साहित्य संमेलन एक साहित्य मेजवानी... 

साहित्य संमेलन एक साहित्य मेजवानी... 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्याला पार पडले. साहित्य संमेलन म्हणजे साहित्यिकांचा आणि साहित्य प्रेमींचा मेळावा. या वर्षी जेव्हा कविकट्टा साठी कविता पाठवण्याचे आवाहन वाचले तेव्हा कविता पाठवली. यथावकाश कवितेची निवड झाली म्हणुन त्यांचा फोन व पत्र आले आणि परत एकदा संमेलनाच्या अनुभवासाठी मी आतुर झाले. 

एकोणनव्वदव्या संमेलनाचा पिंपरी चिंचवड येथील अनुभव छानच होता. भव्यदिव्य असा दिमाखदार सोहळा. त्यात माझी "नारी तुच' ही कविता रसिकांना तर आवडलीच पण तिची निवड "एकोणनव्वद' या काव्यसंग्रहात पण झाली. यंदाही कवि निवड करण्यात आली म्हणून मग जायचे ठरवले. पण रिझर्वेशन 16 तारखेचे मिळाल्याने उद्‌घाटन सोहळा हुकला. पण सतरा आणि अठरा हे दोन दिवस हातात होते. 

कविकट्टा तर ओसंडून वाहत होताच. पण इतर कार्यक्रमासही भरगच्च गर्दी होती. सकाळी निमंत्रितांचे काव्य वाचन ऐकायला मिळाले. म्हणजे साहित्याचा नाश्‍ता तर उत्तम झाला. नंतर दुपारी श्री महाराजा संभाजीराव गायकवाड याची नवभारताची संकल्पना आणि योगदान यावर परिसंवाद ऐकला. खरच त्यांचे कार्य इतके थोर आणि त्यांची दुरद्रुष्टी कळली. आता पंतप्रधान जी पावले देशासाठी उचलत आहेत ते महाराजा गायकवाडांनी तेव्हाच जाणले होते. 

त्यानंतर मेहता सभागृहात कथा, कथाकार व कथानुभव हा कार्यक्रम म्हणजे दुपारची साहित्यातले पुरणाचे वड्या भज्याचे असे भरगच्च जेवणच ठरले. संमेलनाला येण्याचे सार्थक झाले. लेखिका मंगला गोडबोले, मोनिका गजेंद्रगडकर आणि स्थानिक गुजराती लेखिका हिमांशी शेलत. त्यांची मुलाखत घ्यायला सुत्र संचालक निलिमा बोरवणकर होत्या. हा कार्यक्रम म्हणजे सुत्रसंचालनाचा आणि मुलाखत कशी असावी त्यात लेखिकांनी उत्तरे कशी द्यावी याचा एक उत्कृष्ट नमुना होता, नव्हे तर नविन लिहिणाऱ्यांसाठी ती एक कार्यशाळा होती म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मंगला गोडबोले त्यांच्या लिखाणा इतक्‍याच खुसखुशीत बोलल्या, तर मोनिकाजी त्यांच्या गुढ गंभीर लिखाणासारख्या. बडोद्याच्या हिमांशीजींना त्यांच्या कथांची पात्रे आधी भेटतात व कथा नंतर येते असे त्या म्हणाल्या.. 

यावरही कळस म्हणजे बहुभाषिक कविसंमेलन. संध्याकाळच्या कॉफीसारख रोमॅन्टिक आणि आत दुखरे तरी हवहवेसे वाटणाऱ्या क्षणांसारखे अप्रतिम. त्यात खलील धनतेजवी यांच्या गजल शेर शायरी यांनी संध्याकाळ सुनहरी केली. तसेच जयश्री जोशी यांच्या कविता पण थेट भिडणारी होती. 

एकाच वेळेस सगळीकडे विविध कार्यक्रम असल्याने सगळ्याच कार्यक्रमांना उपस्थित राहता आले नाही. पण मी माझ्या आवडीचे सारे कार्यक्रम नक्कीच पाहीले. अठरा तारखेला माझे काव्य वाचन झाले. व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांना तर कविता आवडलीच. पण त्यानंतरही रसिकप्रेक्षकांनी पण पसंतीची दाद दिली. हे जास्त सन्मानाचे वाटते. 

कुणाला आयोजनात त्रुटी वाटल्या. कुणाला नियोजनात. पण मला तरी आपण साहित्य मेजवानीसाठी गेलो होतो आणि ती उत्तम सकस चवदार वाटली यात शंका नाही. माझे नुसते पोट भरले, असे नाही तर समाधानाची ढेकर पण आली. मन तृप्त झाले. 

रसिकांसाठी माझी कविता 

"हे प्रभो" 

हे प्रभो मज प्रकाश दे तू, पाऊलांपुरताच पथ चालतांना 
पंख दिले तर बळही दे त्या, गगनभरारी मारतांना.... 
इतुकेच मिळू दे पोटापुरते, भुक जिथे छळणार नाही 
इतुकेही तू देऊ नको की, बरे वाईट कळणार नाही 
हात जोडुनी विनविते तुज, मागणे हे मागतांना....... 
दीनदुबळ्या पिडितांना आधार देण्या मज ताठ कणा दे 
दुष्टदुर्जनां अधमांना परी, शासण्यास मज विष फणा दे 
सुमती दे तू शुद्धमती दे, कलियुगात या वावरतांना....... 
मजसी रोखण्या सरसावतील बहू, सत्य मार्ग ना रूचे कुणा 
तरी न ढळावी श्रद्धा माझी, असाच राहो चांगुलपणा 
थकले हरले जर चालतांना, तुच उभारी देई पुन्हा..! 
हे प्रभो, मज प्रकाश दे तू, पाऊलांपुरताच पथ चालतांना... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com