Coronavirus : बाजार रोखल्याने शेतकरी संतप्त

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 April 2020

मुंबई, पुण्यासह काही ठिकाणच्या बाजार समित्या बंद आहेत, ती तेथील गरज आहे. मोठ्या शहरात भाजीपाला जीवनावश्यक वस्तूंची कमतरता पडू देणार नाही.
- बाळासाहेब पाटील, सहकार व पणन मंत्री

पुणे - कोरोना संसर्गाचा बाऊ करून कोणताही ठोस पर्याय न देता मुंबई, पुण्यासह महत्वाच्या बाजार समित्याच बंद केल्याने राज्यातील भाजीपाला व फळे उत्पादक शेतकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शेतकऱ्यांनी कष्ट आणि भांडवलाचे सिंचन करून केलेला कोट्यवधी रुपयांचा भाजीपाला आणि फळे शेतातच नासत आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी उभारलेल्या आणि अत्यावश्यक सेवेचा भाग असलेल्या बाजार समित्या बंद करण्याचा व्यापारी, आडते यांसारख्या घटकांच्या दबावाखाली घेतलेला निर्णय आततायीपणाचा असल्याची टीका शेतकरी वर्गातून होत आहे. खरेदी-विक्रीच्या विकेंद्रीकरणासह अनेक पर्याय अवलंबून ही व्यवस्था सुरू नाही ठेवली तर शेतकऱ्यांचे नुकसान तर होईलच, त्याचबरोबर पुरवठा साखळी विस्कळित झाली तर ग्राहकांच्याही रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल.     

लॉकडाऊनच्या काळात मजूर, वाहतूक, इंधन आदी संकटांवर मात करून मोठ्या शहरांतील बाजारात शेतीमाल पाठवून चार पैसे मिळत होते. परंतु, पुणे, मुंबई आणि यांसारख्या अन्य महत्वाच्या बाजारपेठा बंद केल्याने शेतमाल विक्री व्यवस्थाच कोलमडली आहे. फळे आणि भाजीपाला नाशवंत असल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. थेट विक्रीलाही मर्यादा असल्याने फळे आणि भाजीपाला फेकावा लागणार आहे.

या पिकांना बसतोय फटका
फळे - द्राक्ष, आंबा, मोसंबी, संत्रा, पपई, चिकू, कलिंगड, खरबूज, पेरू, लिंबू
भाजीपाला - मेथी, कोथिंबीर, पालक
फळभाज्या - टोमॅटो, मिरची, कांदा, गवार, गाजर, वांगी, काकडी, भेंडी, कारली, दोडका, शेवगा, ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर, बाटाटा बीट आदी.

बाजार समित्या ‘बंद'चा परिणाम

  • शेतमाल विक्रीसाठी पर्यायी व्यवस्थाच नाही
  • मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये शेतीमाल थेट विक्री करण्याला मर्यादा
  • ऑनलाइन विक्रीवरही मर्यादा
  • विक्री होत नसल्याने फळे, भाजीपाला फेकून देण्याची वेळ
  • कवडीमोल दराने व्यापाऱ्यांकडून फळांची मागणी
  • पिकावर केलेला लाखो रुपयांचा खर्च जाणार वाया

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers are offended by the block of the market