Coronavirus : राज्यातील शाळा, महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत सुट्टी; पण...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

दहावी, बारावी, अन्य परीक्षा सुरू राहणार
दहावी, बारावी आणि महाविद्यालयांच्या परीक्षा मात्र वेळापत्रकानुसार घेतल्या जाव्यात, असे या आदेशात म्हटले आहे. या परीक्षा घेताना एखादा आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही, यासाठी आवश्‍यक दक्षता आणि खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित संस्थाप्रमुखांना दिल्या जाणार आहेत.

राज्यातील घडामोडी

  • यवतमाळमध्ये दोन जणांना कोरोनाची लागण
  • नागपुरात चार संशयित रुग्णाचे रुग्णालयातून पलायन; नंतर पकडले 
  • सिंधुदुर्गात आत्तापर्यंत ९४ जणांची तपासणी 
  • अमरावतीत १५ विदेशी नागरिकांची आरोग्य तपासणी
  • मुंबईत चार तर पिंपरी-चिंचवडमध्ये पाच नवे रुग्ण
  • नगरमध्ये जिल्हा रुग्णालयातून तीन संशयित फरार
  • मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द

परिपत्रक जारी; मॉलही ३१ मार्चपर्यंत बंद, देशात बाधितांची संख्या शंभरावर 
मुंबई - कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील शहरी भागातील शाळा आणि महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. पण दहावी, बारावी, अन्य परीक्षा सुरू राहणार असल्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रांमधील मोठे मॉलही बंद ठेवण्याचा आदेश आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी पाच संशयित रुग्ण आढळून आल्याने राज्यातील बाधितांची संख्या ३१ झाली असून देशात १०१ जणांना संसर्ग झाला आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आरोग्य विभागाने उच्च व तंत्रशिक्षण विभाग, शालेय शिक्षण विभाग, व्यवसाय व प्रशिक्षण आयुक्त यांना परिपत्रकाद्वारे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
राज्य सरकारने शुक्रवारी कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तरणतलाव, व्यायामशाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शनिवारी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश जारी केले. साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यातील तरतुदींनुसार राज्यातील शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी न देण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रांतील सर्व सरकारी व खासगी शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांसह आयटीआय आदी सर्व शैक्षणिक संस्था ३१ मार्चपर्यंत बंद ठेवल्या जातील. मोठ्या शहरांमधील मॉल बंद करण्याचा आदेश देतानाच या मॉलमधील जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री सुरु ठेवता येणार आहे. राज्यात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत परवानगी देऊ नये, असा आदेश काढला आहे.

Corona Updates : देशात रुग्णांच्या संख्येत वाढ; पुण्यात नवीन रुग्ण नाही

बुलडाण्यामध्ये संशयिताचा मृत्यू
बुलडाणा : चिखली शहरातील ७१ वर्षीय व्यक्तीला कोरोना संशयित म्हणून आज सकाळी विलगीकरण कक्षात दाखल केले होते. या व्यक्तीला दुपारी त्रास होऊन सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे सिद्ध झाले नसून त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. 

चिखली येथील ज्येष्ठ नागरिक हे परिवारासोबत सौदी अरेबियाला गेले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्याची तेथेच त्याची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर ते विमानाने मुंबई व तेथून चिखली येथे आले होते. आज सकाळी त्यांना त्रास जाणवत असल्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, यासंदर्भात लक्षणे हे कोरोना असल्यासारखे वाटल्याने खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. विलगीकरण कक्षात त्यांच्यावर उपचार करत असताना त्यांचा मृत्यू झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus maharashtra update school colleges will close upto 31 march