खायला कोंडा अन्‌ निजेला धोंडा...!

संभाजी गंडमाळे
बुधवार, 25 मार्च 2020

संचार बंदीमध्ये निराधारांच्या जगण्याचा प्रश्‍न बनतोय गंभीर.... 

कोल्हापूर - 'रहने को घर नही, सोने को बिस्तर नही, अपना खुदा हैं रखवाला' हेच त्यांचं जीवनगाणं. समाजानेच टाकलेल्या या माणसांच्या नशिबी 'खायला कोंडा आणि निजेला धोंडा' आलेला. प्रत्येकाची घरातून बाहेर पडण्याची कारणे वेगळी. मात्र; ओस आडोश्‍यात त्यांचं जगणं सुरूच आहे. एरवी कुणी काही ना काही खायला देतात आणि त्यावर त्यांची गुजराण होते. मात्र, आता संचारबंदीमुळे त्यांच्या पोटाच्या भूकेचा प्रश्‍न गंभीर झाला असतानाच आज सायंकाळी झालेल्या पावसाने त्यांना हुडहुडी भरायची वेळ आली. 

मनाला पटेल त्या ठिकाणी दिवसभराची भटकंती आणि रात्रीचा अंधार गडद होऊ लागला, की त्यांची पावले पुन्हा रस्त्यावरच्या घराकडे वळतात. ज्या घराला भिंती नाहीत, डोईवर छप्पर नाही, पाच बाय चार फुटांची केवळ ही आडोशाची जागा. काहींची जागा पर्मनन्ट; तर काही जण भटकंती करीत मिळेल त्या ठिकाणी पहुडतात. एसटी स्टॅंड, रेल्वे स्टेशन, शिवाजी मार्केट, सीपीआर अशा प्रमुख ठिकाणांसह शहरात अशा लोकांची संख्या लक्षणीय आहे. त्यांना काही सेवाभावी व्यक्ती आणि संस्था मदत करत असतात. पण, संचारबंदीमुळे त्यांच्याकडे कोण येत नाही आणि त्यांनाही कुणाकडे जाता येत नाही, असेच सध्या चित्र आहे. 

फक्त एका प्रवाशासाठी कोल्हापुरातून केले विमानाने उड्डाण... 

आज सायंकाळी एसटी स्टॅंड, रेल्वे स्टेशन परिसरात किमान दहा ते बारा असे निराधार बसस्टॉप, खाद्यपदार्थांच्या गाड्यांचा आधार घेवून बसलेले. कुणी ना कुणी तरी येईल आणि नेहमीप्रमाणे आपल्या पोटाची खळगी भरेल, अशी त्यांची भाबडी आशा. मात्र, रात्रीचा अंधार हळूहळू गडद होत गेला आणि त्या अंधारातून त्यांच्यासाठी म्हणून कुणीच फिरकलेच नाही, हे जळजळीत वास्तव अनुभवायला मिळत होते.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: survival of the destitute in the curfew is becoming serious

टॅग्स
टॉपिकस