कोरोना व्हायरस असा लावा पळवून...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

कोल्हापूरचे महापालिका आयुक्त म्हणतात सोडियम हायप्रोक्‍लाराईटची करा फवारणी... 
 

कोल्हापूर - तुमच्या घराचा आणि दुकानाचा परिसर आता तुम्हीच स्वच्छ करा, त्यासाठी सोडियम हायप्रोक्‍लोराईट (यूएसपी) हे औषध प्रभावी असून, ते पाण्यात मिसळून त्याची फवारणी करा, असे आवाहन महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज केले आहे. 

औषध दुकान, पेट्रोलपंप, खासगी कार्यालये, एटीएम सेंटर, बॅंका, किराणा मालाची दुकाने आदी अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या परिसरात या औषधाची फवारणी करा. पाण्याच्या चार ते सहा टक्के औषध घेऊन हे मिश्रण पंपाद्वारे फवारणी करावे, असेही कलशेट्टी यांनी सांगितले. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने रंकाळा परिसरासह महापालिका चौक, न्यायालय परिसर तसेच सर्वच सार्वजनिक ठिकाणी अग्निशमक दलाकडील बंबांच्या सहाय्याने अशी औषध फवारणी केली. याचप्रमाणे लोकांनीही आपापल्या परिसरात फवारणी करून आपला परिसर निर्जंतुकीकरण करून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

वाचा - खायला कोंडा अन्‌ निजेला धोंडा...!

 'लॉक डाऊन' मध्ये किराणा दुकान, भाजीपाला विक्री केंद्रे, मेडिकल दुकान, दूध, गॅस पुरवठा केंद्रे सुरू राहणार आहेत. या परिसरात सुरक्षित अंतर ठेवूनच लोकांना खरेदी करावी लागेल. पण, असा परिसरही निर्जंतूक राहावा, यासाठी ही औषध फवारणी महत्त्वाची आहे. दुकान मालकांनी स्वतः पुढाकार घेऊन या औषधाची फवारणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. 

फवारणीचे मिश्रण असे

एक लिटर पाण्यात म्हणजे एक हजार मिलिलिटर पाण्यात सुमारे 40 ते 60 मिलिलिटर सोडियम हायप्रोक्‍लोराईट (यूएसपी) टाकावे. ते पाणी तुमच्या परिसरात फवारावे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur municipal commissioner says spraying of sodium hypochlorite