कोरोनाचा फटका मुकेश अंबानी यांना; संपत्ती होतेय मोठी घसरण

वृत्तसंस्था
Tuesday, 7 April 2020

गेल्या दोन महिन्यात अंबानींच्या संपत्तीत एकूण 19 अब्ज डॉलरची घट झाली आहे. जागतिक क्रमवारीत आठ स्थानांची घसरण होत ते 17 व्या स्थानावर पोचले आहेत.

मुंबई : देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मागील दोन महिन्यात 28 टक्क्यांची घट झाली आहे. रोज सरासरी 30 कोटी डॉलरची घट होत, गेल्या दोन महिन्यात अंबानींच्या संपत्तीत एकूण 19 अब्ज डॉलरची घट झाली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जागतिक क्रमवारीत आठ स्थानांची घसरण होत ते 17 व्या स्थानावर पोचले आहेत. हरुन ग्लोबल रिच लिस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अंबानींची संपत्ती 48 अब्ज डॉलरवर पोचली आहे. कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील शेअर बाजारात मोठी घसरण झाली. भारतीय  शेअर बाजारात देखील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. त्याचा फटका अंबानींना बसला आहे.

सोन्याच्या दरात मोठी वाढ; नवे दर...

कोणा कोणाच्या संपत्तीत घट?
देशातील इतर उद्योगपतींच्या  संपत्तीत देखील घसरण झाली आहे. गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये 6 अब्ज डॉलरची (37 टक्के) घट झाली आहे. तर एचसीएल टेक्नॉलॉजीसच्या शीव नाडर यांच्या संपत्तीत 5 अब्ज डॉलरची (26 टक्के) घट झाली आहे. कोटक महिंद्रा बॅंकेचे एमडी उदय कोटक यांच्या संपत्तीत 4 अब्ज डॉलरची (28 टक्के) घट झाली आहे. देशातील सर्वच आघाडीच्या उद्योगपतींच्या संपत्तीत मागील दोन महिन्यात मोठीच घट झाली आहे. संपत्तीत सर्वाधिक घट होणाऱ्या उद्योगपतींमध्ये मुकेश अंबानी हे जगात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर एलव्हीएमएचचे मुख्य कार्यकारी अधिकारी बर्नार्ड अर्नाल्ट यांच्या संपत्तीत सर्वाधिक म्हणजे 30 अब्ज डॉलरची (28 टक्के) घट होत त्यांची संपत्ती 77 अब्ज डॉलरवर आली आहे. भारतीय शेअर बाजारातील मुख्य निर्देशांकामध्ये गेल्या दोन महिन्यात 25 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.

coronavirus: कोरोनासह इतर आजारांनी 78 टक्के रुग्णांचा मृत्यू 

जागतिक पातळीवर काय?
अमेझॉनचे जेफ बेजोस यांच्या संपत्तीत फक्त 9 टक्क्यांची घसरण झाली आहे. 131 अब्ज डॉलर संपत्तीसह ते जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी आहेत. मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांच्या संपत्तीत 14 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यांची संपत्ती आता 91 अब्ज डॉलरवर पोचली आहे. तर बर्थशायर हॅथवेचे वॉरन बफेंच्या संपत्तीत 19 टक्क्यांची घट झाली आहे. दोन महिन्यात संपत्ती 19 अब्ज डॉलरने कमी होत 83 अब्ज डॉलरवर पोचली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus mukesh ambani wealth reduction 28 percent within two months