पोल्ट्री व्यवसाय गोत्यात का आला ? वाचा सविस्तर...

सदानंद पाटील
शनिवार, 21 मार्च 2020

शेतीला जोडधंदा म्हणून जिल्ह्यात पोल्ट्री व्यवसायाला प्राधान्य दिले जाते. घरगुती पद्धतीने कोंबडी पालन करून चार पैसे राहत असल्याने या उद्योगाची लोकप्रियता वाढली पण....

कोल्हापूर - एखादा व्यवसाय निव्वळ अफवेमुळे कसा अडचणीत येतो, याचे ताजे उदाहरण म्हणून पोल्ट्री व्यवसायाकडे पाहावे लागेल.  जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोचलेला हा उद्योग बघताबघता अडचणीत आला आहे. नैसर्गिकरित्याच अनुकूल वातावरण मिळाल्या कारणाने जिल्ह्यात मागील १५ वर्षांपासून या पोल्ट्री उद्योगाला बहर आला आहे. सुरुवातीला नाबार्डकडून झालेला वित्त पुरवठा आणि त्यानंतर खासगी कंपन्यांमुळे हा उद्योग अधिकच बहरला. त्यामुळेच आज दिवसाकाठी जिल्ह्यातून ५ ते १० लाख किलो चिकनचे उत्पादन होत आहे. मात्र, कोरोनाच्या अफवेने हाच चिकनचा दर किलोला १० रुपये इतका खाली आल्याने पोल्ट्री व्यावसायिकांवर आयुष्यातून उठण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाला आता निर्णायक भूमिका घ्यावी लागणार आहे.

वाचा - सर्वांना टोप्या घालणारे गाव, तुम्हाला माहित आहे का..?  

शेतीला जोडधंदा म्हणून जिल्ह्यात पोल्ट्री व्यवसायाला प्राधान्य दिले जाते. घरगुती पद्धतीने कोंबडी पालन करून चार पैसे राहत असल्याने या उद्योगाची लोकप्रियता वाढली. यातच शासनानेही या व्यवसायासाठी काही पत पुरवठा केला. खासगी कंपन्या यात उतरल्या. एक वेळ शेडच्या कामासाठी गुंतवणूक केली तर कंपन्यांकडून पिलांचा पुरवठा, संगोपन खर्च व नंतर खरेदी होत असल्याने तरुण, बेरोजगारांनी या उद्योगात प्रवेश केला. यातही आजरा, चंदगड, गडहिंग्लज व हातकणंगले तालुक्‍यात सर्वाधिक पोल्ट्री व्यवसाय आहेत. 

जगभरात कोरोनाचा संसर्ग फैलावू लागल्यानंतर त्याचा चुकीचा संबंध पोल्ट्री व्यवसायाशी जोडला गेला आणि हा व्यवसायच पूर्णपणे गोत्यात आला आहे. कोरोनाचा आणि चिकनचा किंवा मटणाचा काहीही संबंध नाही, असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगितले जात असले तरी आता ते ऐकण्यास कोणीच तयार नाही. आता शासनाकडूनच या व्यावसायिकांना मदतीची अपेक्षा आहे. 

जिल्ह्यातील पोल्ट्री उद्योगाची स्थिती

  •  महिन्याचे उत्पादन सुमारे १ कोटी किलो चिकन
  •   दररोज उत्पादन ५ ते १० लाख किलो 
  •   एका किलोचा खर्च ६५ ते ७० रुपये
  •   सध्या विक्रीचा दर १० रुपये किलो
  •   किलोमागे नुकसान ५५ ते ६० रुपये 
  •   अंदाजे नुकसान १५० ते २०० कोटींच्या घरात

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronas wrongdoing was linked to the poultry business