मृत्यूही अडचणीचा, 'सोशल डिस्टन्सिंग' पाळतच अंत्यविधी...

अवधूत पाटील
गुरुवार, 26 मार्च 2020

पाहुण्यांना मृत्यूची बातमी कळविली जात आहे; पण अंत्यविधीला न येण्याचे आवर्जून सांगितले जात आहे. अंत्यविधीचे सोपस्कारही सोशल डिस्टन्सिंग पाळून केले जात आहेत.

गडहिंग्लज - एखाद्याचा मृत्यू झाला की त्याच्या पाहुण्यारावळ्यांना निरोप पोचवला जातो. अंत्यविधीची वेळ सांगितली जाते. स्थानिकांची अडचण नको म्हणून वेळेत पोचण्यास सांगितले जाते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावाने ही परिस्थिती बदलली आहे. पाहुण्यांना मृत्यूची बातमी कळविली जात आहे; पण अंत्यविधीला न येण्याचे आवर्जून सांगितले जात आहे. अंत्यविधीचे सोपस्कारही सोशल डिस्टन्सिंग पाळून केले जात आहेत. परिणामी, कोरोनाच्या प्रादुर्भावात मृत्यूही अडचणीचा वाटू लागला आहे. कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील भैरू जोतिबा जाधव यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. सर्व नातेवाइकांना ही घटना कळवण्यात आली; मात्र अंत्यविधी, रक्षाविसर्जन व अन्य विधींसाठीही येऊ नका, असेही सांगण्यात आले. अपवाद केवळ अत्यंत जवळच्या तीन-चार नातेवाइकांचा होता. 

वाचा - जो डर गया समझो बच गया... 

मृत्यूची माहिती सोशल मीडियातून ग्रामस्थांना देतानाही काळजी घेण्याचे आवाहन केले होते. अंत्यविधीसाठी येणाऱ्यांनी स्वत:बरोबर इतरांची काळजी घेण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवावे, तोंडाला मास्क बांधा, अशा सूचना केल्या होत्या. अंत्यविधीसाठी आलेल्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळल्याचे दिसून आले. कौलगेतील या घटनेकडे एक उदाहरण म्हणून पाहता येईल. 

आहे तेथूनच प्रार्थनेचे आवाहन 

मृत व्यक्तीच्या घरच्यांकडून नातेवाईक, मित्रपरिवाराची काळजी घेतली जात आहे. बहिरेवाडी (ता. आजरा) येथील रामगोंडा पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या मुलांनी सोशल मीडियाद्वारे नातेवाईक, मित्रपरिवाराला आवाहन केले, की कोरोनामुळे रक्षाविसर्जनासह अन्य विधी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत करणे इष्ट नाही. जेथे आहात तेथूनच वडिलांच्या आत्म्याला शांती मिळावी, म्हणून प्रार्थना करावी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Funeral ceremony followed by Social Distance in gadhingaj