका नारीच्या कचाट्यात सापडतो..शाहिराचे शब्द किती सहजपणे बाहेर पडतात...

"आरं गाडीच्या गाडीवाना
गाडी चालली कोकणात
तिथं पडली नार गाठ...
तीनं लावली सारी वाट..
परघरच्या  नारीसाठी..
माझं तुटलं गणगोत
तिका सोडीना डावं बोटं...."

बैलाला झूल घालून सजवण्याचे त्याला वेड आहे... हि झूल त्याने कोल्हापूरच्या प्रसिद्ध टेलरकडे शिवायला दिली आहे...तो म्हणतो..

"धाडी सांगावा तिकडं गा
कोल्हापूरच्या टेलराला 
झुला टाकल्यात शिवायाला गा
हौश्या बैलाला घालायाला...."

हि गाणी काही नुसतीच वरवरची जोडाजोडी नाही.. अलंकार घालून ठुमकणा-या तरुण मुलीबद्दल शाहिर म्हणतो...

"नार निघाली पाण्यायाला
तीची जोडवी वाजत्यात
कुडकं कानात हालत्यात गा
पोरं लेझीम खेळत्यात...
बैलं चाळाची डुलत्यात..."

दत्ता मोरे या शाहिराने जीवापाड जपलेली ही भलरी सोशल मीडियातही भलतीच लोकप्रिय होतांना दिसतेय..

Web Title: Govind Patil writes in Esakal Citizen Journalism