#WeCareForPune प्रश्न मांडू; उत्तरेही शोधू : सजग पुणेकर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 February 2019

#WeCareForPune चला एकत्र येऊया आणि 'सकाळ संवाद'द्वारे पुण्यातील समस्या सोडवूया!

'सकाळ संवाद' च्या माध्यमातून सजग नागरिकांनी सातत्याने आपले प्रश्न मांडले आणि ते सोडविले देखील! दर महिन्याला अनेक सजग नागरिक आपले प्रश्न मांडण्यासाठी सकाळ संवादचा वापर करत आहे. पुण्यातील समस्या सोडविण्यासाठी तुमचा सहभाग असेल तर नक्कीच आपण एकत्र येऊन हे चित्र बदलू शकतो. #WeCareForPune!
 

'पुणे : कुणी महापालिकेमध्ये काम करणारे, तर कुणी स्वतंत्र व्यवसाय करणारे..प्रत्येक जण स्वतंत्र विचाराचे; पण ध्यास एकच.. 'आपलं पुणे, आपला परिसर नीटनेटका असावा!' 

पुण्यातील नागरी समस्यांविषयी आवाज उठविणारे सजग नागरिक 'सकाळ माध्यम समूहा'च्या मंचावर आज (शनिवार) एकत्र आले होते. निमित्त होते 'सकाळ संवाद'च्या #WeCareForPune या मोहिमेच्या प्रारंभाचे!

अवतीभवती असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी केवळ प्रशासनावरच अवलंबून न राहाता नागरिकांचा सक्रिय सहभागही आवश्यक आहे. म्हणूनच 'सकाळ'ने  #WeCareForPune या मोहिमेद्वारे शहराविषयी आपुलकी असलेल्या आणि विविध समस्यांविषयी आवर्जून आवाज उठवून त्यावर तोडगा शोधू पाहणार्‍या नागरिकांना एकाच व्यासपीठावर आणण्याची सुरवात केली आहे. प्रारंभाच्या बैठकीतच पुण्यातील प्रश्न तर मांडूच; शिवाय उत्तरेही शोधण्यासाठी एकत्र येऊ, असा निर्धार या नागरीकांनी व्यक्त केला.

बैठकीस महापौर मुक्ता टिळक आवर्जून उपस्थित होत्या. महापालिकेच्या विविध प्रकल्पांची माहिती नागरीकांना देतानाच त्यांनी 'तुमच्या समस्या, प्रश्न आम्हाला सातत्याने कळवत राहा. महापालिकेने राबविलेल्या उपक्रमांमध्ये उस्फुर्त सहभाग नोंदवा', असे आवाहनही केले. यावेळी 'सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस आणि सहयोगी संपादक रमेश डोईफोडे उपस्थित होते. 

विविध भागात होणार जागर
'सकाळ संवाद' या सजग नागरिकांसाठीच्या मोबाईल अॅपच्या माध्यमातून गेली दोन वर्षे शहरातील नागरिक लिहिते होत आहेत. अशाच प्रकारच्या बैठका आता पुणे शहरात विविध ठिकाणी होतील. येत्या काळात पुण्यातील प्रत्येक प्रभागामध्ये नागरिकांचा आवाज म्हणून आणि समस्या मांडण्याबरोबरच त्यावरील उपाय सुचविण्यासाठी 'सकाळ संवाद' कार्यरत राहणार आहे. #WeCareForPune या हॅशटॅगद्वारे आपणही यामध्ये सहभागी होऊ शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #WeCareForPunecampaign start today with Mayor and Citizen In sakal