सर्वांना टोप्या घालणारे गाव, तुम्हाला माहित आहे का..?

दिग्विजय कुंभार
शुक्रवार, 20 मार्च 2020

एखाद्याला टोप्या घालणे म्हणजे हातोहात फसवणे, असा थेट अर्थ काढला जातो; परंतु एखादे गावच सगळ्यांना टोप्या घालत असेल तर... याचा निश्‍चितच धक्का बसेल.

आंबा - एखाद्याला टोप्या घालणे म्हणजे हातोहात फसवणे, असा थेट अर्थ काढला जातो; परंतु एखादे गावच सगळ्यांना टोप्या घालत असेल तर... याचा निश्‍चितच धक्का बसेल. तालुक्‍याच्या पश्‍चिमेकडील केर्ले हे एकमेव गाव असे आहे, की ते सर्वांनाच टोप्या घालत आले आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सर्वांना टोप्या घालणारे गाव म्हणून तालुक्‍यात ओळखले जाऊ लागले.

अर्थातच, परंपरा जपण्यासाठी मानाची टोपी घालून या गावाने समाजासमोर वेगळा आदर्श घालून दिला आहे.
बारसं, मुंज, साखरपुडा, लहान-मोठं लग्न, वाढदिवस, स्नेहसंमेलन, यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार, सामाजिक कार्यक्रम, उद्‌घाटने किंवा कोणताही राजकीय कार्यक्रम असेल तर आलेली मित्रमंडळी, पाहुणे, राजकीय कार्यकर्ते आणि नेतेमंडळींना हार, तुरे, बुके, नारळ, शाल, पुस्तके, कोल्हापुरी फेटे देऊन यथोचित सत्कार करतो. अलीकडच्या काळात लग्न समारंभात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच कोल्हापुरी फेटे घालण्याची स्पर्धाच लागलेली पाहावयास मिळते. यासाठी अनावश्‍यक खर्च करावा लागतो. समाजाने नावे ठेवू नये म्हणून गोरगरीबही कर्ज काढून या गोष्टी करतात. या अनावश्‍यक बाबींना फाटा देत केर्ले गावाने वेगळेपण जपले आहे.

वाचा - घडलं ते थरारकच... जीवावर आलेलं कानावर निभावलं... 

सत्कारासाठी लागणाऱ्या या सगळ्या गोष्टींना केर्ले ग्रामस्थांनी बाजूला ठेवले आहे. ग्रामस्थांनी सामूहिक बैठकीतून सर्व कार्यक्रमात आलेल्या लहानथोरांना फक्त मानाची टोपी घालण्याची नवी पद्धत अवलंबली आहे. पाच-सहा वर्षांपासून हे काम सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची हजारो रुपयांची बचत झाली आहे. केर्लेपैकी बोरमाळ धनगरवाडा, आटखूरवाडी व हुंबवली या ठिकाणीही विविध कार्यक्रमांत ही पद्धत अवलंबली 
जात आहे.

वेगवेगळ्या कार्यक्रमांत हार-तुऱ्यांपासून शाल-फेट्यांपर्यंतच्या अनावश्‍यक बाबींसाठी हजारो रुपये खर्च होतात. ग्रामस्थांच्या सहकार्याने या बाबी पूर्णांशाने बंद झाल्या आहेत. सर्व कार्यक्रमांत मानाची टोपी घालून अनावश्‍यक खर्चाला फाटा बसल्याने ग्रामस्थांची मोठी आर्थिक बचत होत आहे.  
  - शिवाजी पाटील, सरपंच, केर्ले
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The village has set a different model for the community by wearing a hat for preserving the tradition

टॅग्स